१८ ऑगस्ट २००८ ते १८ ऑगस्ट २०२१ तेरा वर्षांचा काळ. या तेरा वर्षाच्या कालखंडाला मराठी भाषेत “तप” असे म्हणतात. पूर्वीच्या काळात ऋषी मुनी देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सलग बारा वर्षे तपश्चर्या करत आणि त्यानंतर त्यांना देवदर्शन देत असत अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. अशाच प्रकारे एका असामान्य क्रिकेटपटूने आपल्या क्रिकेट कारकीर्दीची बारा वर्ष म्हणजेच एक तप पूर्ण केले आहे. तो खेळाडू म्हणजे नव्या पिढीतील क्रिकेट चाहत्यांचा सर्वात मोठा सुपरस्टार व रोल मॉडेल, भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली.
देशांतर्गत क्रिकेट गाजवल्यानंतर २००८ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी, विराटची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली. त्याच्या संघात आता भारतीय राष्ट्रीय संघात खेळत असलेले मनीष पांडे, रवींद्र जडेजा, सिद्धार्थ कौल हे खेळाडू देखील होते. मलेशियामध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवले. संपूर्ण स्पर्धेत विराटने असा काय धुमाकूळ घातला की क्रिकेट जगताला नवीन तारा मिळाला आहे, यावर जगभरातील क्रिकेट समीक्षकांनी शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, क्रिकेटप्रती आपली असलेली समर्पणाची भावना विराटने २००६ मध्येच दाखवली होती. डिसेंबर २००६ ला दिल्ली व कर्नाटक यांच्यात रणजी ट्रॉफीतील सामना सुरू होता. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर विराट ४० धावांवर नाबाद होता. दिल्लीला फॉलोऑन मिळणार असे एकूण सामन्याचे चित्र तयार झालेले. अशातच रात्री एक दुःखद बातमी येऊन थडकली. विराटच्या वडिलांचे निधन झाले होते.
सामना दिल्लीतच असल्याने विराटला तात्काळ घरी पाठवण्यात आले. अंत्यविधी पार पडल्यानंतर अचानक सकाळी सकाळी विराट पुन्हा संघात दाखल झाला. सर्वांना आश्चर्य वाटले की, वडिलांच्या निधनानंतर ही विराट कसा काय आला ? विराटने प्रशिक्षकांकडे फलंदाजीला उतरवीण्याची मागणी केली. प्रशिक्षकांनी त्याची मानसिक कणखरता पाहून त्याला मैदानात उतरवले. विराटने वैयक्तिक ९० धावा काढून दिल्लीला फॉलोऑन पासून वाचवले. या एका घटनेने त्याची तुलना महान सचिन तेंडुलकर याच्याशी केली जाऊ लागली. सचिन सोबत देखील १९९९ विश्वचषका दरम्यान अशीच घटना घडली होती.
युवा विश्वचषक जिंकून आल्यानंतर, विराटला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडले गेले. बऱ्याचशा, वरिष्ठ खेळाडूंना त्यावेळी आराम दिला गेला होता. दाम्बुला वनडेमध्ये त्याने सर्वप्रथम भारतीय वरिष्ठ संघाची निळी जर्सी आपल्या अंगावर चढवली. पहिल्याच सामन्यात आपला वरिष्ठ दिल्लीकर गौतम गंभीर यांच्यासमवेत त्याला सलामी जबाबदारी देण्यात आली. पहिल्या सामन्यात विराट विशेष असे काही करू शकला नाही. २२ चेंडूत १२ धावा काढून तो नुवान कुलशेखराच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. तो दौरा तितकासा चांगला गेलाच नाही.
विराटला आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याचासाठी २००९ चा डिसेंबर महिना उजडावा लागला. २४ डिसेंबर २००९ रोजी कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर पुन्हा एकदा श्रीलंका संघ समोर होता. श्रीलंकेने उपुल थरंगाच्या शतकाच्या मदतीने ३१५ धावांचे मोठे लक्ष भारतासमोर ठेवले. प्रत्युत्तरात, सचिन-सेहवाग ही दिग्गज सलामी जोडी अवघ्या २३ धावात तंबूत परतली. विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.
यावेळी देखील सोबत होता गौतम गंभीरच. दोघांनी श्रीलंकन गोलंदाजांची अशी काही पिसे काढली की भारताला सामना जिंकून दिला. २२४ धावांची भागीदारी करताना विराटने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्या सामन्यात विराटने १०७ धावांची तर गंभीरने १५० धावांची अफलातून खेळ केली. सामनावीर पुरस्कार गंभीरला मिळाल्यानंतर त्याने तो विराटला देत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला.
येथून सुरू झालेला हा प्रवास आजतागायत त्याच वेगाने सुरू आहे. मधल्या काळात २०११ विश्वचषक व २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांच्या विजेत्या संघाचा तो सदस्य राहिला. २०१४ व २०१६ अशा सलग दोन टी२० विश्वचषकात त्याने मालिकावीर पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
२०१४ ला कसोटी कर्णधारपदाची पूर्णवेळ जबाबदारी धोनीने विराटच्या खांद्यावर दिली होती. त्या जबाबदारीने अजिबात न वाकता भारतीय संघाला सातव्या क्रमांक वरून प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी तोच सर्वात पुढे राहिला. २०१६ पासून जवळपास तीन वर्ष भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल होता. २०१७ ला भारतीय संघाच्या तीनही प्रकारच्या क्रिकेटचा कर्णधार म्हणून तो नियुक्त झाला. विराटच्याच नेतृत्वात भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
आज विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्यासोबत ‘फॅब फोर’मध्ये गणले जाणारे स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन व जो रूट हे मैलोनमैल मागे पडलेत. एकदिवसीय सामन्यात ४३ तर कसोटीमध्ये २७ शतके आत्तापर्यंत त्याच्या नावे आहेत. अवघ्या १३ वर्षात २२,९३७ आंतरराष्ट्रीय धावा काढून तो सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या क्रमांकावर आला आहे.
विराटची शारीरिक तंदुरुस्ती, फॉर्म व खेळाप्रती असलेली निष्ठा पाहून तो अजून बरीच वर्ष क्रिकेटची सेवा करताना दिसून येईल. विराटच्या सर्वांगसुंदर खेळाने प्रेक्षकांचे मात्र मन असेच भरत राहील.