श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टी20 इंटरनॅशनलमधून निवृत्त झालेल्या रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघात स्थान मिळालेलं नाही, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
जडेजानं नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर टी20 आंतरराष्ट्रीयला अलविदा केला होता, ज्यामध्ये त्याची कामगिरी देखील काही खास नव्हती. टूर्नामेंट संपल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा करणारा विराट कोहली आणि रोहित शर्मानंतरचा तो तिसरा भारतीय खेळाडू होता.
आता त्याला एकदिवसीय संघाचा भाग बनवण्यात आलेलं नाही, ज्यानंतर म्हटलं जात आहे की जडेजाचं वनडे संघात पुनरागमन करणं अवघड आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला अशी 3 कारणं सांगणार आहोत की, का जडेजाला वगळणं भारतीय संघासाठी योग्य निर्णय आहे.
(1) रवींद्र जडेजाचं वाढतं वय – गौतम गंभीर आता टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाला असून त्याच्या आगमनानं संघात काही बदल होणार हे निश्चित होतं. गंभीर आता 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय संघाची तयारी करत आहे. त्या स्पर्धेपर्यंत जडेजा 38 वर्षांचा होईल. अशा स्थितीत या वयाच्या खेळाडूला मोठ्या स्पर्धेत संघात स्थान मिळणं फार कठीण असतं. जडेजाचं क्षेत्ररक्षणही आता पूर्वीसारखं राहिलेले नाही आणि मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याच्या कामगिरीत घसरण झाली आहे.
(2) फलंदाजीत पूर्वीप्रमाणे आक्रमकतेचा अभाव – एकदिवसीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाच्या विरोधात जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्याची फलंदाजीतील आक्रमकता पूर्वीसारखी राहिलेली नाही. जडेजानं आपल्या कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक मोक्याच्या प्रसंगी फलंदाजी करून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. मात्र एकदिवसीय सामन्यात तुम्हाला वेगानं धावा कराव्या लागतात. जडेजानं 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 309 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 75 होता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 लक्षात घेता, जडेजाला एकदिवसीय सामन्यांमध्ये विश्रांती देणं हा शहाणपणाचा निर्णय आहे.
(3) अक्षर पटेलच्या रूपानं उत्कृष्ट पर्याय उपलब्ध – टी20 फॉरमॅट प्रमाणे, एकदिवसीय फॉरमॅटमध्ये देखील अक्षर पटेल हा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाचा उत्कृष्ट बदली ठरू शकतो. 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत अक्षरनं काही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या होत्या, ज्यामुळे तो कर्णधार रोहित शर्माचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरला. याशिवाय क्षेत्ररक्षणातही तो अत्यंत चपळ आहे. एकदिवसीय सामन्यात अक्षरचा स्ट्राईक रेट जडेजापेक्षा खूप चांगला आहे. याशिवाय अक्षर कोणत्याही स्थितीत फलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्यामुळे हा डावखुरा अष्टपैलू खेळाडू भविष्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2027 विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त 3 वर्षांत टीम इंडियाने पाहिलेत तब्बल 11 कर्णधार! चौघे आहेत महाराष्ट्रीयन…
“त्याला कर्णधारपद मिळायला हवं होतं”, हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला माजी क्रिकेटपटू; गंभीरवरही उघडपणे बोलला
हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचाही धक्का, सूर्यकुमार टी20चा कर्णधार बनताच केलं सूचक ट्विट!