सहा फूट उंची, गुबगुबीत अंग, सोनेरी केस, चेहऱ्यावर सन स्क्रीन, एक डोळा निळा तर एक हिरवा, पाच-सहा पावलांचा रनअप, तोंडातून गुरगुर असा विशिष्ट आवाज काढत तो लेगस्पिन गोलंदाजी करायचा अन् जगातील सर्वोत्तम फलंदाजांना नाकीनऊ आणायचा.. तो गोलंदाजी करायचा तेव्हा चेंडू त्याच्या तालावर नाचायचे, फलंदाज बुचकाळ्यात पडायचे आणि क्रिकेटरसिक त्याच्या गोलंदाजीचा आनंद लुटायचे. लेग स्पिन गोलंदाजीचा जादूगर होता तो.. शेन वॉर्न होता तो..
हॅम्पटन हायस्कूलमध्ये नववीत असतानाच, मेंटन ग्रामर स्कूलने शिष्यवृत्ती देत त्याला आपल्या शाळेत दाखला दिला. १९८४ मध्ये, सोळा वर्षाखालील मुलांच्या डावलिंग शिल्ड स्पर्धेत मेलबर्न यूनिवर्सिटी संघाकडून आपल्या लेग स्पिनने स्पर्धा अक्षरशः दणाणून सोडली. एकीकडे क्रिकेट खेळत असताना दुसरीकडे सेंट किल्डाच्या १९ वर्षाखालील फुटबॉल संघाचे तो प्रतिनिधित्व करत. १९८८ च्या विक्टोरीयन फुटबॉल लीगसाठी किल्डाच्या संघात त्याची निवड झाली नाही आणि त्याने पूर्ण लक्ष क्रिकेटकडे केंद्रित केले. १९९० मध्ये, ऑस्ट्रेलियन क्रिकेट ॲकॅडमीमध्ये त्याची निवड करण्यात आली.
त्यावेळी, ऑस्ट्रेलियात चांगल्या फिरकीपटूंची वानवा असल्याने अवघ्या दोन वर्षात, सात प्रथमश्रेणी सामने खेळल्यावर वॉर्नची ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात वर्णी लागली. सिडनी येथे झालेल्या त्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रवी शास्त्री व सचिन तेंडुलकर यांनी वॉर्नची चांगली शिकवणी घेतली. त्याच्या ४५ षटकात १५० धावा कुटल्या गेल्या व अखेरीस त्यानेच शास्त्री यांना द्विशतकानंतर बाद केले. पुढच्या एॅडलेब कसोटीत तो एकही बळी मिळू शकला नाही. परिणामी, मालिकेच्या अखेरच्या सामन्यातून त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला. पदार्पणातच भारताच्या अनुभवी खेळाडूंनी त्याचा चांगलाच घाम काढला. पुढच्या श्रीलंका दौऱ्यात त्याने बर्यापैकी कामगिरी करत, १९९३ ऍशेस संघात जागा मिळवली.
त्या ऍशेजमधील त्याचा पहिला चेंडू “शतकातील सर्वात्तम चेंडू” म्हणून गौरविला गेला. मँचेस्टरच्या मैदानावर इंग्लंडच्या अनुभवी माइक गेटिंगला डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलेल्या चेंडूने इतके वळण घेतले की, तो चेंडू उजव्या यष्टीवरील बेल्स उडवून गेला. त्या संपूर्ण मालिकेत वॉर्नने ३४ बळी मिळवले. याच मालिकेपासून खऱ्या अर्थाने वॉर्न युगाला सुरुवात झाली.
वॉर्नच्या कारकिर्दीत अनेक सुवर्णक्षण आले. प्रत्येक देशात जाऊन वॉर्नने चमकदार कामगिरी केली. १९९९ च्या विश्वचषकात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. १९९४, १९९७ व २००४ साली तो ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ होता. २००० मध्ये विस्डेनने निवडलेल्या शतकातील सर्वोत्तम पाच खेळाडूंमध्ये वॉर्नचा समावेश होता.
आपल्या संपूर्ण कारकीर्दीत वॉर्नचे भारताचा सचिन तेंडुलकर व वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्याशी कायम द्वंद राहिले. १९९८ च्या शारजा येथील कोकाकोला कपच्या अंतिम सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या तडाखेबंद शतकी खेळीनंतर वॉर्नने कबूल केले होते की, सचिन रात्री त्याच्या स्वप्नात येत.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत दरम्यान वॉर्न अनेकदा वादात अडकला. १९९५ मध्ये मार्क वॉसोबत सट्टेबाजांना भेटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. १९९९ विश्वचषकआधी अर्जुन रणतुंगा सोबत झालेल्या वादामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याच वर्षी, इंग्लंडमधील एका नर्सला अश्लील संदेश पाठवल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले होते. तसेच, २००३ विश्वचषक सुरु होण्याच्या ऐन आधी, अमली पदार्थाचे सेवन करतो म्हणून विश्वचषकातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी यांच्या नावे १,००१ बळी होते. कसोटीत सर्वप्रथम ७०० बळींचा टप्पा वॉर्नने गाठला. त्याच्या नावे कसोटीत ७०८ तर वनडेमध्ये २९३ बळींची नोंद आहे. मुथय्या मुरलीधरननंतर, एक हजार आंतरराष्ट्रीय बळी मिळवणारा तो एकमेव गोलंदाज होता. याच सोबत एकही शतक न करता ३,००० कसोटी धावा फटकावण्याचा पराक्रम देखील त्याच्या नावे आहे. २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाला ५-० ने ऍशेज जिंकवत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. ऑस्ट्रेलियाच्या व जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील एक पर्व त्यादिवशी समाप्त झाले होते.
क्रिकेट आणि आपल्या फिरकी गोलंदाजी विषयी सांगताना वॉर्न म्हणतो,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मी चेंडू कसा वळवतो हे मलाच माहीत नाही. ही कला दैवयोगाने माझ्याकडे आली आणि मला क्रिकेटविषयी आवड निर्माण झाली. क्रिकेटच माझे सर्वस्व होते, आहे आणि राहील.”
२००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघाचा कर्णधार नियुक्त केले. ग्रॅम स्मिथ वगळता इतर सर्व नवख्या खेळाडूंना सोबत घेऊन टी२० या क्रिकेटच्या नव्या प्रकारात त्याने राजस्थान रॉयल्सला अजिंक्यपद मिळवून दिले. रवींद्र जडेजा, युसुफ पठाण हे भारतीय क्रिकेटला मिळालेले हिरे वॉर्ननेच पहिल्यांदा पारखले होते. रिची बेनो म्हटल्याप्रमाणे, “वॉर्न हा ऑस्ट्रेलियाला न लाभलेला सर्वोत्तम कर्णधार आहे.” ही गोष्ट त्याने खरी करून दाखवली.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत वादग्रस्त ठरला तरी वॉर्न एक संवेदनशील व्यक्ती म्हणून परिचित आहे. २००४ मध्ये ‘शेन वॉर्न फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेची स्थापना करून, त्याद्वारे दुर्धर आजाराने ग्रासलेल्या लहान मुलांची तो मदत करत असतो. २०२० च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या लोकांसाठी त्याने आपल्या ‘हॉल ऑफ फेम’ टोपीचा लिलाव करून मोठी रक्कम उभी केली होती.
मैदानावर आणि मैदानाबाहेर कितीही वादग्रस्त राहिला असला तरी मुरलीधरन, कुंबळे यांसारख्या महान फिरकी गोलंदाजांसोबत स्पर्धा असतानादेखील, वॉर्नने आपले वेगळेपण जपत संपूर्ण जगातील क्रिकेटरसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
वाचा-
-दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
-हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार