---Advertisement---

खेळाडूंनी अशी काही खेळभावना दाखवली की या ५ घटनांनी जिंकली जगाची मनं

On: शुक्रवार, एप्रिल 24, 2020 3:24 PM
---Advertisement---

कोणताही खेळ हा २ प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला जातो. कोणत्याही सामन्यात दोन्ही प्रतिस्पर्ध्याच्या कौशल्याची, क्षमतेची परिक्षा होत असते. जो प्रतिस्पर्धी चांगली कामगिरी करतो तो विजय मिळवतो. त्या दोन्ही प्रतिस्पर्धींनी दाखवलेल्या कौशल्याची, खेळाची चर्चा नेहमी होत असते.

कोणत्याही खेळात जसे खेळाडूंची क्षमता, कौशल्य, प्रतिभा, जिद्द, मेहनत महत्त्वाची असते तसेच एक असा पैलू असतो ज्याला सर्वत्र मान दिला जातो तो पैलू म्हणजे खेळाडूच्या अंगी असलेली खिलाडूवृत्ती.

खेळाच्या नियमात, स्वरुपात कितीही बदल झाला, तो खेळ खेळणारे खेळाडू बदलले, काळ बदलला तरी खिलाडूवृत्तीला आजही तितकेच महत्त्व आहे. खिलाडूवृत्तीचा लिखित असा काही नियम नाही पण तरीही सामन्यात जय-पराजय कोणाचाही झाला तरी जो खेळाडू त्याच्यातील खिलाडूवत्तीचे प्रदर्शन करतो त्याचे कौतुक नेहमीच होत रहाते.

क्रिकेटला तर जेंटलमन लोकांचा खेळ असेच म्हटले जाते. त्यामुळे क्रिकेटमध्येही खिलाडूवृत्तीला मोठे महत्त्व दिले जाते. अगदी आयसीसीही प्रत्येकवर्षी खिलाडूवृत्ती दाखवलेल्या एका खेळाडूला पुरस्कार देते. अशाच खिलाडूवृत्तीमुळे चर्चेत आलेल्या क्रिकेटमधील काही घटनांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

१. २००५ ऍशेस – अँड्र्यू फ्लिंटॉफ 

२००५ मधील ऍशेस मालिका ही कसोटी क्रिकेटमधील एक रोमांचकारी मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेतील सर्व ५ सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघाकडून रोमांचक खेळ पहायला मिळाला होता.

पण मैदानातील तीव्र स्पर्धेनंतरही याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफने ऑस्ट्रेलियाच्या निराश झालेल्या ब्रेटलीबरोबर दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे खूप कौतुक झाले होते.

या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयासाठी २८२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची आवस्था ८ बाद १७५ अशी झाली होती. तरीही त्यावेळी ब्रेट लीने सुरुवातीला शेन वॉर्नला साथीला घेत ९ व्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली होती. तसेच नंतर त्याने मायकल कॅस्प्रोविकला साथीला घेत ऑस्ट्रेलियाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने १० व्या विकेटसाठी कॅस्प्रोविकबरोबर ५९ धावांची भागीदारी केली होती.

तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ ३ धावांची आणि सामन्यात बरोबरी करण्यासाठी २ धावांची गरज होती. पण त्याचवेळी स्टिव्ह हार्मिसनच्या गोलंदाजीवर कॅस्प्रोविकचा झेल यष्टीरक्षक जेरिंट जोन्सने घेतला आणि हा सामना इंग्लंडने केवळ २ धावांनी जिंकला.

त्यावेळी नाबाद ४३ धावा करणारा ब्रेट ली विजय इतका जवळ असूनही पराभव झाल्याने निराश झाला होता. तेव्हा इंग्लंड संघ विजयाचे सेलिब्रेशन करत असताना फ्लिंटॉफ ली पाशी आला आणि त्याने त्याचे सांत्वन केले होते. तसेच त्याने लीने दाखवलेल्या लढावू वृत्तीचे कौतुकही केले होते.

https://twitter.com/ICC/status/1158965997732323330

२. २००३ विश्वचषक उपांत्य सामना – ऍडम गिलख्रिस्ट 

विश्वचषकात कोणताही सामना जिंकणे हे सर्वात महत्त्वाचे लक्ष कोणत्याही संघासमोर असते. त्यातही जर तो उपांत्य सामना असेल तर काहीही करुन विजय मिळवण्याचा प्रयत्न तो सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांचा असतो.

पण असे असतानाही २००३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पंचांनी बाद दिलेले नसतानाही मैदानातून बाहेर जाण्याची खिलाडूवृत्ती दाखवली होती.

त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून सलामीला ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन फलंदाजीसाठी उतरले होते. त्यावेळी ६ व्या षटकात गिलख्रिस्टने अरविंदा डी सिल्वाच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटीचा कड घेत यष्टीरक्षक कुमार संगकाराकडे गेला. संगकारानेही चूक न करता झेल घेतला. पण मैदानावरील पंच रुडी कोर्टझेन यांनी त्याला नाबाद दिले.

पंचांच्या या निर्णायाबद्दल श्रीलंकेच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. पण त्याचवेळेस लगेचच गिलख्रिस्ट पॅव्हेलियनच्या दिशेने चालायला लागला होता. त्याने एवढ्या महत्त्वाच्या सामन्यात दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीबद्दल त्याचे नंतर कौतुक झाले. हा सामना पुढे जाऊन डकवर्थ लूईस नियामानुसार ऑस्ट्रेलियाने ४८ धावांनी जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

३. २०१९ विश्वचषक, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – विराट कोहली 

भारताचा कर्णधार विराट कोहलीने २०१९ विश्वचषकादरम्यान १ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या स्टिव्हन स्मिथची निंदा करणाऱ्या प्रेक्षकांना त्याचे कौतुक करण्यास सांगितले होते.

