नुकताच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली आणि जेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेत डेविड वॉर्नर, बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान सारख्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तसेच टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अशाही काही वैयक्तिक खेळी होत्या, ज्याची गणना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक खेळीमध्ये केली जाते. या लेखात आपण टी२० विश्वचषक २०२१ मध्ये खेळलेल्या सर्वोत्तम ३ खेळींबद्दल आढावा घेऊ.
३) मिशेल मार्श – ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आणि न्यूझीलंड संघाला पराभूत करत जेतेपद मिळवले. हे जेतेपद मिळवून देण्यात काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. यातही मिशेल मार्शने अंतिम सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली आणि तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने ५० चेंडूंमध्ये नाबाद ७७ धावांची खेळी केली. त्याने या खेळी दरम्यान ६ चौकार आणि ४ षटकार मारले होते. या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
२) केन विलियम्सन – न्यूझीलंड संघाने पहिल्यांदाच आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. असे वाटत होते की, न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात विजय मिळवणार. परंतु, ऑस्ट्रेलिया संघाने हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. न्यूझीलंड संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला, तरीदेखील न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन याने आपल्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या सामन्यात केन विलियम्सनने संथ गतीने सुरुवात केली. त्यानंतर फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. त्याने ४८ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ८५ धावांची खेळी केली.
१) जोस बटलर – आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अनेक अशा अप्रतिम खेळी पाहायला मिळाल्या. परंतु, सर्वोच्च स्थानी राहिली ती म्हणजे जोस बटलरची खेळी. जोस बटलरने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ज्यावेळी इंग्लंड संघ अडचणीत होता, त्यावेळी जोस बटलरने इंग्लंड संघाला अडचणीतून बाहेर काढले होते. त्याने या डावातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि आपले शतक साजरे केले होते. त्याने ६७ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ६ षटकारांचा साहाय्याने १०१ धावांची नाबाद खेळी केली होती. शेवटी इंग्लंड संघाने या सामन्यात २६ धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल द्रविडचे कसे आहे प्रशिक्षण, प्रश्नावर आर अश्विनचे स्पष्ट उत्तर; म्हणाला…
मोठ्या मनाचा द्रविड!! सामन्यानंतर केले असे काही की, व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