क्रिकेटजगतात आपल्या चौफेर फटकेबाजीमुळे ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख मिळवलेला क्रिकेटपटू म्हणजे एबी डिविलियर्स. त्याने आजपर्यंत आपल्या फलंदाजीने अनेक दिग्गजांसह चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. पण त्याने ३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, सध्या त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची जोरदार चर्चा सुरु आहे. याचदरम्यान भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने त्याते तोंडभरुन कौतुक केले आहे.
नुकत्याच काहीदिवसांपूर्वी स्थगित झालेल्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेतही डिविलियर्स शानदार फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने या हंगामात ७ सामन्यात ५१.७५ च्या सरासरीने २ अर्धशतकांसह २०७ धावा केल्या होत्या.
क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, ‘लोक कदाचित त्याचं खरं नाव विसरतील, पण ‘मिस्टर ३६०’ नेहमीच लक्षात राहिल. मला वाटत नाही आपल्याला त्याला दुसरे नाव देण्याची गरज आहे. मिस्टर ३६० हेच पुरेसे आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात, जेव्हा त्याने मार्कस स्टॉयनिसने टाकलेले ऑफ-स्टंपच्या बाहेरील चेंडू काही सोडले होते, तेव्हा त्याला लक्षात आले की त्याने चूकीचा चेंडू सोडला. पण पुढच्या चेंडूवर त्याने आऊटसाईड ऑफला जाऊन आखुड टप्प्याच्या चेंडूवर षटकार मारला होता, अगदी त्यावेळी तो पूर्वीप्रमाणेच चेंडू येईल असे त्याला अपेक्षित होते.’
‘हे केवळ एबी डिविलियर्सच करु शकतो. दुसरा कोणता असा फलंदाज आहे, जो आखुड टप्प्याच्या चेंडूला केवळ बॅट लावण्याऐवजी किंवा बाद होण्याऐवजी आऊटसाईड ऑफला जाऊन खेळला असता. मला वाटते केवळ एबी डिविलियर्स असा आहे. त्यामुळे त्याला कोणतीही विशेषणे, गाणी किंवा कविता देण्याची गरज नाही. मिस्टर ३६० हे सर्वोत्तम नाव आहे.’
एबी डिविलियर्सने आयपीएल २०२१ हंगामात दिल्लीविरुद्ध ४२ चेंडूत ७५ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले होते. तो जेव्हा फलंदाजीला या सामन्यात आला होता तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ अडचणीत होता मात्र डिविलियर्सने त्याच्या फटकेबाजीने संघाला १७१ धावांचा आकडा गाठून दिला होता. हा सामना बेंगलोरने १ धावेने जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –