कोरोना व्हायरसमुळे गेल्या २-३ महिन्यांपासून क्रिकेट क्षेत्र ठप्प पडले आहे. परंतु, सध्या या जागतिक महामारीचा प्रभाव थोडाफार कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे हळूहळू क्रिकेटच्या स्पर्धांना सुरुवात केली जात आहे. नुकतेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यातील पहिला सामना ८ जुलैला होणार आहे.
तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने समर फिक्स्चरचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. मात्र, आयसीसीने क्रिकेटची नव्याने सुरुवात झाल्यानंतर कोणत्याही खेळाडूला या जागतिक महामारीचा त्रास होऊ नये म्हणून नियमावली ठरवली आहे. त्यानुसार पूर्ण तयारीसह क्रिकेटचा नव्या हंगामाची सुरुवात होईल. अशात, या नव्या सुरुवातीनंतर कोणते असे खेळाडू असतील ज्यांच्यावर दर्शकांच्या नजरा खिळल्या असतील? 5 Cricketers Who Will In Main Focus In Post Covid-19 Season
अशा ५ खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे. तर बघूयात…
१. मार्नस लॅब्यूशाने
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला २०१९मध्ये एक जबरदस्त फलंदाज गवसला. तो फलंदाज म्हणजे मार्नस लॅब्यूशाने. तसं तर लॅब्यूशानेने ऑक्टोबर २०१८मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. विशेष म्हणजे, तो ऑस्ट्रेलिया संघात डोक्याला चेंडू लागल्यामुळे त्या खेळाडूच्या बदल्यात संघात पदार्पण करणारा पहिलाच खेळाडू ठरला. पण, त्याला २०१८मध्ये फक्त २ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती.
२०१९मध्ये लॅब्यूशानेने कमाल केली. त्याने संपूर्ण वर्षात ऑस्ट्रेलियाकडून ११ कसोटी सामने खेळत सर्वाधिक ११०४ धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया संघातील कोणताही फलंदाज २०१९मध्ये १०००पेक्षा जास्त धावा करु शकला नाही. शिवाय, आतापर्यंत लॅब्यूशानेने त्याच्या कसोटी कारिकिर्दीत १४ सामन्यात सर्वाधिक ६३.४३च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. त्यामुळे यावर्षीच्या शेवटी भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल, तेव्हा सर्वांच्या नजरा लॅब्यूशानेच्या कामगिरीवर असतील.
२. नसीम शाह
पाकिस्तान संघाकडे अगोदरपासूनच दमदार वेगवान गोलंदाजांची कमी नाही. या यादीत नसीम शाह हे उभरते नाव आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, संपूर्ण मालिकेत १७ वर्षीय शाहने आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केले.
त्याने २०१९मध्ये ३ कसोटी सामने खेळत एकूण ८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, नुकताच एक केंद्रिय करार मिळाल्यामुळे शाहला येत्या इंग्लंड दौऱ्यावर संधी मिळण्याची शक्यता आहे आणि तो यावेळी स्वत:ला आपल्या कामगिरीने सिद्ध करेल.
३. हार्दिक पंड्या
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या हा गतवर्षी दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर झाला होता. परंतु, त्याने डीवाय पाटील टी२० चषकातून धमाकेदार पुनरागमन केले होते. यावेळी, त्याने २ शतके ठोकली होती. शिवाय त्याची गोलंदाजीतील कामगिरीही उल्लेखनीय होती. त्यामुळे पंड्याला आता भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी कशी मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पंड्या येत्या टी२० विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
४. जोफ्रा आर्चर
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर २०१९मधील ऍशेज सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथविरुद्धच्या स्पर्धेमुळे चर्चेत आला होता. शिवाय आर्चरने गतवर्षी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हर टाकत संघाला विश्वविजेता बनवले होते. त्यामुळे जुलै २०२०मध्ये वेस्ट इंडिज संघ जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर येईल, तेव्हा आर्चरच्या कामगिरीची सर्वांना उत्सुकता असेल.
५. जसप्रीत बुमराह
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्यावर्षीपासून चढ-उतारांचा सामना करत आहे. २०२०मध्ये बुमराहने ४२.८६च्या सरासरीने फक्त १५ विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय न्यूझीलंड दौैऱ्यावर त्याने २ कसोटी सामन्यात फक्त ६ विकेट्स घेतल्या आहेत. हा आतापर्यंत त्याचे अतिशय वाईट प्रदर्शन होते.
शिवाय न्यूधीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही बुमराहने १६७ धावा देत एकही विकेट मिळवली नव्हती. त्यामुळे नक्कीच बुमराह येत्या काळात आपली कामगिरी सुधारण्याच्या तयारीत असणार. त्यामुळे त्याला खेळताना पाहणे रोमांचक असेल.
ट्रेंडिंग लेख-
वनडेत कासवगतीने शतकी खेळी करणारे ५ भारतीय फलंदाज
‘पार्ट टाईम गोलंदाजी’ करताना ५ विकेट्स घेणारे ३ दिग्गज भारतीय फलंदाज
दुर्दैवी क्रिकेटपटू! कसोटीत १९९ धावसंख्येवर बाद होणारे ‘हे’ २ शैलीदार…