1990 पासून 2008 या काळात अनिल कुंबळे (Anil Kumble) हा भारतीय क्रिकेटचा असा धुरंदर खेळाडू होता की, त्याने भारतीय संघासाठी फक्त सामनेच वाचवले नाहीत तर विजय सुद्धा मिळवून दिले होते. त्यानंतर 1998मध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजीच्या ताफ्यात सामील झाला 18 वर्षाच्या एक सरदार, म्हणजे हरभजन सिंग (Harbhajan Singh). खरंतर सुरुवातीला कुंबळेमुळे भज्जीला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही, परंतु नंतर भज्जीने त्याच कुंबळेबरोबर अशी जोडी तयार केली की विरोधी संघात या जोडीचा दरारा दिसू लागला.
हळूहळू हरभजन सिंगचा प्रवास भारतीय क्रिकेटमधील एक ‘दिग्गज’ गोलंदाज म्हणून सुरु झाला. पुढे त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने जादू केली आणि बरेच नाव कमावले. पण नेहमीच तो अॅटिट्यूड आणि रागामुळे वादात सापडला. मग ते ऑस्ट्रेलियामधील ‘मंकीगेट’ असो किंवा श्रीसंतसोबत ‘थप्पड कांड’ असो.
तसे, अझरच्या नेतृत्वात हरभजन सिंग भारतीय संघात दाखल झाला होता. परंतु, 2001 मध्ये सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका म्हणजे त्याच्या कारकिर्दीला वळण देणारा टप्पा ठरला होता. त्यानंतर भज्जीला संघात नियमित संधी मिळत गेली. एक वेळी कॅनडामध्ये ट्रक ड्रायव्हर होण्याचा स्वप्न पाहणारा मुलगा ते भारतीय संघाचा महान गोलंदाज हा प्रवास एवढा सहजासहजी नक्कीच झाला नाही.
जेव्हा न्यूझीलंड विमानतळावर भज्जीला थांबवलं-
2002 च्या शेवटी भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडला जाणार होता. परंतु नोव्हेंबरमधल्या या न्यूझीलंडच्या दौर्यावर जाण्यापूर्वी म्हणजेच दि. 28 नोव्हेंबर 2002ला हरभजनच्या बहिणीचे लग्न झाले होते. त्याआधी तो सामना खेळण्यात व्यस्त होता. घाई-घाईत दि. 26 नोव्हेंबर 2002 रोजी रात्री विजयवाडा येथे सामना खेळल्यानंतर हरभजन जालंधरला परतला.
विजयवाडा ते जालंधरला थेट विमान नव्हते. मग तेथून हैदराबाद व नंतर दिल्लीमार्गे जलंधरला पोहोचला. तो आपल्या बहिणीच्या लग्नात इतका व्यस्त होता की त्याला खायलाही वेळ मिळाला नाही. लग्नानंतर लवकरच त्याला भारतीय संघासह न्यूझीलंडला रवाना व्हायचं होतं.
बहिणीचे लग्न होताच भज्जी संघात परतला. 26 तारखेपासून 28 तारखेपर्यंत त्याचा झालेला प्रवास आणि बहिणीच्या लग्नामध्ये धावपळ करून आलेला थकवा याचा परिमाण त्याला एवढा झाला की फ्लाइटमध्येच त्याला 104 डिग्री ताप आला. विमान न्यूझीलंडला पोहोचले. दादाच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला गेलेली संपूर्ण टीम विमानातून खाली उतरली आणि विमानतळावरून बाहेर पडायला लागली. इतर खेळाडूंप्रमाणे भज्जीकडेही त्यावेळी लाल रंगाची बॅग होती. बॅगमध्ये त्याचे किट आणि इतर सामान होते. बाकीच्या सामानाबरोबरच त्याचे बरेच शूजही त्या बॅगमध्ये ठेवलेले होते. परंतु विमानतळातून बाहेर पडताना बॅग स्कॅन-मशीनमधून बाहेर पडल्यावर एका अधिकाऱ्याने एकाच गोंधळ निर्माण केला. भज्जीच्या बॅगमधले शूज खूप गलिच्छ होते. हरभजनच्या शूजच्या स्पाइक्समध्ये बरीच माती होती. विजयवाड्यात खेळल्या गेलेल्या सामन्याची धूळ त्याच्या शूजवर होती. घाणेरडे शूज पाहून हा वाद इतका वाढला की अधिकारी म्हणाले,
“या बॅगमधील शूज खूप गलिच्छ आहेत. त्यांना खूप माती लागली आहे. त्यांनी शूज बॅगमध्ये लपवून तेथून काढण्याचा प्रयत्न केला आहे.”
शूजमुळे उद्भवलेल्या या वादामागील खरं कारण म्हणजे न्यूझीलंडचा कायदा होता. न्यूझीलंडमध्ये घाणेरडे शूज घालणे किंवा बाळगण्यास मनाई आहे. शूजच्या घाणीतून अनेक प्रकारचे रोग होतात, असे तिथल्या कृषीमंत्र्यांच म्हणणं होतं.
संघातील सर्व खेळाडू बाहेर आले पण भज्जी तिथेच अडकला होता. विमानतळाबाहेर भज्जीचे चाहते त्याला भेटायला थांबले होते, कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर हरभजन सिंग मोठा स्टार खेळाडू बनला होता. परंतु विमानतळावरील कर्मचारी त्याला बाहेर येऊ देत नव्हते.
या प्रकरणावर बरेच वादंग झाले. अखेरीस, या वाद-विवादानंतर हरभजनला दंड भरावा लागला आणि मग त्याला बाहेर सोडलं. त्या न्यूझीलंडविरुद्धच्या दौर्यात भारतीय संघाने दोन्ही कसोटी सामने गमावले. पण त्यानंतर, हरभजनने शपथ घेतली असावी की, संपूर्ण कारकिर्दीतील न्यूझीलंडमध्ये उत्तम गोलंदाजी करणार. कारकीर्दीतील परदेशातील त्याची सर्वोत्तम गोलंदाजीची सरासरी न्यूझीलंडविरुद्ध आहे.
न्यूझीलंडमधील त्याची गोलंदाजीची सरासरी 24.19 आहे, जी त्याची परदेशातील कोणत्याही संघाविरुद्धची सर्वोत्कृष्ट सरासरी आहे. इतकेच नव्हे तर वर्ष 2002 हे त्याच्या 17 वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट वर्षही होते. यावर्षी त्याच्या नावावर सर्वाधिक 63 विकेट्स आहेत. याच हरभजनसाठी 2021 चे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष ठरले. त्याने 24 डिसेंबर 2021 रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
संबंधित लेख-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
वाढदिवस विशेष: वयाच्या 16व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरची विकेट घेणारा पियुष चावला