क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. काही खेळाडू तिन्हीमध्येही पारंगत असतात. तर, काहींना या तिन्हीपैंकी एकच गोष्ट खूप चांगली जमते. पण ती त्यांना इतकी चांगली जमते की ते त्याचे बाप असतात.
फलंदाज अनेकदा गोलंदाजीत त्यांचा हात आजमावत असतात. मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही गोलंदाजी केली आहे. तर, रनमशीन विराट कोहलीही गरज पडले तेव्हा गोलंदाजी करतो. यात गोलंदाजही मागे पडत नाही. अनेकदा आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणारे गोलंदाज कधी-कधी बॅटसोबतदेखील असा करिश्मा करतात की, त्यांच्या कामगिरीला पाहून मोठ-मोठ्या फलंदाज आ वासून पाहत राहतात.
अशात, धावा घेताना फलंदाजी करणाऱ्यांसाठी चौकार आणि षटकारांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कारण, जेवढे जास्त चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातात तेवढ्या जास्त धावा बनतात. रोहित शर्मा, ख्रिस गेल, एबी डिविलियर्स यांना त्यांच्या षटकारांसाठी ओळखले जाते. मजेची गोष्ट ही आहे की, खालच्या फळीतील गोलंदाजही फलंदाजीसाठी उतरल्यानंतर षटकार ठोकण्याचा कारनामा करत असतात. झहीर खान, श्रीनाथ, उमेश यादव, हरभजन सिंग यांसारख्या गोलंदाजांनीही षटकार मारण्याची संधी कधी गमावली नाही.
भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूच्या बॅटने षटकार ठोकताना पाहणे सामान्य आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट ही आहे की, भारतीय संघात असेही काही खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही षटकार मारण्याचे भाग्य लाभले नाही. विशेष म्हणजे, या खेळाडूंनी ५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळून एकही षटकार मारलेला नाही.
तर जाणून घेऊया, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही षटकार न मारू न शकणाऱ्या ३ भारतीय खेळाडूंविषयी…
3 Indian Players Cant Hit A Single Six In Their International Career
१. युजवेंद्र चहल
भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही षटकार न मारणारा अभागी खेळाडू आहे. आपल्या ४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत या गोलंदाजाने वनडेत खेळलेल्या ५२ सामन्यांमध्ये ८४ चेंडूंवर फलंदाजी केली आहे. तर, टी२०त ४२ सामन्यात ११ चेंडूंवर आपले फलंदाजी कौशल्य आजमावले आहे. मात्र, चहलला एकही एकदाही षटकार मारता आला नाही. त्याने वनडेतही केवळ ७ चौकार मारले आहेत.
गमतीची गोष्ट ही आहे की, चहल देशांतर्गत क्रिकेटमधील अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १ आणि प्रथम श्रेणी सामन्यात २ असे मिळून ३ षटकार मारण्यात यशस्वी ठरला होता. चहलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील षटकाराची सर्वांना आतुरता आहे.
२. कुलदिप यादव
कुलदिप यादव या चायनामॅन गोलंदाजाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६ कसोटी सामन्यात १६१ चेंडूंचा सामना केला आहे. तर, २१ टी२० सामन्यात १८८ चेंडू आणि ६० वनडे सामन्यात २० चेंडूंवर फलंदाजी केली आहे. मात्र, हा फिरकीपटू त्याच्या ८७ आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही षटकार मारु शकला नाही. परंतु, त्याने तिन्ही स्वरुपात मिळून एकूण २८ चौकार मारले आहेत.
विशेष म्हणजे, यादवने त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीत प्रथम श्रेणी सामन्यात ६ षटकार ठोकले आहेत. एवढेच नाही तर, त्याने प्रथम श्रेणीत १ शतक, ६ अर्धशतके आणि १०७ चौकार मारले आहेत.
३. इशांत शर्मा
भारताचा अफलातून वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा त्याच्या गोलंदाजीसह फलंदाजीतही थोडाफार पारंगत आहे. त्याने ९७ कसोटी सामन्यात २४०० चेंडूंचा बॅट घेऊन सामना केला आहे. तो कसोटीत सर्वाधिक ५७ धावा करु शकला. यात उल्लेखनीय ८१ चौकारही मारु शकला. परंतु, त्याला कसोटीत एकही षटकार मारता आले नाही. शिवाय, या दमदार गोलंदाजाने ८० वनडे सामन्यात २०३ चेंडू आणि १४ टी२० सामन्यात ९ चेंडूंवर फलंदाजी केली आहे. मात्र, शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही षटकार मारण्यात यश आले नाही.
गमतीचा भाग हा आहे की, इशांतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण ६ षटकार मारले आहेत.
ट्रेंडिंग लेख-
युवराजबरोबर क्रिकेट खेळलेले ‘ते’ ७ खेळाडू, जे फारसे कुणाला नाही आता माहित
‘या’ भारतीय खेळाडूंनी सलामीला फलंदाजी केली असती, तर लावला…
पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेणाऱ्या श्रीलंकेच्या ‘या’…