भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याचा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे, यात कसलीच शंका नाही. त्याने आत्तापर्यंत त्याच्या फलंदाजीच्या जोरावर अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पण आजपर्यंत विराट जेवढा त्याच्या फलंदाजीसाठी चर्चेत आला आहे, तसा अनेकदा काही वादांमुळेही तो चर्चेत आला आहे. अशाच त्याच्याशी जोडलेल्या ५ वादग्रस्त घटनांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
विराट कोहलीशी जोडलेल्या ५ वादग्रस्त घटना –
५. मधले बोट दाखवत प्रेक्षकांवर व्यक्त केला राग –
विराट त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या आक्रमकपणामुळे अनेकदा चर्चेत आला होता. त्याचदरम्यानची एक घटना म्हणजे २०११-१२ दरम्यान जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता तेव्हा सिडनी कसोटी दरम्यान स्टेडियममधील प्रेक्षकांनी काही भारतीय खेळाडूंचे लक्ष विचलित करण्यासारख्या गोष्टी बोलण्यास सुरुवात केली होती.
त्यावेळी युवा विराट कोहली बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा प्रेक्षकांच्या चिडवण्यामुळे त्याने चिडून प्रेक्षकांना हाताचे मधले बोट दाखवले. त्याची ही कृती कॅमेरामध्येही कैद करण्यात आली. त्यामुळे त्यावरुन वाद झाला होता. त्याला त्या सामन्यानंतर सामनाशुल्काच्या ५० टक्के दंडही झाला होता.
४. गौतम गंभीरबरोबर वाद –
गौतम गंभीर आणि विराट कोहली हे दोघेही तसे स्वभावाने आक्रमक खेळाडू आहेत. अनेकदा हा आक्रमकपणा मैदानातही दिसला आहे. २०१३ च्या आयपीएल मोसमात तर या दोन खेळाडूंनी एकमेकांशी जोरदार वाद घातले होते.
झाले असे की त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गंभीर होता, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट होता. त्या सामन्यात विराट बाद झाल्यानंतर परत जात असताना गंभीरने काहीतरी बोलले, जे विराटला पटले नाही. त्यामुळे तेव्हा विराट आणि गंभीरमध्ये भांडण सुरु झाले. अखेर अन्य खेळाडू आणि पंचांना ही भांडण सोडवण्यासाठी त्यांच्यामध्ये पडावे लागले होते. त्यावेळी या भांडणांवरुन बरीच चर्चा नंतर झाली होती.
३. पत्रकारावर व्यक्त केला राग –
२०१५ ला मीडियामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यातील अफेअरचे वृत्त चांगलेच चर्चेत होते. त्यावेळी २०१५ च्या विश्वचषकाच्या दरम्यान पर्थमध्ये सरावादरम्यान विराटने तिथे असलेल्या पत्रकारावर अचानक राग व्यक्त करायला सुरुवात केली. त्यावेळी विराटला वाटले की त्याने अनुष्काबद्दल काही वादग्रस्त लिहिले आहे. पण नंतर विराटला कळाले की अनुष्काबद्दल लिहिणारा पत्रकार वेगळा होता आणि त्याने वेगळ्याच पत्रकारावर राग व्यक्त केला. विराटच्या या वागण्यावर बरीच टिका झाली. त्यावेळी बीसीसीआयने विराटला ताकिदही दिली होती. नंतर विराटने त्या पत्रकाराची माफी मागितली.
२. स्टिव्ह स्मिथबरोबर वाद –
सध्याच्या काळात विराट बरोबरच स्टिव्ह स्मिथलाही सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जाते. पण या दोघांमध्ये २०१७ ला वाद झाले होते. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी ४ मार्च ते ८ मार्च दरम्यान बंगळुरु येथे झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यावेळीचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथला जेव्हा पंचांनी बाद दिले होते तेव्हा त्याने काय करावे हे न सुचल्यामुळे ड्रेसिंग रूमकडे बघून काय करू असे विचारले होते, पण क्रिकेटमध्ये असे विचारणे चुकीचे असल्याने स्मिथला अखेर बाद देण्यात आले होते.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा विराट आणि स्मिथमध्ये वाद झाले होते. कारण रिव्ह्यू घेताना खेळाडू अशी मैदानाबाहेरुन मदत घेऊ शकत नाही. त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू ड्रेसिंग रुममधून मदत घेत असल्याचे विराटने पंचांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच विराटने याबद्दल तक्रार देखील केली होती. त्याचबरोबर या प्रकरणानंतर स्मिथला माफी मागावी लागली होती. पण त्याचबरोबर स्मिथने विराटवर नाराजी देखील व्यक्त केली होती.
१. विराट-कुंबळे वाद
भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यातील वाद २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट वर्तुळात चांगलेच गाजले होते. या प्रकरणानंतर कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामाही दिला होता. विराट- कुंबळे वाद २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान समोर आला होता.
तसेच काही रिपोर्टनुसार कुंबळे भारताचा प्रशिक्षक असताना काही खेळाडूंना कुंबळेचे वर्चस्व पटत नव्हते. त्यामुळे त्यांचे ड्रेसिंगरुममधील स्वातंत्र्यावर गदा येत होती. तसेच विराट आणि कुंबळेमधील मैत्रीपूर्ण संबंधही याचदरम्यान संपल्याचे समजले होते. त्यामुळे विराटने कुंबळेला प्रशिक्षकपदावरुन हटवण्याचीही मागणी केली होती. अखेर जून २०१७ मध्ये कुंबळेनेच प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणामुळे विराटवर टिका देखील झाली होती.
ट्रेंडिंग लेख –
भारतीय संघातील या ३ कट्टर मित्रांचा आयपीएलमध्ये युवराज कधीही झाला नाही संघसहकारी
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं
हे ४ युवा खेळाडू जे जिंकू शकतात, “इमर्जिंग प्लेअर ऑफ आयपीएल २०२० चा पुरस्कार”