रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अखेरचा साखळी सामना खेळला गेला. या सामन्यात भारत विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने होते. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 160 धावांनी विजय मिळवला. साखळी फेरीच्या या सामन्यांनंतर आता उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने खेळले जातील. तत्पूर्वी, साखळी फेरीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंच्या प्लेईंग 11 वर आपण नजर टाकूया.
1. रोहित शर्मा (कर्णधार)- भारतीय कर्णधार रोहित शर्मा या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. त्याने 9 सामन्यात फलंदाजी करताना 55.88च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. रोहितने या धावा करताना 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. संपूर्ण स्पर्धेत तो भारतीय संघाला आक्रमक सुरुवात देण्यात यशस्वी ठरला. तो या संघाचा कर्णधार देखील असेल.
2. क्विंटन डी कॉक- दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-सलामीवीर क्विंटन डी कॉक याने आपल्या जबरदस्त फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 9 सामन्यात 65.66च्या सरासरीने 591 धावा केल्या आहेत. डी कॉकने स्पर्धेत सर्वाधिक 4 शतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे या विश्वाचषकानंतर तो निवृत्त होणार आहे.
3. रचिन रवींद्र- या विश्वचषकात संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेणारा फलंदाज म्हणजे न्यूझीलंडचा रचिन रवींद्र. त्याने कधी सलामी तर कधी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 9 सामन्यात 70.62च्या सरासरीने 565 धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने या धावा करताना 2 अर्धशतके आणि 3 शतके ठोकली आहेत. त्याबरोबरच तो डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी देखील करू शकतो.
4. विराट कोहली- विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली देखील या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. त्याने 9 सामन्यात 99च्या सरासरीने सर्वाधिक 594 धावा केल्या आहेत. विराटने या धावा करताना 2 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्याकडे उपांत्य व अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकरचा एका विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी असेल.
5. हेन्रिक क्लासेन- दक्षिण आफ्रिका संघाने या विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करताना साखळी फेरीत दुसरे स्थान पटकावले. दक्षिण आफ्रिका संघासाठी मधल्या फळीत फलंदाजीला येत आक्रमक फटकेबाजी करण्याची जबाबदारी हेन्रिक क्लासेन याने घेतली. त्याने 9 सामन्यांमध्ये 40.65 च्या सरासरीने 326 धावा केल्या. यामध्ये एक शतक व एका अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 140 असा राहिला.
6. ग्लेन मॅक्सवेल- या संपूर्ण विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाची सांघिक कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. मात्र, त्यांचा प्रमुख अष्टपैलू असलेल्या ग्लेन मॅक्सवेल याने दोन असामान्य खेळ्या करत या विश्वचषकात धुमाकूळ घातला. त्याने केवळ 40 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले. तर अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 201 धावांची वनडे इतिहासातील सर्वोत्तम खेळी केली. त्याने या विश्वचषकात सर्वाधिक 152 च्या स्ट्राईक रेट ने 397 धावा लुटल्या आहेत. यासोबतच 5 बळी देखील त्याने मिळवले.
7. मार्को जेन्सन- आपला पहिलाच विश्वचषक खेळत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू मार्को जेन्सन याने गोलंदाजी व फलंदाजी अशा दोन्ही विभागात आपले उपयुक्त योगदान दिले. त्याने 8 सामने खेळताना आत्तापर्यंत 17 बळी मिळवले आहेत. तसेच संघाला गरज असताना महत्त्वपूर्ण 157 धावा देखील केलेल्या आहेत. यासोबतच तो क्षेत्ररक्षक म्हणून देखील दमदार कामगिरी करताना दिसला.
8. जसप्रीत बुमराह- भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा प्रमुख जसप्रीत बुमराह हादेखील या संघाचा भाग आहे. त्याने 9 सामन्यात गोलंदाजी करताना 3.65 या शानदार इकॉनॉमी रेटने 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 1 वेळा डावात 4 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे. तसेच, 39 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
9. ऍडम झम्पा- ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पा आतापर्यंत या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने 9 सामन्यात गोलंदाजी करताना 5.26च्या इकॉनॉमीने सर्वाधिक 22 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 3 वेळा एका डावात 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 8 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
10. दिलशान मधुशंका- श्रीलंका संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले असले तरी त्यांचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याने कमाल केली आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने 9 सामन्यात गोलंदाजी करताना 6.70च्या इकॉनॉमी रेटने 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने स्पर्धेत डावात 1 वेळा 4 विकेट्स आणि 1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
11. मोहम्मद शमी- भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा विश्वचषकात चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्या चार सामन्यात बाकावर बसल्यानंतर त्याला पाचव्या सामन्यात संधी मिळाली. त्याने केवळ पाच सामन्यांमध्ये 16 बळी मिळवताना एकदा चार तर दोन वेळा पाच बळी घेण्याची किमया केली.
(2023 ODI World Cup League Stage Best XI Four Indians There)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशी परतताच पाकिस्तान संघाला जोरदार धक्का! वर्ल्डकपमधील सुमार कामगिरीनंतर आला पहिला राजीनामा
गुरबाजने केलेली अहमदाबादच्या गरीब लोकांची मदत; पाहून शशी थरूरही म्हणाले, ‘हृदयासारखं तुझं करिअरही…’