---Advertisement---

८ तासांत कसोटीत २७० पेक्षा जास्त धावा करणारे ४ क्रिकेटपटू

---Advertisement---

क्रिकेट इतिहासात कसोटीचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. कसोटी क्रिकेट खेळताना खेळाडूच्या मानसिकतेची आणि कौशल्याची परिक्षा पाहिली जाते. एक कसोटी सामना ५ दिवसांचा होतो. प्रत्येक दिवशी साधारण ८ तासात ९० षटकांचा खेळ होतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी फलंदाजांसमोर संयमी खेळ करण्याचे आव्हान असते.

एका दिवसात फलंदाजी करणारा संघ सरासरी ३०० च्या आसपास धावा करण्याचा प्रयत्न करत असतो. कसोटी हा क्रिकेट प्रकारातील सर्वात धीमा प्रकार मानला जातो. पण असे असले तरी काही फलंदाज असे आहेत ज्यांनी कसोटीतही आक्रमक खेळी केल्या आहेत. त्यातील काही असेही खेळाडू आहेत ज्यांनी एका दिवसात २७० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. अशा ४ खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

कसोटीमध्ये १ दिवसात २७० पेक्षा अधिक धावा करणारे ४ फलंदाज –

१. सर डॉन ब्रॅडमन – नाबाद ३०९ धावा (१९३०) आणि नाबाद २७१ धावा (१९३४)

ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक १२ वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहेत. ब्रॅडमन यांनी १९३० च्या ऍशेस मालिकेत खास कामगिरी केली होती.

त्यांनी या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत एका दिवसातच त्रिशतक झळकावण्याचा कारनामा केला आहे. त्यांनी त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी नाबाद ३०९ धावा केल्या होत्या. ते नंतर दुसऱ्या दिवशी ३३४ धावांवर बाद झाले होते. त्यांनी त्या खेळीत ४६ चौकार मारले होते. तसेच त्यावेळी कसोटीतील ही सर्वोच्च धावांची खेळी होती.

तसेच यानंतर ४ वर्षांनी त्यांनी १९३४ च्या ऍशेस मालिकेत पुन्हा अशीच शानदार कामगिरी केली होती.  या मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव २३४ धावांवर संपला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघानेही ३९ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या.

त्यावेळी ब्रॅडमन फलंदाजीसाठी आले. तो या सामन्याच्या दुसरा दिवस होता. त्यांनी विल पोन्सफोर्डबरोबर भागीदारी करायला सुरुवात केली. त्यांनी दुसऱ्या अखेरिसपर्यंत ऑस्ट्रेलियाला ४०० चा आकडा पार करुन दिला होता. विशेष म्हणजे ब्रॅडमन यांनी दुसऱ्या दिवशी नाबाद २७१ धावा केल्या होत्या. त्यांनी नंतर तिसऱ्या दिवशी २७१ पासून पुढे खेळताना त्रिशतक पूर्ण केले. त्यांनी ४७३ चेंडूत ३०४ धावा केल्या. या खेळीत त्यांनी ४३ चौकार आणि २ षटकार खेचले होते. हा सामना अनिर्णित राहिला होता.

२. डेनिस कॉम्पटन – नाबाद २७१ धावा (१९५४)

इंग्लंडचे दिग्गज फलंदाज डेनिल कॉम्पटन यांनी १९५४ ला पाकिस्तान विरुद्ध ट्रेंटब्रिजला झालेल्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पहिला डाव १५४ धावांवरच संपुष्टात आला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या दिवसाखेर २ बाद १२१ धावा केल्या होत्या. यावेळी पहिल्या दिवसाखेर कॉम्पटन हे ५ धावांवर नाबाद होते.

त्यांनी दुसऱ्या दिवशी ५ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यांनी दुसऱ्या दिवशी आणखी २७१ धावा केल्या. ते २७८ धावांवर बाद झाले. त्यांच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने या सामन्यात १ डाव आणि १२९ धावांनी विजय मिळवला होता.

३. विरेंद्र सेहवाग – नाबाद २८४ धावा (२००९)

भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग नेहमीच त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सेहवागने २००९ ला श्रीलंकेविरुद्ध मुंबई येथे झालेल्या कसोटी सामन्यात केलेली २९३ धावांची खेळी शानदार ठरली होती.

या सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात ३९३ घावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने पहिला डाव ९ बाद ७२९ धावांवर घोषित केला होता. यावेळी सेहवागने दुसऱ्या दिवशी फलंदाजीला येत दिवसाखेर नाबाद २८४ धावा केल्या होत्या. तसेच नंतर सेहवागने तिसऱ्या दिवशी आणखी ९ धावा जोडल्या आणि तो २९३ धावांवर तिसऱ्या दिवशी मुरलीधरनच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. यावेळी त्याने ४० चौकार आणि ७ षटकार मारले होते.

त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना १ डाव आणि २४ धावांनी जिंकला होता. या विजयामुळे भारतीय संघ पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावरही आला होता.

४. वॉली हेमंड – २९५ धावा (१९३०)

इंग्लंडचे १९३० च्या दशकातील दिग्गज फलंदाज वॉली हेमेंड यांनी १९३३ ला न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे झालेल्या कसोटीत ३३६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव १५८ धावांवर संपला होता. त्यानंतर फलंदाजी करताना हेमंड हे पहिल्या दिवसाखेर ४१ धावांवर नाबाद होते.

या नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी तब्बल २९५ धावा जोडत इतिहास रचला. ते दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जेव्हा ७ बाद ५४८ धावांवर डाव घोषित केला तेव्हा ३३६ धावांवर नाबाद खेळत होते. त्यांनी ३४ चौकार आणि त्याकाळात तब्बल १० षटकार ठोकले होते. तसेच त्यावेळी त्यांनी ब्रॅडमन यांच्या कसोटीतील सर्वोच्च ३३४ धावांच्या खेळीचा विक्रमही मोडला होता.  तो सामना अनिर्णित राहिला होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

आयपीएल इतिहासात अनसोल्ड राहिलेले ३ महान भारतीय क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---