भारतीय क्रिकेट इतिहासात असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अफलातून खेळी केली. पण, त्यांना त्यांचा शेवट मात्र चांगला करता आला नाही. एवढेच नाही तर, काही क्रिकेटपटूंना त्यांचा शेवटचा सामनादेखील खेळायला मिळाला नाही. म्हणून त्यांनी शेवटचा सामना न खेळताच क्रिकेमधून निवृत्ती घेतली.
तर जाणून घेऊया, त्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या शेवटच्या सामन्यातील प्रदर्शनाविषयी.. 4 Legend indian players who flopped in their last series.
१. राहुल द्रविड
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड याने २०११-१२मध्ये त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका खेळली होती. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत राहुलचे प्रदर्शन खूप साधारण होते. त्याने ४ सामन्यात ८ डाव खेळत एका अर्धशतकाच्या मदतीने फक्त १९४ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने सर्वाधिक ६८ धावा पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात केल्या होत्या. त्यानंतर मालिकेतील एकाही सामन्यात तो ५० धावाही करु शकला नाही.
२०१२मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. जरी त्याचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील प्रदर्शन चांगले नसले तरी त्यापुर्वी २०११मध्ये भारत संघ इंग्लंड दौऱ्यावर आला होता. त्यावेळी द्रविडने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३ शतके ठोकत दमदार ४६१ धावा केल्या होत्या. शिवाय, वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याच्या वेळीही द्रविडने १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीने ३१९ धावा केल्या होत्या.
२. व्हिव्हिएस लक्ष्मण
द्रविडप्रमाणे व्हिव्हिएस लक्ष्मणनेही २०११-१२मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर १२ ऑगस्ट २०१२ला लक्ष्मणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतली. तसे तर, लक्ष्मणचे ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरील प्रदर्शन सहसा चांगले असते. पण, लक्ष्मणला त्याच्या शेवटच्या कसोटी मालिकेत मात्र चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्याने सिडनी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात सर्वाधिक ६६ धावा करत, संपूर्ण मालिकेत फक्त १५५ धावा केल्या.
तर, त्यापुर्वीच्या २०११मधील इंग्लंड दौऱ्यावर लक्ष्मणला जास्त चांगली कामगिरी करता आली नव्हती. यावेळी त्याने फक्त २ अर्धशतके केली होती. उर्वरित सामन्यात त्याला ३०पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. तर, २०११मध्येच वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी कोलकाता येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने नाबाद १७६ धावांची शतकी खेळी केली होती. शिवाय त्याने एक अर्धशतकही केले होते.
३. विरेंद्र सेहवाग
भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने मार्च २०१३ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलया संघामध्ये ४ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील चेन्नईमधील पहिल्या कसोटी सामन्यात सेहवागने २ डावात २ आणि १९ धावा केल्या होत्या. तर, पुढील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एका डावात फक्त ६ धावा केल्या. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला पुढील २ कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
शिवाय, सेहवागने २०१२मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आपला शेवटचा टी२० सामना खेळला. तर, २०१३मध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला. त्यानंतर जवळपास दिड वर्षे आपल्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही म्हणून सेहवागने २० ऑक्टोबर २०१५ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतली.
४. युवराज सिंग
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने १० जून २०१९ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतली. त्याने जून २०१७ला वेस्ट इंडिजविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. या चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब प्रदर्शनामुळे पुढे त्याला एकाही वनडेत खेळण्याची संधी मिळाली नाही.
२०१३नंतर जवळपास ४ वर्षांनी वनडेत पुनरागमन करणाऱ्या युवराजने २०१७मध्ये वनडेत दमदार कामगिरी केली होती. कटक येथील दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध १५० धावांची खेळी करत भारताला १५ धावांनी तो सामना जिंकून दिला होता. भारताने इंग्लंडविरुद्धची ती ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ने खिशात घातली होती.
मात्र, जून २०१७मधील ५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात युवराजने ४ तर दुसऱ्या सामन्यात १९ धावा केल्या होत्या. पुढील तिसऱ्या सामन्यातही त्याला फक्त ३९ धावाच करता आल्या. त्यामुळे त्याला उर्वरित २ वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही आणि तो त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
ट्रेंडिंग लेख-
३ असे भारतीय खेळाडू, ज्यांना खराब कामगिरीमुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले
२००१ ते २०१० या काळात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू, सचिन आहे चक्क ५व्या स्थानावर
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती