भारतीय संघाकडून आत्तापर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटू खेळले. पण त्यातील अनेकांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. क्रिकेटमध्ये विश्वचषकाची स्पर्धा सर्वात मानाची मानली जाते. ही स्पर्धा जिंकण्याचे क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच खेळाडूंचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही.
असे ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटू ज्यांना कधीही विश्वचषक जिंकता आलेला नाही (5 legendary Indian Cricketers who never won a World Cup) –
१. सौरव गांगुली – भारताचा दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीलाही २००३ मध्ये विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्याची संधी होती. मात्र भारताला या विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्यावेळी कर्णधार असलेल्या गांगुलीला विश्वचषक विजेतेपदाची ट्रॉफी मात्र उचलता आली नाही.
गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत तीन विश्वचषक खेळले. १९९९, २००३ आणि २००७ या तीन विश्वचषकात मिळून त्याने २१ सामन्यात ५५.८८ च्या सरासरीने १००६ धावाही केल्या. तसेच तो विश्वचषकात १००० पेक्षा अधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर नंतरचा केवळ दुसराच भारतीय क्रिकेटपटू आहे.
२. राहुल द्रविड – ‘द वॉल’ या टोपन नावाने ओळखला गेलेला राहुल द्रविडही २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. पण त्या विश्वचषकात भारताचा अंतिम सामन्यात पराभव झाल्याने विश्वविजेत्या संघाचा भाग होण्याची त्याची संधी हुकली.
द्रविडनेही १९९९, २००३ आणि २००७ अशा ३ विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९९९ च्या विश्वचषकात तो सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज होता. त्याने ८ सामन्यात ४६१ धावा केल्या होत्या.
तसेच २००७ च्या विश्वचषकात तो भारतीय संघाचा कर्णधारही होता. पण या विश्वचषकात भारताला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते. त्याने ३ विश्वचषकात खेळताना २२ सामन्यात ६१.४२ च्या सरासरीने २ शतके आणि ६ अर्धशतकांसह ८६० धावा केल्या आहेत.
३. अनिल कुंबळे – भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेेणारा गोलंदाज अनिल कुंबळेने १९९६, १९९९, २००३ आणि २००७ असे ४ विश्वचषक भारताकडून खेळले आहेत. त्याने प्रत्येक विश्वचषकात महत्त्वाच्या विकेट्स घेत मोलाचे योगदान दिले होते.
२००३ च्या विश्वचषकात उपविजेत्या ठरलेल्या १५ जणांच्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. मात्र त्याला त्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळता आला नव्हता. त्याच्याऐवजी हरभजन सिंगला अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली होती.
कुंबळेने ४ विश्वचषकात मिळून १८ सामने खेळले असून ३१ विकेट्स घेतल्या आहेत. तो विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.
४. मोहम्मद अझरुद्दीन – भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने १९८७, १९९२, १९९६ आणि १९९६ या ४ विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिधिनित्व केले. विशेष म्हणजे यातील १९९२, १९९६ आणि १९९९ या तीन विश्वचषकात त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १९९६ ला उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यावेळी श्रीलंकेविरुद्ध भारताला पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्यालाही कधी विश्वविजेतेपदाची ट्रॉफी जिंकता आली नाही. त्याने ४ विश्वचषकात मिळून ३० सामने खेळले. या ३० विश्वचषकात ३९.३३ च्या सरासरीने ८२६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ८ अर्धशतकांचाही समावेश आहे.
५. जवागल श्रीनाथ – १९९१ ते २००३ दरम्यान भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणाऱ्या जवागल श्रीनाथने १९९२, १९९६, १९९९ आणि २००३ असे ४ विश्वचषक भारतीय संघाकडून खेळले आहेत.
त्याने या ४ विश्वचषकात मिळून ३४ सामन्यात ४४ विकेट्सही घेतल्या आहेत. तो विश्वचषकामध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत झहीर खानसह संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर आहे. पण विश्वचषकातील एवढा यशस्वी गोलंदाज असूनही त्याला विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्याचे भाग्य लाभले नाही. २००३ च्या विश्वचषकानंतर श्रीनाथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
ट्रेंडिंग घडामोडी –
चेन्नईकडून खेळलेले ३ दिग्गज, जे कुणालाही आठवत नाहीत
आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेणारे ३ क्रिकेटर्स
हे ५ आयपीएल विक्रम मोडणं जवळपास अशक्यच