आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या २ सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाणे कठीण झाले आहे. जर भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर येणाऱ्या प्रत्येक सामन्यात विजय मिळवावा लागेल, तसेच इतर सामन्यांच्या निकालावर ही भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
ही स्पर्धा संपल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या काही युवा खेळाडूंना या मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते. या लेखात आम्ही त्याच ३ खेळाडूंबद्दल जाणून सांगणार आहोत, ज्यांची आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात निवड होऊ शकते.
१) व्यंकटेश अय्यर – आयपीएल २०२१ स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे मध्यप्रदेशचा व्यंकटेश अय्यर. आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिल्या टप्प्यात व्यंकटेश अय्यरला कोणी ओळखतही नव्हतं. परंतु स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकाच्या तोंडावर एकच नाव होतं ते म्हणजे व्यंकटेश अय्यर. त्याने दुसऱ्या टप्प्यातील १० सामन्यात ३७० धावा केल्या. यासह गोलंदाजी करताना ३ गडी देखील बाद केले.
२) हर्षल पटेल – आयपीएल २०२१ स्पर्धेत अनकॅप गोलंदाजांचा देखील तितकाच बोलबाला राहिला. या यादीत सर्वोच्च स्थानी होता तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा गोलंदाज हर्षल पटेल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. परंतु, प्लेऑफ पर्यंत पोहचवण्यात हर्षल पटेलने मोलाचे योगदान दिले. त्याने या स्पर्धेतील १५ सामन्यात सर्वाधिक ३२ गडी बाद केले. या हंगामात तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला. त्यामुळे न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याला भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.
३) आवेश खान – आयपीएल २०२१ स्पर्धेत आणखी एक भारतीय गोलंदाज होता. ज्याने संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. तो म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज आवेश खान. दिल्ली कॅपिटल्स संघात कगिसो रबाडा आणि एन्रीच नॉर्किए यासारखे दिग्गज गोलंदाज असताना देखील आवेश खानला आपली छाप पाडण्यात यश आले.
त्याने १६ सामन्यात २४ गडी बाद केले. तो हर्षल पटेल नंतर सर्वाधिक गडी बाद करणारा दुसरा गोलंदाज होता. तो सुरुवातीच्या षटकांमध्ये आणि अंतिम षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत आवेश खानला देखील निवडकर्ते आजमावून पाहू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिकला मुंबई इंडियन्स रिटेन करण्याची शक्यता नगण्य! ‘या’ ५ संघांची असेल अष्टपैलू खेळाडूवर नजर
पंजाब विरुद्ध ऋतुराजचा ‘रुद्रावतार’, ८० धावांच्या खेळीसह महाराष्ट्राला ७ विकेट्सने मिळवून दिला विजय
‘ही’ ब्राझिलियन अभिनेत्री एकेकाळी होती विराटच्या प्रेमात!