आयसीसीतर्फे आयोजित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. हा सामना साऊथॅम्प्टनमधील रोझ बाऊल येथे खेळला जाईल. न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडमध्ये पोहोचून आधीच तयारी सुरू केली आहे, तर भारतीय संघ देखील इंग्लंडला रवाना झाला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांचा चांगला प्रवास झाला आहे. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यातही हे दोन्ही संघ चांगले खेळून ही करंडक जिंकण्याचा प्रयत्न करतील.
कर्णधार केन विलियम्सनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने या चॅम्पियनशिपमध्ये अधिक चांगली कामगिरी केली असून विलियम्सनने अंतिम सामन्यातही कर्णधार आणि फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा केली जाईल. न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सन हा संघाच्या फलंदाजीतील सर्वात महत्वाची कडी आहे, त्यामुळे त्याला बाद करण्यासही भारतीय गोलंदाजांना विशेष योजना करावी लागेल.
सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत केन विलियम्सन हा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. या फलंदाजाला भारताच्या अनेक गोलंदाजांनी बळी ठरवले आहे आणि प्रज्ञान ओझाने सर्वात जास्त पाच वेळा केन विलियम्सनला बाद केले आहे. या लेखात आपण ३ अशा भारतीय गोलंदाजांचा आढावा घेऊ जे सध्या संघात खेळत असून त्यांनी कसोटीत विलियम्सन सर्वाधिकवेळा बाद केले आहे.
3. मोहम्मद शमी
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी स्वरूपात न्यूझीलंडचा महान खेळाडू केन विलियम्सनची दोनदा विकेट घेतली आहे. 2014 मध्ये खेळलेल्या वेलिंग्टन कसोटी सामन्यात शमीने पहिल्यांदा विलियम्सनला बाद केले होते. विलियम्सन चांगली फलंदाजी करत होता. पण 47 च्या वैयक्तिक धावांवर शमीने त्याला रोहितच्या हातात झेलबाद करत पवेलियनचा मार्ग दाखविला.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शमीने दुसऱ्यांदा विल्यमसनला बाद केले. ही मालिका न्यूझीलंडमधेच खेळली जात होती. विलियम्सन मालिकेच्या पहिल्या कसोटीत शानदार फलंदाजी करीत होता आणि शतकाच्या जवळ होता. तथापि, तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही आणि शमीने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने जडेजाच्या हातून त्याला झेलबाद केले.
2. जसप्रीत बुमराह
साल 2020 मध्ये न्यूझीलंड दौर्यावरील शेवटच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये जसप्रीत बुमराहने केन विलियम्सनला आपला बळी ठरवले. हा सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळला गेला. सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहने विलियम्सनला पंतच्या हातून झेलबाद केले. पहिल्या डावात त्याने फक्त ३ धावा केल्या. यानंतर, विलियम्सन दुसऱ्या डावातही मोठी खेळी करू शकला नाही आणि बुमराहच्या शॉर्ट बॉलवर फटका मारताना गलीमध्ये उभ्या राहणेच्या हातात झेल देऊन तो झेलबाद झाला.
1. रविचंद्रन अश्विन
भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी स्वरूपात पाच वेळा बाद केले आहे व त्याने ओझाची बरोबरी केली आहे. अश्विनने 2012मध्ये न्यूझीलंडसोबत झालेल्या बंगलोर कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात केन विलियम्सनला प्रथम बाद केले. 2016 मध्ये कानपूर कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अश्विनने विलियम्सनला आपला बळी ठरविला होता. यानंतर त्याच मालिकेच्या अखेरच्या कसोटी सामन्यात त्याने पुन्हा एकदा इंदोरच्या मैदानावरील दोन्ही डावांमध्ये या दिग्गज फलंदाजास पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. अशाप्रकारे अश्विनने आतापर्यंत त्याला एकूण पाच वेळा बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पॅट कमिन्सच्या ऐवजी ‘या’ गोलंदाजांना केकेआर देऊ शकतात उर्वरित आयपीएल २०२१ साठी संधी
‘हॅलो साउथम्पटन’! भारतीय संघाचा ताफा इंग्लंडमध्ये दाखल, बघा खास फोटो
भारताकडे टी२० विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल ऐवजी ‘या’ तीन गोलंदाजांचे आहेत पर्याय