आयपीएल २०२० ला यूएईमध्ये १९ सप्टेंबर रोजी धमाकेदार सुरुवात झाली. पहिला सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात झाला आणि त्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार झुंज झाली. शारजाह येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात षटकारांचा वर्षाव झाला. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांकडून ३३ षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला.
राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनने एकट्याने ९ षटकार ठोकले आणि अवघ्या १९ चेंडूत आपके अर्धशतक पूर्ण केले. त्याचवेळी जोफ्रा आर्चरनेही एका षटकात ४ षटकार ठोकले. चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलायचे झाले तर फाफ डू प्लेसीने शेवटच्या षटकात जबरदस्त षटकार ठोकले. शेवटच्या षटकात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने सलग ३ षटकार ठोकले. या षटकारांपैकी एक षटकार इतका लांब होता की तो मैदानबाहेरील रस्त्यावर पडला. आयपीएलच्या या सामन्यात राजस्थान संघाकडून १७ षटकार तर चेन्नई संघाकडून १६ असे एकूण ३३ षटकार ठोकले गेले.
संजू सॅमसनने ३२ चेंडूत ७४ धावांचा तडाखा दिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने सामन्यात पुनरागमन केले आणि राजस्थान संघाला अधिक धावा करण्यापासून रोखले, परंतु डावातील शेवटचा म्हणजे २० वे षटक सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरले. सीएसकेचा गोलंदाज लुंगी एन्गिडीच्या त्या षटकात जोफ्रा आर्चरने जबरदस्त फलंदाजी केली आणि राजस्थान संघाला २१६ धावांपर्यंत नेऊन ठेवले. या सामन्यात चेन्नई संघाला पराभव पत्करावा लागला.
एन्गिडीने टाकलेले हे शेवटचे षटक आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या २० व्या षटकांपैकी एक ठरले. या लेखात आयपीएलच्या इतिहासातील २० व्या षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या ३ गोलंदाजांविषयी बोलू. तर मग जाणून घेऊया या यादीमध्ये गोलंदाज कोण आहेत.
आयपीएलच्या इतिहासात २० व्या षटकात या ३ गोलंदाजांनी दिल्यात सर्वाधिक धावा
३. लुंगी एन्गिडी – ३० धावा
२२ सप्टेंबर रोजी झालेल्या चेन्नई विरुद्ध राजस्थान सामन्यात चेन्नईच्या लुंगी एन्गिडीने टाकलेल्या २० व्या षटकापूर्वी चेन्नई सुपर किंग्जची स्थिती चांगली होती. पण एन्गिडीच्या शेवटच्या षटकाने संपूर्ण सामन्याचे चित्र बदलले. या २० व्या षटकात गोलंदाजी करण्यापूर्वी लुंगी एन्गिडीने २ षटकांत २४ धावा देऊन १ बळी टिपला होता. पण शेवटच्या षटकात त्याने तब्बल ३० धावा खर्च केल्या.
जोफ्रा आर्चरने त्याच्या षटकात ४ षटकार ठोकले आणि यापैकी २ षटकार नो बॉलवर ठोकले. त्यामुळे फक्त २ चेंडूत २६ धावा दिल्या. मात्र तिसऱ्या चेंडूनंतर त्याने आपली गोलंदाजी सुधारली आणि एकूण ३० धावा दिल्या. अशा प्रकारे त्याच्या षटकात ३० धावा देत तो या नकोशा असलेल्या यादीत सामील झाला.
२. ख्रिस जॉर्डन – ३० धावा
किंग्ज इलेव्हन पंजाबचा आघाडीचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डननेही याच हंगामात हा विक्रम नोंदविला आहे. दिल्ली कॅपिटल सोबत झालेल्या सामन्यादरम्यान त्याने २० व्या षटकात ३० धावा दिल्या. दिल्ली कॅपिटलच्या अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोईनिसने त्याच्या चेंडूंवर चौकार आणि षटकार ठोकले. या षटकात स्टोइनिस आणि एन्रीच नॉर्किए यांनी एकूण ३० धावा केल्या. त्यामुळे जॉर्डनचे नावही या नकोशा यादीत आले.
१. अशोक दिंडा – ३० धावा
या यादीत पहिल्या क्रमांकावर वेगवान गोलंदाज अशोक दिंडा आहे. २०१७ च्या आयपीएल हंगामात अशोक दिंडा राईझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा एक भाग होता आणि त्या मोसमात संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान दिंडा खूपच महागडा ठरला. त्याने टाकलेल्या २० व्या षटकात हार्दिक पंड्याने ३० धावा ठोकल्या.