आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी आता फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. या स्पर्धेचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करणार आहे. खरंतर ही स्पर्धा भारतात होणार होती. पण कोरोनामुळे टी२० विश्वचषक भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे हलवण्यात आला आहे. अनेक क्रिकेट पंडित भारतीय क्रिकेट संघाला टी -२० विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानत आहेत.
भारतीय संघाचीही टी२० विश्वचषकाची तयारी सुरु झाली असून त्याआधी आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम युएईमध्येच होणार असल्याने, त्याचाही फायदा भारतीय खेळाडूंना मिळू शकतो.
टी२० विश्वचषकासाठी हार्दिक पंड्याचे भारतीय संघातील स्थान धोक्यात
बीसीसीआयला टी२० विश्वचषकासाठी एक मजबूत संघ मैदानात उतरवायला आवडेल. जो स्फोटक खेळाडूंनी भरलेला असेल आणि ज्यांच्याकडे सामना फिरवण्याची ताकद आहे. अशा स्थितीत, हार्दिक पंड्याच्या जागेला धोका आहे. तो मागील बराच काळापासून फिटनेस आणि फॉर्म यांसारख्या समस्यांशी झुंज देत आहे. तसेच तो गोलंदाजीही फारशी करताना दिसून येत नाही. अशा स्थितीत भारताकडे ३ असे अष्टपैलू खेळाडू आहेत, जे टी२० विश्वचषकात त्याच्यासाठी धोका बनू शकतात.
शिवम दुबे
स्फोटक फलंदाजीसह वेगवान गोलंदाजीचे कौशल्य असलेल्या शिवम दुबेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि टी२० विश्वचषकात हार्दिक पांड्याची जागा घेण्याचा प्रबळ दावेदार आहे. शिवमने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे. सध्या तो राजस्थान रॉयल्सकडून क्रिकेट खेळतो. डावखुरा शिवम मोठे फटके मारू शकतो. शिवम ज्याप्रकारे षटकार मारतो त्यामध्ये युवराज सिंगची झलक दिसते. तसेच त्याला भारताकडून १३ टी२० सामने खेळण्याचा अनुभवही आहे.
शार्दुल ठाकूर
सध्या भारतीय संघात पंड्याचा पर्याय म्हणून शार्दुल ठाकूर आहे. जो संघात अष्टपैलूची भूमिका बजावू शकतो. शार्दुल ठाकूर संघात वेगवान गोलंदाज म्हणून खेळत असला, तरी त्याची फलंदाजीची शैली पाहिली, तर त्याने भारताकडून आणि आयपीएल सामन्यांमध्ये अनेक वेळा स्वतःला सिद्ध केले आहे. शार्दुल ठाकूरने आतापर्यंत २२ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील ५ डावांत ३४.५० च्या सरासरीने ६९ धावा केल्या आहेत आणि या काळात त्याचा स्ट्राइक रेट १९७ आहे. जो टी२० मध्ये खूप चांगला मानला जातो.
दीपक चाहर
नुकत्याच संपलेल्या श्रीलंका दौऱ्यात पंड्या अत्यंत खराब फॉर्मशी झुंज देत होता. अशा परिस्थितीत टी२० विश्वचषकात पंड्याची जागा घेण्यासाठी दीपक चाहर हा देखील एक पर्याय आहे. त्याने श्रीलंका दौऱ्यावर आपल्या उत्कृष्ट कामगिरीने छाप पाडली. दीपक चाहरकडे वेगवान गोलंदाजी करण्याबरोबर तळातल्या फळीत फलंदाजी करण्याचे कौशल्य देखील आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने एकट्याने ६९ धावा केल्या, ज्यामुळे भारताला अशक्य वाटणारा विजय मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“बुमराह फलंदाजीसाठी आला तेव्हा, रिषभ पंतपेक्षाही जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर होते”
टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार का फिंच आणि स्मिथ? ऑसी कर्णधाराने दिले दुखापतीबद्दल अपडेट
‘मुळीच असं समजू नका की, खेळ इथेच संपला आहे’, माजी इंग्लिश कर्णधाराची भारतीय संघाला चेतावणी






