साल २०२० या वर्षाचा अखेर शेवटचा दिवस उजाडला. या संपूर्ण वर्षात अनेक घटना घडल्या, ज्या नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील. अनेक चांगल्या-वाईट आठवणी या वर्षाने प्रत्येकाच्या आयुष्यात दिल्या. त्यातच वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले. त्याने सर्वांना अनेक दिवस घरातच बसून काढावे लागले. दरम्यान कोरोना व्हायरसचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर पडला. त्याच क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. यामुळे अनेक क्षेत्रांप्रमाणेच क्वचितच बंद क्रीडा क्षेत्रही काही महिने चक्क ठप्प पडले होते. पण अखेर सर्वकाही पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु झाले. असे असले तरी याच वर्षात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला. अशाच ५ भारतीय क्रिकेटपटूंबद्दल आपण जाणून घेऊ, ज्यांनी या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले.
५. एमएस धोनी –
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना लिहिले की ‘७ वाजून २९ मिनिटानंतर मला निवृत्त समजावे.’
धोनीने २३ डिसेंबर २००४ रोजी भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने १५ वर्षे क्रिकेट खेळताना अनेक यशाची शिखरे पार केली. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीन मोठ्या स्पर्धांची विजेतेपदं जिंकली.
त्याने याआधीच डिसेंबर २०१४ ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १ द्विशतकांचा आणि ५ शतकांचा, तसेच ३३ अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ३५० वनडे सामने खेळले असून यात त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतकांसह ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने ९८ टी२० सामन्यात २ अर्धशतकांसह १६१७ धावा केल्या आहेत.
४. सुरेश रैना –
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने देखील १५ ऑगस्ट, २०२० ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर काही वेळातच रैनानेही निवृत्ती घेतली होती.
साल २००५ मध्ये पदार्पण केलेला सुरेश रैना भारताकडून १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळला असून २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ शतके आणि ४८ अर्धशतकांसह ७९८८ धावा केल्या आहेत. रैनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १७ जुलै २०१८ रोजी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळला.
रैना हा भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिला खेळाडू आहे.
३. इरफान पठाण –
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने ४ जानेवारी, २०२० रोजी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी अनेकांना त्याच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटले.
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ कसोटी, १२० वनडे आणि २४ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स, वनडेत १५४४ धावा आणि १७३ विकेट्स आणि टी२० मध्ये १७२ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत.
इरफानने भारताच्या अनेक मोठ्या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे. तो २००७ च्या टी२० विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला होता.
याबरोबरच इरफानने २००६ ला कराची येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या कसोटी सामन्यात हॅट्रिक घेतली होती. तो कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा हरभजन सिंगनंतरचा दुसराच गोलंदाज ठरला होता.
२. पार्थिव पटेल –
भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने ९ डिसेंबर २०२० रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पार्थिव पटेल अशाप्रकारे तडका फडकी निवृत्ती घेईल याची पुसटशी ही कल्पना कोणालाच नव्हती. त्याने २००२ साली वयाच्या १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर अनेकदा तो भारतीय संघात आत-बाहेर करत राहिला. अखेर त्याने यावर्षी निवृत्ती घेण्याचा विचार केला.
त्याने भारतीय संघाकडून २५ कसोटी सामने, ३८ वनडे सामने आणि २ टी२० सामने खेळले आहेत. यात कसोटीत त्याने ९३४ धावा, वनडेत ७३६ धावा आणि टी२०त ३६ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने १९४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
त्याच्या या निर्णयाच्या एक दिवसानंतर लगेच मुंबई इंडियन्सकडून त्याच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो आता मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षण विभागासोबत काम करणार आहे. त्याच्यावर ‘टॅलेंट स्काउट’ची जबाबदारी असेल.
१. वासिम जाफर –
भारताचा दिग्गज फलंदाज वसिम जाफरने ७ मार्चला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. त्याने वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळले. देशांतर्गत क्रिकेटमधील तर अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.
जाफरने भारताकडूनही २००० ते २००८च्या दरम्यान ३१ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी त्याने ५ शतके आणि ११ अर्धशतके ठोकत १९४४ धावा केल्या. तसेच रणजी ट्रॉफीमध्ये जाफरने जवळजवळ २३ वर्षे खेळताना १२०३८ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. जाफरने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दित एकूण ५७ शतके केली आहेत. त्यातील ४० शतके त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना केले आहेत.
जाफरने त्याच्या कारकिर्दीत एकूण २६० प्रथम श्रेणी सामन्यात ५०.६७ च्या सरासरीने १९४१० धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५७ शतकांचा आणि ९१ अर्धशताकांचा समावेश होता. नाबाद ३१४ या त्याचा सर्वोत्तम धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शुबमन गिल, मोहम्मद सिराजला मिळाली सचिन तेंडुलकरकडून कौतुकाची थाप; म्हणाला…
मैदानावर शिवी देणं ‘या’ ऑसी क्रिकेटरला पडलं महागात, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठोठावला २५०० डॉलर्सचा दंड
अजिंक्य रहाणे म्हणतो, भारतीय संघासाठी ‘ही’ गोष्ट म्हणजे सर्वात मोठे बक्षीस