क्रिकेटमध्ये विश्वचषकाची स्पर्धा सर्वात मानाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटपटूचे आपल्या देशाचे विश्वचषकात प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते. मात्र असे काही भारतीय खेळाडू आहेत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, पण त्यांना विश्वचषकात सहभागी होण्याची संधी मात्र कधी मिळाली नाही.
असे ५ भारतीय खेळाडू ज्यांना कधीही विश्वचषकात खेळता आले नाही –
मुरली कार्तिक –
भारताचा फिरकीपटू मुरली कार्तिक २००० ते २००७ या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहेे. त्याने भारताकडून ३७ वनडे सामने आणि ८ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने वनडेत ३७ विकेट्स आणि कसोटीत २४ विकेट्स घेतल्या आहेत.
मात्र तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना भारतीय संघात अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग हे फिरकीपटू असल्याने तो नेहमीच फिरकीपटू म्हणून तिसरा पर्याय राहिला. त्यामुळे त्याला कधी विश्वचषकातही खेळण्याची संधी मिळाली नाही.
चेतेश्वर पुजारा –
भारताचा कसोटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजाराने २०१० ला आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने कसोटीमध्ये भारताकडून खेळताना १८ शतकांसह ५८४० धावा केल्या आहेत. पण मात्र त्याला वनडेत केवळ ५ सामनेच खेळता आले आहेत.
असे असले तरी पुजाराची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी पहाता त्याने अ दर्जाच्या(५० षटकांच्या क्रिकेट सामन्यांत) १०३ सामन्यात ५४.२० च्या सरासरीने ४४४५ धावा केल्या आहेत. मात्र तरीही त्याला वनडेमध्ये पुरेशी खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला कधी विश्वचषकातही खेळण्याची संधी मिळाली नाही.
अमित मिश्रा –
अनिल कुंबळे दुखापतग्रस्त झाल्याने अमित मिश्राला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने भारताकडून २२ कसोटी आणि ३६ वनडे सामने खेळले. यात त्याने वनडेत ६४ तर कसोटीत ७६ विकेट्स घेतल्या आहेत.
मात्र तो खेळत असताना भारतीय संघात आर अश्विन, रविंद्र जडेजा, चहल, कुलदीप यादव असे फिरकीपटू संघात येत गेल्याने तो संघात सातत्याने आत-बाहेर करत राहिला. त्यामुळे त्याला कधी वनडे विश्वचषक खेळण्याची संधी मिळालेली नाही.
इशांत शर्मा –
भारताचा सध्याचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे २००७ मध्ये पदार्पण झाले आहे. त्याने आत्तापर्यंत ९७ कसोटी सामनेही खेळले आहेत. त्यात त्याने २९७ विकेट्स घेतल्या आहेत.
पण असे असले तरी त्याला आत्तापर्यंत २००७ पासून ८० वनडे सामनेच खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये तो २०१३ ला भारताने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळला. मात्र त्याला आत्तापर्यंत कधीही वनडे विश्वचषकात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
त्याची २०१५च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती. पण हा विश्वचषक सुरु होण्याआधीच तो दुखापतग्रस्त झाल्याने त्याला या विश्वचषकात खेळता आले नाही.
व्हीव्हीएस लक्ष्मण –
भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणला नावलौकीक मिळाला आहे. २०००, २०१० च्या दशकातील भारताच्या सर्वोत्तम ४ फलंदाजांमध्ये त्याची गणना व्हायची. त्याने कसोटीत १३४ सामने खेळले. या त्याने १७ शतकांसह ८७८१ धावाही केल्या.
मात्र वनडेत त्याला तितकी संधी मिळाली नाही. तो १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ ८६ वनडे सामने खेळू शकला. मात्र त्याला एकदाही विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्याने ८६ वनडेत ६ शतके आणि १० अर्धशतकांसह २३३८ धावा केल्या आहेत.
ट्रेडिंग घडामोडी –
मायदेशात परतण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू करतोय लोकांकडून पैसे गोळा
५ महान क्रिकेटर जे खेळू शकले नाहीत १०० कसोटी सामने
जगातील ५ असे महान क्रिकेटर, जे कधीही विश्वचषकात खेळले नाहीत