काही दिवसांपूर्वीच इंडियन लीजेंड्स संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली पहिल्या वहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ स्पर्धेत विजय मिळवला होता. इंडियन लीजेंड्स संघाने श्रीलंकन लीजेंड्स संघाला अंतिम फेरीत १४ धावांनी पराभूत केले होते. मात्र दुर्दैवाने या स्पर्धेतून परतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिनला कोरोनाची लागण झाली होती. ही बातमी ऐकताच दिग्गज पाकिस्तानी खेळाडूला राहवले नाही. सचिनला मैदानातील वैरी मानणाऱ्या या खेळाडूने एक फोटो शेअर करत सचिन लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मधून परतल्यानंतर,सचिन तेंडुलकरची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यानंतर मास्टर ब्लास्टर लवकर ठीक व्हावे यासाठी अनेक दिग्गज खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांनी प्रार्थना केली होती.यामध्ये आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. भारत आणि पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात एकमेकांचे कट्टर वैरी असणाऱ्या पाकिस्तानी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर याने सचिन तेंडुलकर सोबतचा एक जुना फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ,”क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही माझ्या आवडत्या वैरी मधून एक आहात तेंडुलकर..तुम्ही लवकर ठीक व्हा..”, असे लिहिले आहे.
सचिनला झाला आहे कोरोना
कोरोना झाल्याची माहिती सचिनने स्वतःच दिली होती. तो म्हणाला होता, “मी सतत कोव्हिड चाचणी करत होतो.तसेच योग्य ती काळजी देखील घेत होतो जेणेकरून मला याचे संक्रमण होणार नाही. परंतु आज (२७ मार्च) सौम्य लक्षणांसह माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आहेत. मी घरीच विलग्नवासात आहे. तसेच डॉक्टरांनी आखून दिलेल्या सर्व नियमांचे मी पालन करत आहे. देशभरातून माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. सर्वांनी आपली काळजी घ्या.”
इतर खेळाडूही आले आहेत कोरोना पॉझिटिव्ह
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ मालिका लखनऊच्या शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खेळवण्यात आली होती. या मालिकेतून परतल्यानंतर,सचिन तेंडुलकर सह, एस बद्रीनाथ, इरफान पठाण आणि युसुफ पठाण हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे सगळेच खेळाडू आता विलगीकरणात उपचार घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मुंबई इंडियन्ससह या तीन बलाढ्य टीम्सला मोठा धक्का, चार खेळाडू पहिल्या काही सामन्यातून बाहेर
तर सचिन-गांगुली भारतीय संघात दिसलेच नसते, पाहा विरेंद्र सेहवगाने कुणावर साधलाय निशाणा
आयपीएलमधून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरने दिल्लीच्या नवनियुक्त कर्णधार रिषभ पंतला अशा दिल्या शुभेच्छा