आयपीएलला जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीगचा दर्जा प्राप्त आहे. देश आणि जगातील सर्व फलंदाज या स्पर्धेत जातात. तथापि, काही मोजकेच खेळाडू आहेत ज्यांनी आपली छाप सोडली आहे. ही स्पर्धा अतिशय कठीण असल्याचे म्हटले जाते, कारण केवळ भारतातच नाही तर जगभरातील इतर संघांचे खेळाडूदेखील खेळतात. यामुळेच आयपीएलमध्ये सर्वाधिक थरार निर्माण होतो. आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर ज्यांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली, त्यांना अनेक पुरस्कार देण्यात येतात. यात ऑरेंज कॅप देखील आहे.
बीसीसीआय आणि आयपीएलची आयोजक समिती निश्चित रकमेसह लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप देते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आयपीएल जरी इंडियन प्रीमियर लीग असला तरी, भारतीय खेळाडूला ऑरेंज कॅप मिळाली असे फक्त 4 वेळा झाले आहे.
आयपीएलच्या 13 वर्षांच्या इतिहासात, ऑरेंज कॅप मिळवणारे बरेच परदेशी खेळाडू आहेत. वेस्ट इंडिजचा तुफानी सलामीवीर ख्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर असे खेळाडू आहेत जे एकापेक्षा जास्त वेळा ऑरेंज कॅप मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. आज आपण त्याच खेळाडूंबद्दल चर्चा करू ज्यांना आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आयपीएल 2008 – शॉन मार्श
ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शने आयपीएलच्या पहिल्या सत्रात चांगली सुरुवात केली आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी) फ्रँचायझीसाठी 616 धावा केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला त्यावेळी लिलावात कोणीही विकत घेतले नव्हते, परंतु बदली म्हणून आलेल्या या फलंदाजाने आपला प्रभाव दाखवला.
आयपीएल 2009 – मॅथ्यू हेडन
मोठे फटके मारणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू हेडन आयपीएलच्या दुसर्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएल 2009 मध्ये मॅथ्यू हेडनने चेन्नई सुपर किंग्जकडून 572 धावा केल्या. तथापि, संघाने जेतेपद मिळवले नाही.
आयपीएल 2010 – सचिन तेंडुलकर
जगातील एक महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कारकीर्दीत फक्त एक टी20 आंतरराष्ट्रीय खेळला आहे, परंतु टी20 क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सचा तो यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएलच्या तिसर्या सत्रात संघाचा कर्णधार म्हणून 618 धावा केल्या होत्या. तेव्हा तो त्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
आयपीएल 2011 – ख्रिस गेल
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ख्रिस गेलचे आयपीएलमध्ये पहिल्या काही मोसमांनंतर त्याचं रुद्र रूप दिसलं. 2011 मध्ये आरसीबीने त्याला खरेदी केले होते. त्याच वर्षी त्याने 608 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप मिळवली.
आयपीएल 2012 – ख्रिस गेल
2011 च्या आयपीएलमध्ये गोलंदाजांना जबरदस्त त्रास देणाऱ्या ख्रिस गेलने 2012 च्या आयपीएल हंगामात पुन्हा गोलंदाजांचा समाचार घेतला आणि स्पर्धेत 733 धावा केल्या. ख्रिस गेलला ऑरेंज कॅप आरसीबीकडून सलग दुसर्या वेळी जिंकण्यात यश आले.
आयपीएल 2013 – माईक हसी
2013 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) च्या यशामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माइक हसीचा महत्त्वाचा वाटा होता. डाव्या हाताच्या या फलंदाजाने या स्पर्धेत संघासाठी 733 धावा केल्या होत्या आणि चेन्नईने अंतिम फेरी गाठली होती, पण त्यावर्षीच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून त्यांचा पराभव झाला होता.
आयपीएल 2014 – रॉबिन उथप्पा
2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएल विजेता बनला. केकेआरच्या या विजयासाठी रॉबिन उथप्पाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. उथप्पाने आयपीएल 2014 मध्ये केकेआरसाठी 660 धावा केल्या. उथप्पा सलामीवीर म्हणून त्यावेळी बर्यापैकी यशस्वी झाला होता. तथापि, उथप्पा आता राजस्थानकडून खेळणार आहे.
आयपीएल 2015 – डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा तुफानी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला टी20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीवीर देखील म्हटले जाते कारण डावखुरा हा फलंदाज गोलंदाजांना मोठे आव्हान देतो. डेव्हिड वॉर्नरने सन 2015 मध्ये हैदराबाद (एसआरएच) साठी 562 धावा केल्या. त्यावेळी त्याला पहिल्यांदा ऑरेंज कॅप मिळाली.
आयपीएल-2016 विराट कोहली
आयपीएल 2016 चा सत्र पूर्णपणे विराट कोहलीच्या भोवती फिरला होता, परंतु अंतिम सामन्यात त्याला आपला संघ आरसीबीला विजेतेपद जिंकून देण्यात यश आहे नाही. त्यावर्षी या स्पर्धेत कर्णधार विराट कोहलीने 973 धावा केल्या. यात चार शतकांचा समावेश होता.
आयपीएल 2017 – डेव्हिड वॉर्नर
2015 च्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणार्या सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 2017 च्या आयपीएलमध्येही आपली वादळी खेळ दाखवला. संघाचे नेतृत्व करताना डेव्हिड वॉर्नरने आयपीएल 2017 मध्ये 641 धावा केल्या. त्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. अशा प्रकारे त्याने दोन ऑरेंज कॅप्स जिंकून ख्रिस गेलची बरोबरी केली.
आयपीएल 2018 – केन विल्यमसन
चेंडू छेडछाड प्रकरणात सामील झाल्यामुळे बीसीसीआयने डेव्हिड वॉर्नरला एक वर्षासाठी आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली होती. त्याच्या अनुपस्थितीत अनुभवी केन विल्यमसनने सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केले आणि संघासाठी शानदार फलंदाजीही केली. विल्यमसनने आयपीएल 2018 मध्ये 735 धावा केल्या आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले होते.
आयपीएल 2019 – डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे वादळ गेल्या हंगामात पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसले. 12 महिन्यांच्या बंदीनंतर क्रिकेट विश्वात परत आलेल्या डेव्हिड वॉर्नरने तर एकामागून एक अनेक शानदार डाव खेळले. त्याने केवळ 12 सामन्यात एका शतकांसह 692 धावा केल्या. यासाठी त्याला ऑरेंज कॅप व्यतिरिक्त 10 लाखांचे रोख पारितोषिकही प्राप्त झाले.
आयपीएल 2020 – केएल राहुल
संयुक्त अरब अमिराती येथे पार पडलेल्या आयपीएल 2020 च्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार बनलेल्या केएल राहुलचा बोलबाला होता. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबला जरी खास कामगिरी करता आली नसली, तरी या संपूर्ण हंगामात राहुलची बॅट चांगलीच तळपली. त्याने या हंगामात 14 सामन्यांत 55.83 च्या सरासरीने 670 धावा केल्या. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली.
महत्त्वाच्या बातम्या –
कोणाला आहे यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्याची सर्वाधिक संधी? गावसकरांनी वर्तवला अंदाज
सचिनची २० वर्षांपुर्वी पुण्यात १० हजार वनडे धावा करण्याची हुकली होती संधी
“मैदानातील कट्टर वैरी असलो तरी…”, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सचिन तेंडुलकरसाठी ‘या’ दिग्गजाचा संदेश