टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत पाकिस्तान आणि नेदरलँड्स संघाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास भलताच वाढला होता. मात्र, रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला पहिला तडाखा बसला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला 5 विकेट्सने पराभूत केले होते. आता भारताला विश्वचषकातील पुढील दोन सामने बांगलादेश आणि झिम्बाब्वे संघांविरुद्ध खेळायचे आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संघात तीन मोठे बदल करू शकतो.
रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये करावे लागेल सामील
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला आतापर्यंत प्लेइंग इलेव्हमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाहीये. भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) खेळत आहे. रोहित शर्माने पंतला संघात सामील केले, तर भारतीय संघाची मधली फळी कदाचित आणखी मजबूत होऊ शकते.
सलामीबद्दल समस्याच समस्या
केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोन्ही खेळाडू त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. पॉवरप्लेमध्ये दोघांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाच्या मधल्या फळीवर दबाव येत आहे. केएल राहुल याला आतापर्यंत टी20 विश्वचषकात खेळलेल्या एकाही सामन्यात खास कामगिरी करता आली नाहीये. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 4 धावा, नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 9 धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही 9 धावा केल्या आहेत.
युझवेंद्र चहलला करावे लागेल संघात सामील
युझवेंद्र चहल याने भारताकडून 69 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 85 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानेही आतापर्यंत या टी20 विश्वचषकातील एकही सामना खेळलेला नाहीये. रोहितने जर चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले, तर तो पुढील सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना भारतीय संघाने एकेवेळी 49 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, सूर्यकुमार यादव याने फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला आणि संघाची धावसंख्या 127 करूनच बाद झाला. त्यानंतर तळातल्या फलंदाजांनी यामध्ये आणखी 6 धावा जोडल्या आणि 9 विकेट्सच्या मोबदल्यात 133 धावा केल्या. हे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने सहजरीत्या 19.4 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केले. तसेच, गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये वॉर्नरची बॅट अद्याप शांतच, आयर्लंडविरुद्धही गमावली स्वस्तात विकेट
रिषभ पंतने ओपनिंग केल्यानंतर बदलणार भारताचे नशीब; असं आम्ही नाही, तर पठ्ठ्याचा चाहताच म्हणतोय






