---Advertisement---

कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत ठाणे, पुणे संघ अजिंक्य

On: बुधवार, फेब्रुवारी 5, 2020 6:30 PM
---Advertisement---

अंबाजोगाई। अंबेजोगाई(जि.बीड) येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन व कै. हेमंत राजमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 46 व्या कुमार व कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत कुमार गटात ठाणे जिल्हा व कुमारी गटात यांनी पुणे जिल्हा संघाने राज्य अजिंक्यपद पटकाविले. कुमार गटात स्वर्गीय नारायण नागु पाटील यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पुरस्कृत फिरत्या चषकाचा मान ठाणे जिल्हा या संघाने मिळविला. तर कुमारी गटात क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन सखाराम पांडे परभणी यांच्या स्मरणार्थ फिरता चषकावर पुणे जिल्ह्याने आपले नाव कोरले.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार संजय दौंड, माजीमंत्री पंडीतराव दौंड, बीड जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, स्पर्धा आयोजक रणजित लोमटे, स्पर्धा निरिक्षक प्रा. गणपतराव माने, पंचप्रमुख सुहास पाटील, सहाय्यक पंचप्रमुख अभिजित तांदळे, अजित देशमुख, दिलीप गित्ते, विश्वभंर फड,शिवाजीराव शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

कुमारी यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघाने बीड जिल्हा संघावर 35-27 गुणांनी विजय मिळवित क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन सखाराम पांडे परभणी या फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. मद्यंतराला पुणे संघाकडे 22-11 अशी आघाडी होती. पुण्याच्या मानसी रोडे, पल्लवी गावडे व समृध्दी कोळेकर यांच्या खोलवर चढायांच्या जोरावर हा सामना पुणे जिल्ह्याने जिंकला. तर दिव्या गोगावले व नागेंद्रा कुरा यांनी चांगल्या पकडी घेतल्या. बीडच्या शितल म्हेत्रे, आरती नागरे चौफेर चढाया करीत चांगली लढत दिली. तर आश्वनि शेळके हिने चांगल्या पकडी घेतल्या.

कुमार गटात अंतिम सामन्यात ठाणे जिल्हा संघाने रत्नागिरी या संघावर 32-23 अशा गुणांनी विजय मिळवित कुमार गटात स्वर्गीय नारायण नागु पाटील यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पुरस्कृत फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. मध्यंतराला ठाणे जिल्हा संघाकडे 16-9 अशी आघाडी होती. ठाण्याच्या गौरव पाटील व परेश हरड याने चौफेच चढाया करीत मैदान दणाणून सोडले. तर वैभव पाटील व पवनकुमार सिंग याने चांगल्या पकडी घेतल्या. रत्नागिरीच्या विवेक जांभळे व प्रतिक चव्हाण यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. तर साईराज जाधव याने काही चांगल्या पकडी घेत विजयासाठी संघर्ष केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---