अखेर 2020 वर्ष संपून 2021 वर्ष उजाडत आहे. 2020 या वर्षाने अनेक अर्थांनी सर्वांच्याच लक्षात राहिल. यावर्षी अनेक क्षेत्रांप्रमाणे क्वचितच बंद न पडणारे क्रीडाक्षेत्रही काही महिने कोरोनाच्या संकटामुळे ठप्प होेते. क्रिकेटही जवळपास 5 महिने बंद होते. पण अखेर जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आणि अनेक क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा उत्साह दिसू लागला. सध्या हळुहळू क्रिकेट पूर्वपदावर येत आहे.
भारतीय क्रिकेट संघाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारताला २०२१ या वर्षात अनेक क्रिकेट सामने खेळायचे आहे. त्यामुळे त्यांचे पुढीलवर्षाचे वेळापत्रक व्यस्त असणार आहे.
जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 कसोटी सामने –
सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला कसोटी मालिकेतील उर्वरित 2 सामने जानेवारी महिन्यात खेळायचे आहेत. यातील एक सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे तर दुसरा 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे सुरु होणार आहे.
इंग्लंड येणार भारत दौऱ्यावर –
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका खेळणार आहे. यात 4 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांचा समावेश असेल. इंग्लंडच्या या भारत दौऱ्याला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नईत तर शेवटचे 2 सामने अहमदाबाद येथे होतील. त्यानंतर या दोन्ही संघात 5 सामन्यांची टी20 मालिका अहमदाबाद येथेच होईल. त्यानंतर 3 सामन्यांची वनडे मालिका पुण्यात होईल. इंग्लंडचा भारत दौरा 28 मार्चला संपेल.
आयपीएल 2021 –
इंग्लंडच्या भारत दौऱ्यानंतर आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होईल. हा हंगातम एप्रिल-मे दरम्यान होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ करणार श्रीलंका दौरा –
आयपीएलनंतर भारतीय संघ जूनमध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाईल. तिथे 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांच्या मालिका होतील. त्यानंतर लगेचच श्रीलंकेतच आशिया चषक स्पर्धा होईल.
श्रीलंकेनंतर भारत झिम्बाब्वे दौरा करणार –
जूलैमध्ये भारतीय क्रिकेट संघ 3 वनडे सामन्यांसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाईल. त्यानंतर जूलैच्या अखेरीस भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. तिथे सप्टेंबरपर्यंत 5 कसोटी सामन्यांची मालिका होईल.
वर्षअखेरीस मायदेशात सामने, विश्वचषकाचेही आयोजन –
ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका संघ 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येईल. यानंतर लगेचच भारतात टी20 विश्वचषक होणार आहे. हा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
टी20 विश्वचषकानंतर नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येईल. त्यांना भारताविरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी20 सामने खेळायचे आहेत.
डिसेंबरमध्ये भारतीय संघ 3 कसोटी आणि 3 टी20 सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
गुडबाय २०२० : यावर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे ‘हे’ आहेत ६ गोलंदाज
गुडबाय २०२०: धोनी-रैनासह या ५ दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर्षी घेतली निवृत्ती
मैदानावर शिवी देणं ‘या’ ऑसी क्रिकेटरला पडलं महागात, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठोठावला २५०० डॉलर्सचा दंड