क्रिकेटमध्ये नवेनवे विक्रम नेहमीच बनतात आणि मोडतात. २००८ मध्ये आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम नोंदले गेले आहेत. ख्रिस गेल, डिव्हिलियर्स सारख्या फलंदाजांनी सर्व गोलंदाजांना चांगलेच सतावले. तर लसिथ मलिंगा आणि सुनील नारायण सारख्या गोलंदाजांनी जगभरातील फलंदाजांना भरपूर त्रास दिला.
आयपीएलमध्ये असेही काही आश्चर्यकारक विक्रम नोंदवले गेले, जसे की विराट कोहलीने केली एका हंगामात ५ शतके, आरसीबीने २०१३ मध्ये आयपीएलच्या इतिहासातील केलेल्या सर्वोच्च धावा. परंतु विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच असतात आणि आयपीएलमधील बरेच विक्रम लवकरच मोडले जाऊ शकतात. म्हणूनच आज या खास लेखाच्या माध्यमातून आयपीएलच्या त्या ५ विक्रमांबद्दल सांगू जे या हंगामात मोडू शकतात.
५. एक भारतीय खेळाडू म्हणून सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या –
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या नावावर, भारतीय खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आहे. पंतने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध वर्ष २०१८ मध्ये वयक्तिक १२८ धावा केल्या होत्या. हा पंतचा विक्रम मागील हंगामात कोणीही मोडू शकला नाही. परंतु यावेळी पंतचा हा वयक्तिक विक्रम मोडला जाऊ शकतो. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली हा विक्रम मोडण्यास सक्षम आहेत. त्याशिवाय पंतचे हे विक्रम मोडणारे अनेक तरुण भारतीय फलंदाज आहेत. पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांनाही यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
४. आयपीएलमधील सर्वाधिक विकेट-
श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये मलिंगाने १२२ सामन्यात १७० बळी मिळवले आहेत. परंतु त्याचा अलीकडील फॉर्म पाहता, आता त्याला अधिक सामने मिळण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय लेगस्पिनर अमित मिश्राने १४७ सामन्यांत १५७ बळी घेतले आहेत. अमित मलिंगाच्या या विक्रमापासून अवघ्या १३ बळी दूर आहे. चांगली कामगिरी करून तो आयपीएलमधील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू बनू शकतो. अमित सारखा फिरकी गोलंदाज युएईसारख्या खेळपट्ट्यांवर चमत्कार करू शकतो. युएई खेळपट्ट्यांवर फिरकीपटू चांगली कामगिरी करतात. म्हणून, मलिंगाचा हा विक्रम नक्कीच धोक्यात आला आहे.
३. आयपीएलमधील सर्वाधिक धावांची नोंद
कुठल्याही विक्रमाची चर्चा झाली की त्यात विराट कोहलीचे नाव येणारच. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. कोहलीने १७७ सामन्यांच्या १६९ डावात ५ शतके आणि ३६ अर्धशतकांच्या मदतीने ५,४१२ धावा केल्या आहेत. दुसर्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैनाने १९३ सामन्यांच्या १८९ डावात एक शतक आणि ३८ अर्धशतकांच्या मदतीने ५,३६८ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या या विक्रमासाठी या दोन खेळाडूंमध्ये मागील हंगामापासून चांगली जुगलबंदी पहायला मिळाली आहे. आता या हंगामात हा विक्रम कोणाच्या नावे होतो हे पहावे लागेल.
सध्या सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या कोहलीचा हा हंगाम फ्लॉप झाला आणि रैनाने चांगला खेळ दाखवला तर कोहलीच्या या विक्रमाला रैना आपल्या नावावर करू शकतो.
२. सर्वात जास्त शतकांची नोंद
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम, वेस्ट इंडीजचा आणि आयपीएल मधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा, स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर आहे. आयपीएलच्या इतिहासात वेस्ट इंडीजच्या या फलंदाजाने आतापर्यंतच्या १२५ सामन्यात ६ शतके ठोकली आहेत. याशिवाय गेलने २८ अर्धशतकेही केली आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५ शतके ठोकली आहेत आणि तो गेलच्या अगदी जवळ आहे. २०१६ मध्ये कोहलीने एकाच हंगामात ४ शतके ठोकली होती आणि तो आता हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. गेलदेखील या आयपीएलचा एक भाग आहे.
त्यामुळे शतकांची चुरस बघायला मिळू शकते. सध्या विराट कोहली प्रत्येक विक्रम मोडत आहे. त्यामुळे विराट नक्कीच या विक्रमाला आपल्या नावावर करू शकतो.
१.यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स –
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार यष्टीरक्षक एमएस धोनीची यष्टीमागील चपळता आपण सर्वानी पहिली आहे. आता या हंगामात एमएस धोनीचा यष्टीमागील सर्वाधिक विकेट्सचा विक्रम धोक्यात आला आहे. धोनी यंदा चेन्नईकडून यष्टीरक्षक भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहे, आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक १३२ फलंदाजांना माघारी पाठवलं आहे. धोनीच्या या विक्रमाला धोका देखील एका भारतीय खेळाडूकडून आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक यष्टीमागील १३१ विकेट्सह धोनीपेक्षा फक्त १ विकेटच्या फरकाने मागे आहे. अशावेळी कार्तिक धोनीला मागे टाकू शकतो. दिनेश कार्तिक देखील आयपीएलमध्ये सातत्याने यष्टिरक्षकाची भूमिका बजावत आहे. तो धोनीच्या अगदीच जवळ असल्याने हा विक्रम तो आपल्या नावावर करू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० – प्रत्येक संघाकडे असणारा एक परदेशी खेळाडू जो एकहाती बदलू शकतो सामन्याचा निकाल…
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप २०२०: सर्वाधिक धावा करणारे आणि विकेट घेणारे अव्वल १० क्रिकेटपटू…
या ४ संघांना भारताने सर्वाधिक वनडे सामन्यात केले पराभूत