आयपीएलच्या प्रत्येक मोसमात आपल्याला अनेक रोमांचक सामने पाहायला मिळतात. आयपीएलचा प्रत्येक सामना रोमांचाच्या सर्व मर्यादा ओलांडतो. चाहत्यांना अनेक चौकार आणि षटकार पाहायला मिळतात, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त गोलंदाजी या सर्व गोष्टीही त्याच सामन्यात पाहायला मिळतात.
या लेखात, आपण अशा तीन अंतिम सामन्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे अतिशय रोमांचक झाले होते. यातील दोन सामने तर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळले गेले होते आणि त्यानंतर त्या हंगामातील विजेत्याचा निर्णय झाला होता. यावरून हे सामना किती रोमांचक झाले असावे याची आपल्याला कल्पना येत असेल. ते अंतिम सामने कोणते होते याबद्दल जाणून घेऊ या.
१. कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स, २०१४
आयपीएल २०१४ चा हा अंतिम सामना खूप रोमांचक झाला होता. ही लढत केवळ दोन संघांमध्येच नाही, तर दोन बॉलिवूड स्टार्समध्येही देखील होती. एका बाजूला शाहरुख खानच्या सहमालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स होता आणि दुसरीकडे प्रीती झिंटाच्या सहमालकीचा पंजाब किंग्स.
प्रथम खेळताना पंजाब किंग्सने ४ गडी बाद १९९ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, वृद्धिमान साहाच्या ५५ चेंडूत नाबाद ११५ आणि मनन वोहराच्या जबरदस्त ६७ धावा यामुळे पंजाब ही धावसंख्या उभारू शकली. अंतिम सामना पाहता, हे लक्ष्य खूप मोठे होते आणि त्यात केकेआरच्या संघाचे सामन्याच्या सुरुवातीला एकापाठोपाठ एक गडी बाद झाल्याने, संघ संकटात सापडला होता.
पण, मधल्या फळीत मनीष पांडेने अवघ्या ५० चेंडूत ९४ धावा केल्या, तर युसूफ पठाणने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. याव्यतिरिक्त, पियुष चावलाने शेवटी ५ चेंडूत १४ धावांची शानदार खेळी केली आणि २० व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिले.
२. मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्स, २०१७
आयपीएल २०१७ च्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा फक्त १ धावांनी पराभव केला होता.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला निर्धारित २० षटकांत केवळ १२८ धावा करता आल्या. यानंतर असे वाटत होते की पुण्याचा संघ हा सामना एकतर्फी जिंकेल. लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर अजिंक्य रहाणेने रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी ५१ धावा केल्या. पुण्याची धावसंख्या १६.२ षटकांत तीन गडी बाद ९८ धावा अशी होती आणि त्यांना विजयासाठी २२ चेंडूत फक्त ३१ धावांची गरज होती आणि ७ विकेट्स देखील बाकी होत्या.
मात्र, यानंतर सामन्यात ट्विस्ट येऊ लागले. ४४ धावा केल्यावर स्टीव्ह स्मिथ बाद झाला, तेव्हा संघाच्या १२३ झाल्या होत्या आणि त्यामुळे सामना बऱ्यापैकी रोमांचक झाला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. रायझिंग पुणे सुपरजायंट्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती.
सुपरजायंट्सचा फलंदाज डॅनियल ख्रिश्चियनने शेवटच्या चेंडूवर लेग साईडला शॉट खेळला आणि दोन धावा केल्या, पण जगदीशन सुचितने लगेच चेंडू यष्टीरक्षक पार्थिव पटेलकडे फेकला. चेंडू पार्थिवपासून थोडा दूर होता तरी त्याने उत्कृष्टपणे फलंदाजाला बाद केले, आणि अशा प्रकारे मुंबई इंडियन्सने हा सामना फक्त एका धावेने जिंकला आणि तिसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकला.
३. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – २०१९
आयपीएलच्या दोन दिग्गज संघांमधील हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चालला. या सामन्यांत दोन्ही संघांचा चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याची संधी होती.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ८ विकेटवर १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज होती. शेन वॉटसन ८० धावांवर खेळत होता, पण तो बाद झाल्यानंतर सामन्याची परिस्थिती बदलली. सीएसकेला शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी २ धावांची गरज होती. पण लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकूरला पायचीत बाद करत मुंबई इंडियन्सला विक्रमी चौथ्यांदा विजेतेपद मिळवून दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
डीआरएस असता तर आणखी किती विकेट्स झाल्या असत्या? व्हि़डिओ शेअर करत वॉर्नने मारली कोपरखळी
प्ले ऑफपूर्वी चेन्नईला बसू शकतो मोठा धक्का; ‘हा’ स्टार फलंदाज होऊ शकतो स्पर्धेतून बाहेर
बड्डे आहे भावाचा..! चेन्नईच्या ताफ्यात ब्रावोचा वाढदिवस जल्लोषात साजरा, व्हिडिओ तूफान व्हायरल