एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंडच्या हातून भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. सामना संपल्यानंतर कर्णधार कोहली म्हणाला की, ही चिंतेची बाब नाही आणि सर्व खेळाडू चांगले खेळत आहेत. मात्र, त्याने एसजी बॉलवर नाराजी व्यक्त केली. रविचंद्रन अश्विन यानेही असेच काहीसे म्हटले.
कर्णधार आणि खेळाडू यांनी काहीही म्हटले तरी हा पराभव मोठा होता, यात शंका नाही आणि पुढचा सामनाही याच मैदानावर खेळला जाईल. दुसरीकडे इंग्लंडचा संघही भारताला कमी लेखणार नाही. कारण, ऑस्ट्रेलियामध्ये ऍडलेड कसोटीनंतर काय घडले हे सर्वांनाच ठाऊक आहे. भारतीय संघ विजयाच्या मार्गावर लवकरात लवकर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र, त्यापूर्वी भारतीय संघासमोर काही आव्हाने आहेत. त्या आव्हानांचा मागोवा आपण घेणार आहोत.
भारतासमोर पुढील कसोटीपूर्वीही चार समस्या आहेत-
१) रोहित शर्माचे अपयश
भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा सध्या अपयशी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अखेरच्या दोन सामन्यासाठी संघात दाखल झालेल्या रोहितने संघाला चांगली सुरुवात दिली. मात्र, तो वैयक्तिक धावसंख्या वाढवू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तर तो सपशेल अपयशी ठरला.
रोहितला पुढील सामन्यांसाठी संधी मिळणे, नक्की आहे. परंतु, रोहितचा फॉर्म असाच राहिला तर संघ व्यवस्थापनाला इतर नावांचा विचार करावा लागेल. सलामीवीराच्या जागेसाठी भारताकडे मयंक अगरवाल व केएल राहुल हे पर्याय उपलब्ध आहेत.
२) रहाणे झगडतोय धावांसाठी
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या धावांसाठी झगडताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियातील यशस्वी मालिकेनंतर त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, पहिल्या कसोटीत तो या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.
रहाणे संघाचा प्रमुख खेळाडू असला तरी, त्याचा सध्याचा फलंदाजीचा फॉर्म खराब आहे. रहाणेने २०२० पासून न्यूझीलंडविरुद्ध दोन, ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार व इंग्लंडविरुद्ध एक असे सात कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये तो २७.६९ च्या सरासरीने अवघ्या २४८ धावा काढण्यात यशस्वी ठरला. ज्यामध्ये मेलबर्न येथील शतकाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तो उर्वरित १३ डावात अर्धशतक देखील झळकावू शकला नाही.
३) दुसऱ्या फिरकी गोलंदाजाची समस्या
भारतीय उपखंडात कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन उत्कृष्ट फिरकी गोलंदाजांची आवश्यकता असते. सध्या भारताचा रविचंद्रन अश्विन कमालीचा फॉर्ममध्ये आहे. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाही. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतही अश्विनच भारताचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून समोर आला.
इंग्लंड विरुद्ध अश्विनचे साथीदार म्हणून शहाबाज नदीम व अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली होती. सुंदरने फलंदाजीमध्ये प्रभाव पाडला. परंतु, गोलंदाजीमध्ये पहिल्या डावात २६ षटकांमध्ये ९८ धावा देऊन तो एकही बळी मिळवू शकला नाही. कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजीची संधी दिली नाही.
दुसरा फिरकीपटू शाहबाज नदीमने चार बळी मिळवले. परंतु, त्याने पहिल्या डावात ३.८ व दुसऱ्या डावात ४.४ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. त्यामुळे, दुसऱ्या सामन्यात चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
४) संघनिवड
भारतीय संघासमोर सर्वात मोठी समस्या संघनिवडीची आहे. शाहबाज नदीमच्या ऐवजी व्यवस्थापन कुलदीप यादवला संधी देण्याची शक्यता आहे. उत्कृष्ट फलंदाजी केली असली तरी, वॉशिंग्टन सुंदरऐवजी वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पंड्याची निवड होऊ शकते. पहिल्या कसोटीत भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने मोहम्मद सिराजला देखील संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलाव २०२१ : स्टीव स्मिथ ठरू शकतो सर्वात महागडा खेळाडू, ‘या’ तीन संघात होणार रस्सीखेच
कसोटी क्रमवारी: जेम्स अँडरसनची तिसऱ्या स्थानी झेप; अश्विन, बुमराह ‘या’ क्रमांकावर
आयसीसी कसोटी क्रमवारी : विराट कोहलीची ‘या’ स्थानी घसरण, तर जो रूटची दोन स्थानांनी प्रगती