---Advertisement---

वाढदिवसालाच क्रिकेटमध्ये वाढीव कारनामा करणारे ५ खेळाडू

On: गुरूवार, एप्रिल 23, 2020 9:18 PM
---Advertisement---

वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस असतो. काहीतरी खास गोष्ट आपल्याकडून वाढदिवसाच्या दिवशी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.

त्याप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी सामना असल्यास काहीतरी खास कामगिरी करावी असे प्रत्येक खेळाडूलाही वाटत असते. पण असे प्रत्येकाच करता येत नाही. पण तरीही जागतिक क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांनी वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या संघासाठी आणि वैयक्तिकरित्याही शानदार कामगिरी केली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी खास कामगिरी करणारे ५ क्रिकेटपटू –

१. विनोद कांबळी –

भारतीय संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळीने १८ जानेवारी १९९३ ला २१ व्या वाढदिवसाच्या दिवशी शतकी खेळी केली होती. त्याने इंग्लंडविरुद्ध जयपूरला झालेल्या वनडे सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती. त्यावेळी तो वाढदिवसाच्या दिवशी वनडेत शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला होता.

मात्र त्याच्यासाठी जरी हा वाढदिवस वैयक्तिकरित्या खास ठरला असला तरी भारताला मात्र या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने त्यावेळी ४८ षटकांचा करण्यात आलेल्या त्या सामन्यात २२३ धावा करुन इंग्लंडला २२४ धावांचे लक्ष्य दिले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडने ४ विकेट्सने विजय मिळवला होता.

२. सचिन तेंडुलकर –

सचिन तेंडुलकरने २४ एप्रिल १९९८ ला त्याच्या २५ व्या वाढदिवसाच्या दिवशी शानदार शतकी खेळी करत भारताला शारजा कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला २७३ धावांचे आव्हान दिले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात डॅमिएन फ्लेमिंग, मायकल कास्प्रोविक, शेन वॉर्न आणि टॉम मूडी असे गोलंदाज होते. अशा गोलंदाजांविरुद्ध सचिनने १३१ चेंडूत १३४ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार मारले होते. त्याच्या या शतकामुळे भारताने विजय मिळवून शारजा कपही जिंकला होता. सचिनच्या शतकाची गणना त्याच्या सर्वोत्तम शतकांमध्ये होते.

३. जेसन गिलेस्पी –

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीसाठी त्याचा ३१ वा वाढदिवस खास ठरला होता. त्याने १९ एप्रिल २००६ ला त्याच्या ३१ व्या वाढदिवसाच्या दिवशी बांगलादेशविरुद्ध कसोटीत चटगाव येथे खेळताना गोलंदाजीत नाही तर फलंदाजीत कमाल केली होती.

१६ एप्रिलला सुरु झालेल्या या सामन्यात बांगलादेशला पहिल्या डावात १९७ धावांवर सर्वबाद केल्यावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर गिलेस्पीला नाईटवॉटमन म्हणून फलंदाजीला पाठवले होते. गिलेस्पीने त्या सामन्यात पहिल्या दिवशी नाबाद ५ धावा केल्या. त्यानंतर तो दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी नाबाद राहिला. त्याने तिसऱ्या दिवशी शतकी खेळी केली होती.

नंतर त्याच्या ३१ व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे त्या सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने नाबाद २०१ धावांची खेळी केली. त्यावेळी तो कसोटीत द्विशतक करणारा पहिला नाईटवॉचमन खेळाडू होता.

त्याच्या द्विशतकानंतर ऑस्ट्रेलियाने ४ बाद ५८१ धावांवर डाव घोषित केला. तसेच बांगलादेशला दुसऱ्या डावात ३०४ धावांवर सर्वबाद करत १ डाव ८० धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात गिलेस्पीने ३ विकेट्सही घेतल्या होत्या.

४. रॉस टेलर –

न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरने त्याच्या २७ व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच ८ मार्च २०११ मध्ये विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध १२४ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १३१ धावा केल्या होत्या.

कॅंडी येथे झालेल्या या सामन्यात टेलरने अतिशय स्फोटक खेळी केली होती. २९ षटकांत ४ बाद ११३ अशा अवस्थेतून त्याने संघाला बाहेर काढत ५० षटकांत ७ बाद ३०२ धावांचा टप्पा गाठून दिला होता. त्यानंतर पाकिस्तानचा संघ १९२ धावांवर सर्वबाद झाल्याने न्यूझीलंडचा संघ ११० धावांनी विजयी झाला होता.

५. पिटर सिडल –

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पिटर सिडलसाठी त्याचा २६ वा वाढदिवस खास ठरला होता. त्याने २५ नोव्हेबंर २०१० ला ऍशेस मालिकेतील ब्रिस्बेनला झालेल्या पहिल्या कसोटीत हॅट्रिक घेत २६ वा वाढदिवस साजरा केला होता.

ब्रिस्बेन कसोटी सामन्याला २५ नोव्हेंबरपासूनच सुरुवात झाली होती. पहिल्याच दिवशी सिडलने ६५ व्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे ऍलिस्टर कूक, मॅट प्रायर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना बाद केले होते. तो वाढदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज आहे.

सिडलने या सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी हा सामना अनिर्णित राहिला होता.

६. युवराज सिंग –

युवराजने टी२० क्रिकेटमध्ये अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्यातील एक त्याने त्याच्या २८ व्या वाढदिवसाच्या दिवशी केली होती. युवराजच्या २८ व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे १२ डिसेंबर २००९ ला भारत विरुद्ध श्रीलंका संघात मोहाली येथे टी२० सामना झाला होता.

या सामन्यात श्रीलंकेने २०६ धावा करत भारतासमोर २०७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. यावेळी गोलंदाजी करताना भारताच्या अन्य गोलंदाजांना मोठे यश मिळाले नसले तरी युवराजने ३ षटकात २३ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या.

एवढेच नाही तर त्याने ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत २५ चेंडूत नाबाद ६० धावा करत भारताला विजयही मिळवून दिला होता. त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले होते.

ट्रेडिंग घडामोडी – 

वर्ल्डकपची फायनल म्हटली की या शहरातील खेळाडू सामनावीर पुरस्कार मिळवतातच

अबब! पुढील ४ वर्षात होणार क्रिकेटचे ५ वर्ल्डकप!

२४८वनडे सामने खेळल्यानंतर सचिन- विराटमध्ये कोण ठरलं कुणाला भारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---