कसोटी क्रिकेट… आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रकार म्हणजे कसोटी क्रिकेट. मात्र, कसोटीत टिकण्यासाठी सातत्य, चिकाटी आणि खेळण्याची उत्कठ इच्छा या गोष्टीदेखील खूप महत्त्वाच्या असतात. असे असले तरी, क्रिकेटच्या या स्वरुपात फलंदाजांना अधिकाधिक धावा करण्याची संधी असते. तर, गोलंदाजांना अधिकाधिक विकेट्स घेण्याचीही संधी असते.
तसे तर कसोटी क्रिकेटला हळूवार खेळले जाणारा क्रिकेट प्रकार म्हणून ओळखले जाते. मात्र, काही खेळाडू कसोटीत आक्रमक अंदाजात खेळण्यासाठी ओळखले जातात. यामागे त्यांची लालसा असते, ती कमी चेंडूत जास्त धावा घेण्याची. १४१ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवत केली आहे.
या लेखात आपण अशाच ५ खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात दमदार षटकार मारत केली आहे. 5 Batsman Opened Test Account By Hitting Six
१. सुनिल अंब्रिस (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिजच्या सलामीवीर फलंदाजाने १ डिसेंबर २०१७ला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. या सामन्यातील पहिल्या डावात अंब्रिस हिट विकेट होऊन शून्यावर बाद झाला. मात्र, इथेच त्याने हार मानली नाही. अंब्रिसने त्या सामन्यातील दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपल्या कसोटी कारकिर्दीची अविस्मरणीय सुरुवात केली होती. ट्रेंट बोल्टच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अंब्रिसने हा कारनामा केला होता.
विषेश म्हणजे, पहिल्या चेंडूवर मारलेला तो षटकार हा अंब्रिसच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि एकमेव षटकार ठरला. त्यानंतर पुढे अंब्रिसने आपल्या कसोटी कारकिर्दीत ६ सामने खेळत १६६ धावा केल्या.
२. कमरुल इस्लाम (बांगलादेश)
बांगलादेशचा उजव्या हाताचा फलंदाज कमरुल इस्लामची २० ऑक्टोबर २०१६च्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झाली होती. परंतु, हा फलंदाज त्याच्या 3 कसोटी डावात शून्यावर बाद झाला होता. परंतु कमरुलने त्याच्या चौथ्या कसोटी डावात मोईन अलीनच्या चेंडूवर फटकेबाजी करत षटकाराने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती.
कमरुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ७ सामन्यात ५१ धावा केल्या होत्या. कदाचित त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याला खालच्या फळीत फलंदाजी करावी लागली. म्हणून तो एवढ्या कमी धावा करु शकला असेल. तसेच या ७ सामन्यात त्याने केवळ २ षटकार मारले आहेत.
३. धनंजय डी सिल्वा (श्रीलंका)
पल्लेकल्ले येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून श्रीलंकाच्या अष्टपैलू क्रिकेटपटूने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. २६ जुलै २०१६ला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सिल्वाने स्टिव्ह ओ खिफच्या षटकातील पहिल्या ४ चेंडूत एकही धाव घेतली नाही. मात्र, त्याने ५व्या चेंडुला सीमारेषेबाहेर पाठवत दमदार षटकाराने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
पुढे सिल्वाने ४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत ३१ सामन्यात एकूण १८६३ धावा केल्या. यात त्याच्या १३ षटकारांचा समावेश आहे.
४. डेल रिचर्ड्स (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिजचा फलंदाज डेल रिचर्डसला २००९मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळायची संधी मिळाली होती. मायदेशात झालेल्या या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना बांग्लादेशच्या मश्रफी मोर्तझाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत रिचर्ड्सने सुरुवात केली होती.
संघातील मुख्य खेळाडूच्या बदल्यात मिळालेल्या संधी सोने करत रिचर्ड्सने ३ कसोटी सामन्यात एका अर्धशतकासह १२५ धावा केल्या होत्या.
५. रिषभ पंत (भारत)
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने १८ ऑगस्ट २०१८ला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी आदिल राशिदच्या पहिल्याच चेंडूवर फटकेबाजी करत पंतने षटकार मारत कसोटी कारकिर्दीची अविस्मरणीय सुरुवात केली होती. अनपेक्षित शॉटमुळे पंतच्या त्या षटकाराची खूप चर्चा झाली होती.
पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १३ सामन्यात ८१४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १९ षटकारांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग लेख-
वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू, अव्वल…
८ वर्षांपुर्वीच्या डेक्कन चार्जर्स व सध्याच्या सनराइजर्स हैद्राबादमधील ५ गमतीशीर…
युवराजबरोबर क्रिकेट खेळलेले ‘ते’ ७ खेळाडू, जे फारसे कुणाला नाही आता माहित