आयपीएलच्या प्रत्येक हंगामात आपल्याला अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. आयपीएलचा प्रत्येक सामना हा मनोरंजकच असतो. षटकार-चौकरांची आतिषबाजी, उत्तम क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त गोलंदाजी आयपीएलमध्ये बघायला मिळते.
आयपीएल ही एक स्पर्धा आहे जिथे देश-परदेशातील अनुभवी आणि युवा खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. बर्याच वेळा असे घडते की एक संघ सुरुवातीला सामना जिंकेल असे वाटते परंतु, शेवटच्या क्षणी अचानक सामन्याचे चित्र बदलते आणि दुसरा संघ सामना जिंकतो.
आयपीएलमध्ये अनेक रोमांचक अंतिम सामने देखील पाहायला मिळाले. जेव्हा अंतिम सामना रोमांचक असतो तेव्हा त्याची मजा दुप्पट होते. या लेखातील अशाच ३ अंतिम सामन्यांविषयी जाणून घेऊ जे खूप रोमांचक होते. यातील दोन सामान्यांचा निर्णय शेवटच्या २ चेंडूवर ठरला. ते अंतिम सामने कोणते आहेत ते पाहूया.
आयपीएलमधील हे ३ अंतिम सामने झाले सर्वात रोमांचक
३. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – २०१४
आयपीएल २०१४ चा हा अंतिम सामना खूप रोमांचक होता. यात दोन संघच नव्हे तर बॉलिवूडमधील दोन स्टार यांच्यातही झगडा होता. एकीकडे शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्स संघ तर दुसरीकडे प्रीती झिंटाचा किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ होता.
या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत किंग्ज इलेव्हन पंजाबने वृद्धीमान साहाच्या ५५ चेंडूत नाबाद ११५ आणि मनन वोहराच्या ६७ धावांच्या बदल्यात ४ गडी गमावून १९९ धावांची मोठी धावसंख्या उभारली. तसे, अंतिम सामना पाहता हे लक्ष्य बरेच मोठे होते.
कोलकाता संघाने १९९ धावांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली, परंतु सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाले. नंतर मधल्या फळीत मनीष पांडेने डाव सावरत केवळ ५० चेंडूंत ९४ धावा केल्या आणि युसुफ पठाणने २२ चेंडूंत ३६ धावा केल्या. त्याशिवाय शेवटी पियुष चावलाने ५ चेंडूत १३ धावा केल्या आणि शेवटच्या २० व्या षटकातील तिसर्या चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजेतेपद मिळवून दिले. आयपीएलच्या इतिहासातील हा एक सर्वात रोमांचक सामना होता.
२. मुंबई इंडियन्स विरुद्ध राइजिंग पुणे सुपरजायंट्स – २०१७
आयपीएल २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स आणि राइजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात अंतिम सामना खेळाला गेला. या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वातील राइझिंग पुणे सुपरजायंट्सला अवघ्या १ धावेने पराभूत केले. या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित २० षटकांत केवळ १२८ धावा केल्या. या सामन्यात पुण्याचा संघ एकतर्फी जिंकेल असे वाटत होते.
प्रत्युत्तरादाखल सलामीवीर अजिंक्य रहाणेने रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून ५१ धावा केल्या. पुण्याची धावसंख्या १६.२ षटकांत ९८/३ अशी होती आणि त्यांना विजयासाठी २२ चेंडूंमध्ये फक्त ३१ धावांची आवश्यकता होती. त्यांचे अजून ७ फलंदाज शिल्लक होते.
परंतु येथून सामन्याची बाजू पालटली. स्टीव्ह स्मिथ संघाची १२३ अशी धावसंख्या असताना ४४ धावा करून बाद झाला आणि सामना रोमांचक होऊ लागला. अगदी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला. रायझिंग पुणे सुपरजायंट्सला अंतिम चेंडूवर विजय मिळवण्यासाठी ३ धावांची आवश्यकता होती.
सुपरजायंट्सचा फलंदाज डॅनियल ख्रिश्चनने शेवटचा चेंडू लेग साईडला टोलवला आणि दोन धावा घेण्यासाठी धावले पण जगदीशन सुचितने चपळाईने चेंडू यष्टीरक्षक पार्थिव पटेलकडे फेकला. परंतु चेंडू पार्थिवपासून थोडा दूर होता पण त्याने कोणतीही चूक न करता फलंदाजाला बाद केले आणि अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने हा सामना १ धावांनी जिंकून तिसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकला.
१. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – २०१९
आयपीएलच्या दोन बलाढ्य संघांमध्ये हा अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. या सामन्यातील शेवटचा चेंडूने चौथ्यांदा आयपीएल चषक कोण जिंकणार हे निश्चित केले. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत ८ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावा केल्या.मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला अखेरच्या षटकात विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती.
शेन वॉटसन ८० धावांवर खेळत होता पण तो बाद झाला आणि सामन्याची स्थिती बदलली. अंतिम चेंडूवर विजयासाठी सीएसकेला २ धावांची आवश्यकता होती परंतु लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकूरला पायचीत बाद केले आणि मुंबई इंडियन्सला चौथ्यांदा विजेतेपद मिळवून दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी; या ४ भारतीयांचा आहे समावेश
कोणाला आहे यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्याची सर्वाधिक संधी? गावसकरांनी वर्तवला अंदाज
“मैदानातील कट्टर वैरी असलो तरी…”, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सचिन तेंडुलकरसाठी ‘या’ दिग्गजाचा संदेश