जसे क्रिकेटमध्ये द्विशतक, त्रिशतक करणे दुर्मिळ गोष्ट आहे तसेच हॅट्रिक घेणेही दुर्मिळच गोष्ट आहे. पण २००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९ वेळा हॅट्रिक घेण्यात आली आहे. तर एकूण १६ गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली आहे.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक अमित मिश्राने घेतली आहे. त्याने तीन वेळा हा कारनामा केला आहे. तसेच युवराज सिंगने दोन वेळा हॅट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही हॅट्रिक त्याने २००९ मध्ये घेतल्या आहेत. अन्य १४ गोलंदाजांनी प्रत्येकी एक वेळा हॅट्रिक घेतली आहे.
आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणाऱ्या एकूण १६ गोलंदाजांमध्ये ३ असे गोलंदाज आहेत जे आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत. विशेष म्हणजे या तिन्ही गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना या हॅट्रिक घेतल्या आहेत आणि हे तिन्ही गोलंदाज भारतीय आहेत. या लेखात त्याच ३ गोलंदाजांबद्दल आढावा घेण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले आणि हॅट्रिक घेणारे गोलंदाज –
३. अजित चंडेला – २०१२
१३ मे २०१२ ला अजित चंडेलाने राजस्थान राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पुण्याला १७० धावांचे आव्हान दिले होते.
त्यानंतर १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजीसाठी उतरलेल्या पुण्याच्या संघाला पहिल्या षटकापासूनच संघर्ष करावा लागला. पहिल्याच षटकात अजित चंडेलाने गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे जेसी रायडर आणि सौरव गांगुलीला बाद केले.
त्यानंतर तिसऱ्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीला आला. त्याने तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॉबिन उथप्पाला बाद केले आणि हॅट्रिक साजरी केली. गांगुली आणि उथप्पा यष्टीचीत झाले होते. तर जेसी रायडर झेलबाद झाला होता.
या सामन्यात अजितने अनुस्तुप मजुमदारला पाचव्या षटकात बाद करत चौथी विकेट घेतली होती. त्याच्या या ४ विकेट्समुळे पुण्याच्या संघाला २० षटकात ९ बाद १२५ धावांवर रोखण्यात मोलाची मदत झाली होती. त्या सामन्यात अजित सामनावीरही ठरला.
पण २०१३ ला झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एस श्रीसंत आणि अंकित चव्हानसह त्याचेही नाव आल्याने त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली.
२. प्रविण तांबे – २०१४
५ मे २०१४ ला प्रविण तांबेने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. विशेष म्हणजे त्याने २ चेंडूत हॅट्रिक घेतली होती. त्यावेळी तांबे ४१ वर्षांचा होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७० धावा केल्या होत्या आणि कोलकाताला १७१ धावांचे आव्हान दिले होते.
यावेळी १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता चांगल्या स्थितीत होते. त्यांच्याकडून गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाने पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर राजस्थान संघाने २ धावांच्या आत ३ विकेट्स घेऊन सामन्यात पुनरागमन केलं.
त्यानंतर १६ व्या षटकात तांबे गोलंदाजीला आला. या षटकातील पहिला चेंडू त्याने वाईड टाकला. पण संजू सॅमसनने (Sanju Samson) त्या चेंडूवर मनीष पांडेला (Manish Pandey) यष्टीचित केलं. हा तांबेचा पहिला चेंडू होता. पण वाईड असल्यामुळे तो धरला गेला नाही आणि त्याला एक विकेट मिळाली. जेव्हा तांबे पुन्हा चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा त्याने युसूफ पठाणला (Yusuf Pathan) बाद केले आणि त्याचे एका चेंडूवर २ विकेट्स घेतले.
त्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवर रायन टेन डोश्काटेची (Ryan Ten Doeschate) ची विकेट घेऊन क्रिकेट इतिहासात २ चेंडूत ३ विकेट घेण्याचा अविश्वसनीय कारनामा करून दाखवला. त्याच्या या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान संघाने पराभूत झालेल्या सामन्यात पुनरागमन करून विजय मिळविला.
१. श्रेयस गोपाळ –
३० एप्रिल २०१९ ला मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. पण या सामन्यात राजस्थानचा गोलंदाज श्रेयस गोपाळने हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.
पावसामुळे ५-५ षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोर संघाकडून विराट कोहली आणि एबी डिविलियर्सने आक्रमक सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्याच षटकात २३ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात गोपाळ गोलंदाजीसाठी उतरला. गोपाळच्याही गोलंदाजीवर पहिल्या तीन चेंडूत एक षटकार आणि १ चौकार आणि दुहेरी धावा काढत विराट आणि डिविलियर्सने चांगली सुरुवात केली होती.
परंतू चौथ्या चेंडू टाकताना गोपाळनेही चांगले पुुनरागमन करत ७ चेंडूत २३ धावा करणाऱ्या विराटला बाद केले. विराटने मोठा फटका मारण्याच्या नादात लियाम लिंव्हिगस्टोनकडे झेल दिला.
त्यानंतर पुढच्याच चेंडूवर डिविलियर्सला १० धावांवर असताना गोपाळने बाद केले. डिविलियर्सचा रियान परागने झेल घेतला. डिविलियर्स बाद झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिसलाही गोपाळने बाद करत हॅट्रिक साजरी केली. स्टॉयनिसचा झेल राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने घेतला.
त्यामुळे ५ षटकात बेंगलोरला ७ बाद ६२ धावा करता आल्या. पण बेंगलोरने विजयासाठी दिलेल्या ६३ धावांच्या आव्हानाचा राजस्थान पाठलाग करत असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राजस्थानची धावसंख्या ३.२ षटकात १ बाद ४१ धावा अशी असताना अखेर पंचांनी हा सामना रद्द केला.
महत्त्वाच्या बातम्या –
पाँटिंगचा खळबळजनक खुलासा, ‘शॉने त्यावेळी माझ्या डोळ्यात पाहात नेटमध्ये सराव करण्यास नकार दिला होता’
केकेआरचा धाकड फलंदाज शुबमन गोलंदाजीतही होता माहीर, ‘त्या’ घटनेनंतर सोडली बॉलिंग
कोण असेल धोनीचा उत्तराधिकारी आणि कोण घेणार हेजलवुडची जागा? ऐका सीएसके सीईओच्या तोंडून