---Advertisement---

असे ‘३’ खेळाडू जे घेऊ शकतात बुमराह- भुवनेश्वर- शमी या भारतीय संघाच्या तिकडीची जागा

On: रविवार, जुलै 5, 2020 3:51 PM
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये सध्याच्या काळात जेव्हाही वेगवान गोलंदाजांबद्दल चर्चा होते, तेव्हा भारतीय गोलंदाजांचे नाव आवर्जून घेतले जाते. सध्याच्या काळात अनेक दिग्गज खेळाडूंनी भारताच्या वेगवान गोलंदाजी फळीची नेहमीच प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर त्यांची तुलना ७० च्या दशतकातील वेस्ट इंडिज संघाच्या वेगवान गोलंदाजांशी केली आहे.

सध्या भारतीय संघाच्या ताफ्यात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांसारखे घातक गोलंदाज आहेत. अशामध्ये आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की येत्या काळात असे कोणते गोलंदाज आहेत, जे या गोलंदाजांची जागा घेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतात.

आज या लेखात आपण भारतीय संघाच्या त्या ३ युवा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे येत्या काळात भारतीय संघात बुमराह, शमी आणि भुवनेश्वरची जागा घेऊ शकतात.

३. प्रसिद्ध कृष्णा

कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) मागील काही काळापासून आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. देशांतर्गत स्तरावर चांगली कामगिरी करण्याव्यतिरिक्त मागील २ आयपीएल मोसमात केलेल्या कामगिरीनेही सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आपल्या संघासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कृष्णाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या कर्नाटकला संघाला विजय मिळवून दिला. खरंतर शेवटच्या षटकात तमिळनाडूला विजयासाठी १४ धावांची आवश्यकता होती. परंतु कृष्णाने उत्तम गोलंदाजी करत आपल्या संघाला १ धावेने विजय मिळवून दिला.

कृष्णाला टी२०तील चांगल्या गोलंदाजांपैकी एक मानले जाते. देशांतर्गत आकडेवारी पाहिली, तर कृष्णाने आतापर्यंत खेळलेल्या ९ प्रथम श्रेणी सामन्यात २०.२६ च्या सरासरीने ३४ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याचबरोबर ४१ अ दर्जाच्या सामन्यात ६७ व देशांतर्गत टी२० क्रिकेटमधील २८ सामन्यात २४ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. जर या प्रतिभावान गोलंदाजाला संधी मिळाली, तर तो भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करण्याची क्षमता ठेवतो.

२. आवेश खान

मध्यप्रदेश क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोंलदाज आवेश खान (Avesh Khan) याचादेखील त्या गोलंदाजांच्या यादीत समावेश आहे, ज्यांना भारतीय संघाच्या गोलंदाजी फळीचे भविष्य समजले जाऊ शकते. आवेशने मागील काही काळात उत्कृष्ट कामगिरी करत प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केेले आहे.

आवेशने आतापर्यंत २२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने २३.०१ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर १६ अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ५२.३० च्या सरासरीेने १० विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्ये त्याने २१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३५.३३ च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या आहेत.

देशांतर्गत स्तरावर आवेशची कामगिरी पाहून २०१७ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला आपल्या संघात सामील केले होते. त्यात त्याला केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने १ विकेट घेतली. यानंतर २०१८मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला ७० लाख रूपयांना संघात सामील केले होते. या युवा गोलंदाजामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर आपल्या संघासाठी मॅच विनर खेळाडू बनत देशाचे नाव रोशन करण्याची क्षमता आहे.

१. शिवम मावी

पृथ्वी शॉच्या नेतृत्वात १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi) १४० किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. मावीने १९ वर्षांखालील विश्वचषकात उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या मावी आता भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे. मावीला कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१८मध्ये आपल्या संघात सामील केले होते. यामध्ये मावीने ९ सामने खेळत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

मावीने आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत ६ प्रथम श्रेणी, १६ अ दर्जाचे आणि ९ देशांतर्गत टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने प्रथम श्रेणी सामन्यात २१.६० च्या सरासरीने २५ विकेट्स घेतल्या आहेत. अ दर्जाच्या सामन्यात त्याने २७.८१ च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत टी२० सामन्यात त्याने ५४ च्या सरासरीने ५ विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---