भारतीय संघाने आजवर अनेक अविस्मरणीय वनडे सामना खेळले आहेत, ज्यांचा चाहत्यांना विसर पडणे अशक्य आहे. १९८३ साली भारताने पहिले विश्वचषक जिंकून चाहत्यांच्या मनातील क्रिकेटबद्दलची ओढ जागवली होती. तर २८ वर्षांनंतर २०११ सालचा वनडे विश्वचषक पटकावत भारतीय संघाने त्यांच्यातील प्रतिभा जगाला दाखवून दिली होती. १९८४-८५मधील बेंसन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशीपचे विजेतेपद मिळवत भारतीय संघाने सर्वांना चकित केले होते.
तर, २००२मधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीलंकासोबत संयुक्त विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने २०१३मध्ये इंग्लंडला पराभूत करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. तसेच, भारतीय संघाने ७वेळा आशिया चषक पटकावला आहे आणि ऑस्ट्रेलियामधील तिरंगी मालिका जिंकत नवा इतिहासही रचला आहे. या विजयांनी चाहत्यांना मनात क्रिकेटबद्दल प्रेम नक्की केली. परंतु, असेही काही महत्त्वाचे सामने आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने अतिशय खराब प्रदर्शन केले आहे. त्यांच्या दारुण पराभवांमुळे चाहत्यांना खूप निराश केले होते.
तर पाहूयात भारताच्या त्या ५ सामन्यांविषयी, ज्यामधील पराभवामुळे चाहते निराश झाले होते
5 Indian Team ODI Matches Fans Would Like To Forget
भारत विरुद्ध श्रीलंका – १९९६ विश्वचषक, उपांत्य फेरी
११९६च्या विश्वचषकात भारतीय संघाने चढ-उतारांसह अखेर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. साखळी फेरीत भारताने केन्या, वेस्टइंडिज आणि झिम्बाब्वे संघांना पराभूत केले होते. तर, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पराभवाचा स्विकार करावा लागला होता. तरीही उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत भारताने उपांत्य फेरी गाठली होती.
यावेळी श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद २५१ धावा केल्या होत्या. यात अरविंद डी सिल्वा आणि रोेशन महानामा यांच्या अर्धशतकांचा समावेश होता. श्रीलंकाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला विशेष कामगिरी करता आली नव्हती. सलामीला फलंदाजी करत सचिन तेंडुलकर ६५ धावा करत बाद झाला होता. त्यानंतर संजय मांजरेकर, मोहम्मद अझरुद्दीन हेदेखील प्रत्येकी २५ आणि शून्य धावांवर बाद झाले होते.
३५व्या षटकात भारताच्या ८ बाद १२० धावा झाल्या होत्या. भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनामुळे दर्शकांनी चालू सामन्यात मैदानावर येऊन गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सामना मध्येच थांबवण्यात आला आणि सामना रेफरी क्लाइव लॉयड यांनी श्रीलंकाला विजयी घोषीत केले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २००३ विश्वचषक, अंतिम सामना
२००३मधील विश्वचषकात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले होते. परंतु, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यात अंतिम सामन्याचा समावेश होता. साखळी फेरित भारताने ६पैकी ५ सामने जिंकत सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळवला होता. पुढे सुपर सिक्समध्ये भारताने सलग ३ सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता आणि उपांत्य फेरित केन्याला पराभूत करत अंतिम सामना गाठला होता.
अंतिम सामन्यात कर्णधार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी कर्णधार रिकी पाँटिंगच्या १४० धावा, डॅमियन मार्टिनच्या ८८ धावा आणि ऍडम गिलख्रिस्टच्या ५७ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला ३६० धावांचे आव्हान दिले होते. त्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त २३४ धावा करत ३९व्या षटकात सर्वबाद झाला होता. यावेळी विरेंद्र सेहवागने केलेली ८२ धावांची प्रशंसनीय खेळी वाया गेली.
भारत विरुद्ध बांग्लादेश – २००७ विश्वचषक, ग्रुप स्टेज
२००७ सालच्या विश्वचषकातील भारतीय संघाचा पहिला सामना कोणत्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. ग्रुप बी मधून बांग्लादेशविरुद्ध आपला पहिला सामना खेळताना अचानक हातातला सामना भारताने गमावला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद १९१ धावा केल्या होत्या. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुशफिकर रहीम, शाकिब अल हसन आणि तमीम इकबालच्या अर्धशतकी खेळी बांग्लादेशने ४८.३ षटकात ५ विकेट्स गमावत विजय मिळवला होता. या सामन्यात बांग्लादेशचा मसरफे मोर्तजा ३८ धावा देत ४ विकेट्स घेत सामनावीर ठरला होता.
पुढील सामन्यात भारतीय संघाने बर्म्युडा संघाला पराभूत केले होते. परंतु ग्रुप सामन्यातील श्रीलंकाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पराभूत होत भारत विश्वचषकातून बाहेर झाला होता. भारताचे हे विश्वचषकातील सर्वात लाजिरवाणे प्रदर्शन होते.
भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी, अंतिम सामना
२०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने ग्रुप स्टेजमधील ३पैकी २ सामने जिंकले होते आणि पहिले स्थान पटकावत उपांत्य फेरित प्रवेश मिळवला होता. उपांत्य फेरित भारताने बांग्लादेशला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिNवला होता. विशेष म्हणजे, अंतिम सामना पाकिस्तान संघाविरुद्ध होता.
अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारताला ३३९ धावांचे मोठे आव्हान दिले. परंतु, भारतीय संघ पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३१व्या षटकात १५८ धावांवर सर्वबाद झाली होती. पाकिस्तानने १८० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळे भारतीय चाहते खूप निराश झाले होते.
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २०१९ विश्वचषक, उपांत्य फेरी
२०१९च्या विश्वचषकात भारताने ग्रुप स्टेजमध्ये दमदार प्रदर्शन करत ९ पैकी ७ सामने जिंकले होते आणि १५ अंकांसह पहिले स्थान मिळवले होते. भारताचा उपांत्य सामना ग्रुप स्टेजमध्ये चौथ्या स्थानावर असणाऱ्या न्यूझीलंडसोबत झाला होता. पावसामुळे तो सामना २ दिवस चालला.
न्यूझीलंडने पहिल्या दिवशी ४६.१ षटकात ५ बाद २११ धावा केल्या होत्या. त्यांचा डाव दुसऱ्या दिवशी ८ बाद २३९ धावांवर संपुष्टात आला. भारताने न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना ४ षटकात ३ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, रविंद्र जडेजाच्या ७७ धावा आणि एमएस धोनीच्या ५० धावांनी संघाच्या विजयाच्या आशा थोड्याफार दिसत होत्या. परंतु, जडेजा ४८व्या षटकात बाद झाला आणि ४९व्या षटकात धोनीचीही विकेट गेली आणि अखेर ४९.३ षटकात २२१ धावांवर भारत सर्वबाद झाला. यासह भारतीय संघाचे अंतिम सामन्यात पोहोचण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
ट्रेंडिंग लेख-
जागतिक क्रिकेटमधील ७ सर्वात आळशी क्रिकेटपटू; २ नावे आहेत भारतीय…
आयपीएलमध्ये फलंदाजांना रडकुंडीला आणणारे ६ भारतीय गोलंदाज
खालच्या फळीत खेळणारे ३ खेळाडू, जे पुढे जाऊन बनले टीम इंडियाचे धुव्वांदार सलामीवीर