भारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला वनडे सामना काल पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला असला तरी एक वाईट बातमी भारतासाठी आली आहे. भारतीय संघ फिल्डिंग करत असतांना श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली असून वनडे मालिकेतून तो जवळपास बाहेर झाल्याचे निश्चित आहे.
मात्र ही बातमी भारतीय संघाचीच नव्हे तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची देखील चिंता वाढवणारी आहे. कारण श्रेयसची ही दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्यास तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना देखील मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सला पर्यायी फलंदाजच नव्हे तर पर्यायी कर्णधार देखील शोधावा लागेल.
या लेखात आपण दिल्लीकडे उपलब्ध असणार्या आणि श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सांभाळू शकणार्या खेळाडूंचा आढावा घेऊया.
१) आर अश्विन –
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत आर अश्विन कर्णधारपदाचा सगळ्यात मोठा दावेदार असेल. मागील वर्षीच दिल्लीच्या संघात सामील झालेल्या अश्विनने दमदार प्रदर्शनाने संघातील आपले स्थान निश्चित केले होते. तसेच अश्विनकडे आयपीएलचा दीर्घ अनुभव तर आहेच, शिवाय किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद सांभाळण्याचाही त्याला अनुभव आहे. तसेच अश्विन एक चतुर आणि हुशार खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो. अशा परिस्थितीत त्याच्याच कडे नेतृत्वाची जबाबदारी दिल्या जाऊ शकते.
२) रिषभ पंत –
भारताचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत गेले काही महिने जबरदस्त फॉर्मात आहे. तसेच दिल्लीच्या संघाचा गेल्या काही हंगामांपासून तो नियमित सदस्य आहे. दिल्ली कॅपिटल्सचा तो सर्वाधिक महागडा खेळाडू देखील आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने संघाला अनेक सामने देखील जिंकवून दिले आहेत. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या जागी त्याला नेतृत्व देण्याचा विचार दिल्लीचे संघ व्यवस्थापन करू शकते.
३) शिखर धवन –
दिल्लीच्या संघाकडे अजिंक्य रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ असे दोन कर्णधारांचे मजबूत पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यांचे अंतिम अकराच्या संघातील स्थान पक्के नाही. अशा परिस्थितीत शिखर धवन हा कर्णधारपदाचा तिसरा पर्याय दिल्लीकडे उपलब्ध असेल. धवनने मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करून आपले संघातील स्थान पक्के केले होते. तसेच त्याच्याकडे आयपीएलचा बराच अनुभव आहे. हे पाहता दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुरा शिखर धवनच्याही खांद्यावर सोपवली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
पंड्या बंधूंनी सामन्यापूर्वी वडिलांच्या या ३ गोष्टी नेल्या होत्या ड्रेसिंग रूममध्ये