राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार हा भारतातील क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.
भारत सरकारने १९९१ मध्ये हा पुरस्कार सुरू केला. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत पण आत्तापर्यंत केवळ ३ क्रिकेटपटुंनाच खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. या लेखात भारताच्या ४ दिग्गज क्रिकेटपटूंचा उल्लेख आहे जे खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र होते पण त्यांना तो मिळाला नाही.
भारतीय संघाचे हे ४ दिग्गज क्रिकेटपटू खेळरत्न पुरस्कारास पात्र होते-
अनिल कुंबळे (Anil Kumble)
अनिल कुंबळे हे जागतिक क्रिकेटमधील एक लोकप्रिय नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० हून अधिक बळी याच्या नावावर आहेत. तसेच याच्या नावावर कसोटी सामन्यातील एका डावात सर्व दहा बळी घेण्याचा विक्रमही आहे. त्याने कसोटीत ६१९ बळी आणि वनडे सामन्यात ३३७ बळी घेतले आहेत. दोन्ही स्वरूपात त्याने भारताकडून सर्वाधिक विकेट मिळवल्या आहेत. या कामगिरीनंतरही त्यांना खेलरत्न न मिळणे दुर्दैवी बाब आहे.
सौरव गांगुली (Sourav Ganguly)
भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढून विजयाच्या मार्गावर आणण्याचे श्रेय सौरव गांगुलीला जाते. सौरव गांगुलीने एका युवा संघासह २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला संयुक्त चॅम्पियन बनवले. यानंतर, २००३ मधील विश्वचषकातही भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. यावेळी त्याने स्वत: या विश्वचषकात शतके ठोकली. नॅटवेस्ट चषक व्यतिरिक्त कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे अशा गोष्टी सौरव गांगुलीच्या नेतृत्वात घडल्या.
सौरव गांगुली हा असा कर्णधार होता ज्याने संघाला देशाबाहेर जाऊन जिंकण्याची शिकवण दिली. याशिवाय त्याने वनडे सामन्यात ११ हजार तर कसोटीत ७ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ३८ शतके केली आणि १३२ बळीही घेतले. या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर त्याला खेलरत्न मिळायला हवा होता.
राहुल द्रविड (Rahul Dravid)
भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने संघाला बऱ्याच वेळा कठीण परिस्थतीतून वाचवले आहे . १९९९ च्या विश्वचषकात राहुल द्रविडने भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. कसोटी आणि वनडेमध्ये त्याने प्रत्येकी १० हजारहून अधिक धावा केल्या आहेत. त्याला खेलरत्न मिळायला हवा होता. त्याला दोनदा नामांकन असूनही हा पुरस्कार देण्यात आला नाही.
मिताली राज (Mithali Raj)
२००५ आणि २०१७ मध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जाण्याची संधी मिळाली. परंतु, दोन्ही वेळा संघाला जेतेपद मिळवता आले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारी मिताली राज एकमेव फलंदाज आहे. याशिवाय कसोटी आणि वनडे दोन्ही सामन्यांमध्ये तिची सरासरी ५० च्या वर आहे. वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने २०९ आणि सर्वाधिक ६८८८ धावा तिच्या नावावर आहेत. तिच्यापुढे जागतिक क्रिकेटमधील इतर कोणतीही महिला खेळाडू नाही. पण तिलाही खेलरत्न पुरस्कार मिळाला नाही जो की तिला मिळायला हवा होता.