-कामेश दिपक भिसे
गेल्या काही वर्षांत क्रिकेटपटूंचा फिटनेस चांगलाच सुधारला आहे. अनेकदा हे क्रिकेटपटू चेंडू आडवताना मोठी उडी वैगरे घेण्याची जोखीम सहज पत्करताना दिसतात. त्यामुळे मागील काही वर्षात अनेक चांगले क्षेत्ररक्षक सर्वांना पहायला मिळाले आहेत. अनेकांनी भन्नाट झेल घेतले आहेत. त्यामुळे या लेखात अशा क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१० नंतर सर्वाधिक झेल घेतले आहेत.
२०१०नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे गोलंदाज –
५. हाशिम आमला – १७० झेल
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी फलंदाज हाशिम अमलाने गेल्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला निरोप दिला होता. हाशिम आमला एक जबरदस्त फलंदाज आहे. ज्यानी कारकिर्दीत अनेकदा मोठ्या खेळी करत यश मिळवले. याबरोबरच त्याचे क्षेत्ररक्षणही खूप अप्रतिम होते.
अमलाने २०१०नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७० झेल घेतले आहेत. यात त्याच्या कसोटीतील ७४ झेलांचा, वनडेतील ७७ झेलांचा आणि टी२०मधील १९ झेलांचा समावेश आहे. तो २०१० पासून सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे.
४. स्टीव्हन स्मिथ – २०५ झेल
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज स्टीव्हन स्मिथ सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजामध्ये गणला जातो. फलंदाजीमुळे स्मिथने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत जबरदस्त यश संपादन केले आहे आणि त्याने दिग्गज फलंदाजामध्ये आपली जागा बनवली आहे. फलंदाज म्हणून जसा स्मिथने उत्कृष्ट आहे तसाच तो क्षेत्ररक्षणातही चांगला आहे.
स्मिथने २०१० पासून आत्तापर्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २०५ झेल घेतले आहेत. यातील ११७ झेल त्याने कसोटीत घेतले असून वनडेत ६७ आणि टी२०मध्ये २१ झेल घेतले आहेत.
३. जो रूट- २०६ झेल
सध्याच्या काळातील फॅब ४ फलंदाजांमध्ये गणना होणारा जो रुट इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज आहे. त्यानेही त्याच्या दमदार फलंदाजीने अव्वल दर्जाच्या फलंदाजांमध्ये त्याची जागा मिळवली आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही चांगली चूणूक दाखवली आहे.
२७० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या रुटने २०१० पासून आत्तापर्यंत कसोटीत ११४, वनडेत ७४ आणि टी२०मध्ये १८ झेल असे मिळून २०६ झेल घेतले आहेत. त्यामुळे तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२. रॉस टेलर- २२३ झेल
न्यूझीलंडचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज आणि माजी कर्णधार रॉस टेलरची गणना धडाकेबाज फलंदाजांमध्ये केली जाते. टेलर हा सध्या जगातील असा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन्ही प्रकारात १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. एवढेच नाही टेलर जेवढा चांगला फलंदाज आहे तेवढाच उत्तम क्षेत्ररक्षकही आहे.
गेल्या १० वर्षात टेलरने त्याच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२३ झेल घेतले आहेत. यातील १०६ झेल त्याने कसोटीत घेतले आहेत. तर वनडेतील ८९ आणि टी२०तील २८ झेलांचा यात समावेश आहे.
१. विराट कोहली- २४४ झेल
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तसेच सध्याच्या काळातील सर्वात फिट खेळाडूंमध्येही तो गणला जातो. जसा तो सर्वात्तम फलंदाजांमध्ये गणला जातो, तसाच तो सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्येही गणला जातो. त्याच्या क्षेत्ररक्षणात चपळता दिसून येते.
गेल्या १० वर्षांत त्याने वनडेत १२१ झेल, कसोटीत ८२ झेल आणि टी२० मध्ये ४१ झेल असे मिळून २४४ झेल घेतले आहेत. त्यामुळे तो २०१० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा क्रिकेटपटू आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
असे ‘बाप- लेक’ क्रिकेटर, ज्यांनी एकाच सामन्यात खेळताना केली ‘बाप’ कामगिरी
असे ५ क्रिकेटर, जे आहेत डावखुरे फलंदाज परंतु करतात उजव्या हाताने गोलंदाजी
जगात ५१०० क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच