मर्यादित षटकांचे सामने म्हटलं की, सहसा पाहायला मिळते मोठमोठ्या शॉट्ससह फलंदाजांनी केलेली विस्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजांनी कमीत कमी धावा देत फलंदाजांच्या घेतलेल्या विकेट्स. तसं तर, वनडेत ५० षटके असल्यामुळे फलंदाज परिस्थितीनुसार मोठमोठे शॉट्स मारत शतकी खेळी करताना दिसतात. पण, २० षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांच्यासाठी शतक ठोकणे जरा कठीणच जाते. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करण्याचा कारनामा डेव्हिड मिलर, रोहित शर्मा आणि एस विक्रमशेखरा यांनी केला आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)विषयी बोलायचं झालं तर, आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजाच्या नावावरही केवळ ६ शतकांची नोंद आहे. ख्रिस गेलने हा पराक्रम केला आहे. तर गेलपाठोपाठ विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ शतके लगावली आहेत.
पण या लेखात, आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघातील शतक ठोकणाऱ्या फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या ४ फलंदाजांव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही फलंदाजाला शतक ठोकता आले नाही. तर बघूयात, कोण आहेत ते ४ फलंदाज ज्यांनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे.
मुंबई इंडियन्स संघातील चार शतकवीर (4 Mumbai Indians Batsman Who Smashed Century In Ipl) –
सनथ जयसूर्या – Sanath Jayasuriya
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याने शतक ठोकण्याचा कारनामा केला होता. १४ मे २००८ रोजी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती. केवळ ४८ चेंडूत त्याने नाबाद ११४ धावांची खेळी केली होती. यात त्याच्या ९ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता.
त्या सामन्यानंतर जयसूर्याने तब्बल २९ सामने खेळले. पण त्याला एकही शतक करण्यात यश आले नाही. या दिग्गजाने २०१०मध्ये त्याचा शेवटचा आयपीएल सामना खेळला.
सचिन तेंडूलकर – Sachin Tendulkar
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा (१०० शतके ठोकणारा) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. तो २००८ पासून २०१३ पर्यंत आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचाच भाग होता. आयपीएलमध्ये शतक ठोकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या निवडक फलंदाजांमध्ये सचिनचाही समावेश आहे.
१५ एप्रिल २०११ ला कोची टस्कर्स केरळविरुद्धच्या सामन्यात सचिनने हा कारनामा केला होता. ६६ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने त्याने नाबाद १०० धावा केल्या होत्या. त्यानंतर सचिनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ७७ सामने खेळले, पण त्याला एकही शतक करता आले नाही.
रोहित शर्मा – Rohit Sharma
मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्त्वाखाली सर्वाधिक ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्मानेही आयपीएलमध्ये एक शतक लगावले आहे. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील आतापर्यंतचे एकमेव शतक आहे.
१८८ आयपीएल सामने खेळणाऱ्या रोहितने १२ मे २०१२ला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपले एकमेव आयपीएल शतक लगावले होते. यावेळी ६० चेंडूत त्याने नाबाद १०९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
लेंडल सिमन्स – Lendl Simmons
मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्त्व केलेला वेस्ट इंडिजचा फलंदाज लेंडल सिमन्स यानेही आयपीएलमध्ये मुंबईकडून शतक ठोकले होते. २१ मे २०१४ला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. यावेळी ६१ चेंडूत त्याने नाबाद १०० धावांची खेळी केली होती. यात त्याच्या १४ चौकारांचा आणि २ षटकारांचा समावेश होता. हे लिमन्सच्या आयपीएल कारकिर्दीतील एकमेव शतक ठरले.
सिमन्सने त्याच्या ४ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत २९ सामने खेळत १०७९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ११ अर्धशतकांचा समावेश होता.
ट्रेंडिंग लेख –
भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी ‘या’ ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी
भारतीय ३ विकेटकिपर, जे आयपीएलमध्ये ठरलेत सुपर किंग
एक नाही दोन नाही आख्खा संघच ठरला होता मॅन ऑफ द मॅच, पण कसे ते घ्या जाणून
महत्त्वाच्या बातम्या –
शोएब अख्तरची ‘या’ खेळाडूवर कडाडून टीका; म्हणाला, तो हरवलेल्या गायीसारखा…
किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आनंदाची बातमी; हा गोलंदाज गाजवतोय सीपीएल
‘मिस्टर ३६०’ एबी डिलिवियर्सने केली आयपीएलच्या तयारीला सुरुवात; पहा व्हिडिओ