बीसीसीआयनं श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. आश्चर्याचं म्हणजे, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत फ्लॉप ठरलेल्या रियान परागची दोन्ही संघात निवड झाली आहे. परागनं नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी पदार्पण केलं होतं. मात्र त्याची पदार्पणाची मालिका काही खास राहिली नाही. त्यामुळे त्याची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत निवड होईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. चला तर मग, या बातमीद्वारे जाणून घेऊया ती 3 कारणं, ज्यामुळे रियान परागची श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात निवड झाली आहे.
(1) आयपीएल 2024 मध्ये शानदार कामगिरी – रियान पराग आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून गेल्या 6 हंगामांपासून खेळत आहे. अखेर 6व्या हंगामात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. आयपीएल 2024 मध्ये परागनं 14 डावात 52 च्या सरासरीनं 573 धावा केल्या. तो एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू होता. परागकडे मधल्या फळीत टिकून फलंदाजी करण्याची क्षमता आहे. कदाचित त्यामुळेच तो निवडकर्त्यांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला.
(2) गोलंदाजीचा अतिरिक्त पर्याय – मधल्या फळीत गोलंदाजीशिवाय रियान पराग लेग स्पिन गोलंदाजीही करतो. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासह अनेक बड्या खेळाडूंना वनडे मालिकेत स्थान देण्यात आलेलं नाही. परागनं आतापर्यंत आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत 50 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी20 कारकिर्दीत त्यानं 41 विकेट्स घेतल्या आहेत.
(3) देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन – रियान पराग आयपीएल 2024 मध्ये धावा करून चर्चेत आला. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या 2 हंगामापासून शानदार कामगिरी करत आहे. त्यानं 2022-23 विजय हजारे ट्रॉफीमध्ये 552 धावा ठोकल्या होत्या. याशिवाय त्यानं 2023-24 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 10 सामन्यांत 510 धावा केल्या होत्या. परागनं रणजी ट्रॉफीमध्येही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला होता. गेल्या रणजी हंगामातील 4 सामन्यात त्यानं 378 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 कर्णधारपदासाठी सूर्याला मोजावी लागली मोठी किंमत, वनडे संघातून पत्ता कट! पहा मोठे कारण
अखेर न्याय मिळाला! कारण नसतानाही वगळलेल्या भारतीय दिग्गजाचे टीम इंडियात कमबॅक
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर…!!!