२००४ ला पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला गेला होता. तेव्हापासून टी२० क्रिकेटने मागील अनेक वर्षात मोठी प्रगती केली आहे. आत्तापर्यंत १००० पेक्षाही अधिक टी२० सामने देखील खेळले गेले आहेत.
तसेच आत्तापर्यंत २०८० खेळाडू किमान एक तरी टी२० सामना खेळले आहेत. त्यातील २२२ खेळाडू आत्तापर्यंत केवळ १ टी२० सामना खेळला आहे. यात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. अशाच ५ दिग्गज खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी कारकिर्दीत केवळ १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे.
५. रसल अरनॉल्ड – श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू रसल अरनॉल्डने त्याच्या १९९७ ते २००७ च्या दरम्यान कारकिर्दीत एकूण ४४ कसोटी आणि १८० वनडे सामने खेळले आहेत. पण आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये मात्र तो एकच सामना खेळला आहे.
त्याने इंग्लंडविरुद्ध १५ जून २००६ ला हा सामना खेळला होता. हा श्रीलंकेचा पहिलाच टी२० सामना होता. या सामन्यात अरनॉल्डने ७ धावाच केल्या होत्या. पण तरीही श्रीलंकेने हा सामना २ धावांनी जिंकण्यात यश मिळवले होते. या सामन्यानंतर मात्र अरनॉल्ड एकही टी२० सामना खेळला नाही.
४. इंझमाम-उल-हक – पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हकने वनडे आणि कसोटीमध्ये खेळताना अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. त्याने ३७८ वनडे आणि १२० कसोटी सामने खेळताना एकूण ३५ शतकांसह २० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये तो केवळ १ सामना खेळला आहे.
त्याने २८ ऑगस्ट २००६ ला इंग्लंड विरुद्ध कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा सामना खेळला होता. हा पाकिस्तानचा पहिलाच टी२० सामना होता. विशेष म्हणजे या सामन्यात त्याने संघाचे नेतृत्वही केले होते.
त्याने त्या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या १४५ धावांचा पाठलाग करताना नाबाद ११ धावा केल्या होत्या. तो सामना पाकिस्तानने सहज जिंकला होता. पण त्या सामन्यानंतर मात्र इंजमाम एकही टी२० सामना खेळला नाही. त्याने नंतर २००७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
३. जेसन गिलेस्पी –ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीने त्याच्या कारकिर्दीत ७१ कसोटी आणि ९७ वनडे सामने खेळताना ४०१ विकेट्स घेतल्या. पण मात्र त्याला त्याच्या कारकिर्दीत एकच आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळण्याची संधी मिळाली.
त्याने १३ जून २००५ ला इंग्लंड विरुद्ध टी२० सामना खेळला. या सामन्यात त्याला गोलंदाजीमध्ये अधिक यश मिळाले नाही त्याने ४ षटकात तब्बल ४९ धावा देताना केवळ १ विकेट घेतली. पण मात्र फलंदाजीत त्याने चांगले योगदान दिले. १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तो ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने २४ धावा केल्या होत्या. मात्र अन्य फलंदाज अयशस्वी झाल्याने ऑस्ट्रेलियाला १०० धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
२. राहुल द्रविड – भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने कसोटी आणि वनडेत खेळताना अनेक पराक्रम केले. नेहमीच संयमी खेळी करणारा फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने जलद गतीने खेळल्या जाणाऱ्या टी२० सारख्या प्रकारात मात्र आंतरराष्ट्रीय स्थरावर केवळ एकच सामना खेळला. हा सामना त्याने २०११ ला इंग्लंड दौऱ्यात खेळला होता.
हा सामना ३१ ऑगस्टला झाला होता. या सामन्यात द्रविडने २१ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या. त्यात द्रविडने ३ षटकार खेचले होते. हे तिन्ही षटकार त्याने समित पटेलच्या गोलंदाजीवर लागोपाठच्या चेंडूवर मारले होते.
मात्र हा सामना अखेर इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकला होता. द्रवि़ड त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा एकमेव टी२० सामना खेळला. कारण त्यानंतर त्याने टी२० आणि वनडेमधून निवृत्ती घेतली.
१. सचिन तेंडुलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनडे आणि कसोटीत सर्वाधिक सामन्यांबरोबर सर्वाधिक धावा करण्याचाही विश्वविक्रम केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटपासून मात्र सचिन लांब राहिला. त्याने त्याच्या कारकिर्दीत केवळ १ टी२० सामना खेळला.
हा सामना त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १ डिसेंबर २००६ ला खेळला होता. हा भारताचाही पहिलाच टी२० सामना होता. या सामन्यात सचिनने दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १० धावा केल्या होत्या. तसेच त्याआधी त्याने गोलंदाजी करताना २.३ षटके गोलंदाजी करताना १२ धावा देत १ विकेट घेतली होती. पण त्यानंतर सचिनने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला.
ट्रेंडिंग लेख –
१० भारतीय दिग्गज क्रिकेटपटू व त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड्स
जगातील ‘हे’ ५ दिग्गज गोलंदाज वनडे सामन्यात ५ बळी मिळवण्यात ठरलेत अपयशी
भारतीय संघातील ‘हे’ पाच खेळाडू, ज्यांनी टी-20 विश्वचषकात लगावले आहेत सर्वाधिक षटकार