झाले असे की विश्वचषकात साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाकडून विराट फलंदाजी करत असताना एका वेळी स्मिथ बाउंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी चाहत्यांकडून स्मिथची ‘चिटर, चिटर’ असे म्हणत निंदा केली जात होती.

ते पाहून संतापलेल्या विराटने व्हॉक्सहॉल एन्डला मोठ्याप्रमाणात उपस्थित असणाऱ्या भारतीय चाहत्यांच्या दिशेने टाळ्या वाजवण्यासारखे हातवारे करुन स्मिथची निंदा करण्याऐवजी त्याचे कौतुक करण्यास सांगितले होते.

विराटची ही खिलाडूवृत्ती पाहून स्मिथनेही विराट जवळ येऊन त्याच्याशी हात मिळवला होता. विराटला याच घटनेसाठी आयसीसीचा २०१९ चा खिलाडूवृत्तीचा पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/ICC/status/1137777943667707907

४. २०१९ विश्वचषक, अंतिम सामना – न्यूझीलंड 

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझीलंड संघाने २०१९ विश्वचषकाचा अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतरही इंग्लंडला विजेते घोषित करण्यात आल्यानंतर दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सर्वांनी कौतुक केले होते.

२०१९ विश्वचषकाचा नाट्यपूर्ण अंतिम सामना निर्धारित ५०-५० षटकानंतर बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती. मात्र त्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांच्या आधारावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले होते. त्यावेळी न्यूझीलंडने हा निकाल मान्य करत उपविजेतेपदावर समाधान मानले होते.

तसेच त्याआधी याच विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघात झालेल्या साखळी फेरीतील सामन्यादरम्यानही न्यूझीलंड खेळाडूंकडून खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन झाले होते. या सामन्यात विंडीजला विजयासाठी ७ चेंडूत ६ धावांची गरज होती. तर न्यूझीलंडला केवळ १ विकेटची गरज होती.

पण याचवेळी विंडीजकडून तुफानी १०१ धावांची शतकी खेळी करणारा कार्लोस ब्रेथवेट षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि विंडीजला सामनाही गमवावा लागला.  तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही ब्रेथवेटचे कौतुक करताना त्याला सहानुभूती दिली होती.

https://twitter.com/cricketworldcup/status/1142628783792504833

५. २०१८ कसोटी सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान – अजिंक्य रहाणे 

भारताने जून २०१८ला अफगाणिस्तान विरुद्ध पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी एक डाव आणि २६२ धावांनी विजय मिळवला. त्या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारताचे नेतृत्व केले होते.

त्यामुळे सामना संपल्यावर विजयाची ट्रॉफी अजिंक्य रहाणेने उचलली. ही ट्रॉफी स्विकारल्यानंतर कर्णधार रहाणेमध्ये असलेली खिलाडूवृत्ती दिसुन आली. त्याने आपला इतिहासातील पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला भारतीय संघाबरोबर आणि विजेतेपदाच्या ट्रॉफीबरोबर फोटो काढण्यासाठी बोलावून घेतले. त्याच्या कृतीने त्याने सर्वांचीच मने जिंकली होती.

https://twitter.com/BCCI/status/1007602424222224384

६. १९ वर्षांखालील विश्वचषक २०२० – न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज  

दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या १९ वर्षांखालील २०२० च्या विश्वचषकात १९ वर्षांखालील न्यूझीलंड विरुद्ध १९ वर्षांखालील वेस्ट इंडिज संघात उपांत्यपूर्व फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने २ विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण न्यूझीलंड संघाच्या या विजयाबरोबरच त्यांचा कर्णधार जेसी ताशकोफ आणि जॉय फील्ड या खेळाडूंनी या सामन्यादरम्यान दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक झाले होते.

झाले असे की प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा फलंदाज किर्क मॅकेन्झीला ४३ व्या षटकाच्या अखेरीस उजव्या पायाला क्रॅम्प आला. त्यामुळे त्याला वेदना होत होत्या. तसेच या वेदनांमुळे त्याला ९९ धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले.

पण वेस्ट इंडिजची ९ वी विकेट गेल्यानंतर मॅकेन्झी पुन्हा मैदानावर आला. परंतू त्याला वेदना होत असल्याने पाय हलवता येत नव्हता. तो मैदानावर पुन्हा आल्यानंतर पहिलाच चेंडू खेळताना क्रिस्तिन क्लार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव २३८ धावांवर संपुष्टात आला.

पण बाद झाल्यानंतर पुन्हा मैदानातून बाहेर जाताना मॅकेन्झीने केलेल्या ९९ धावांच्या खेळीचे न्यूझीलंडचे खेळाडू कौतुक करत होते. मात्र याचदरम्यान मॅकेन्झी चालताना संघर्ष करत असल्याचे पाहून न्यूझीलंडचा कर्णधार ताशकोफ आणि फील्ड हे युवा क्रिकेटपटू पुढे आले आणि त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवत दुखापतग्रस्त मॅकेन्झीला उचलून घेतले आणि मैदानाबाहेर नेले.

https://twitter.com/cricketworldcup/status/1222568945204498433

७. १९ वर्षांखालील विश्वचषक २०२० – भारत विरुद्ध जपान 

दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या १९ वर्षांखालील २०२० च्या विश्वचषकात ब्लोएमफोंटेन येथे २२  जानेवारीला १९ वर्षांखालील भारत विरुद्ध १९ वर्षांखालील जपान संघात सामना झाला. हा सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. विशेष म्हणजे या सामन्याच्या दिवशी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल आणि जपानचा गोलंदाज केन्टो ओटा-डोबेल यांचा वाढदिवस होता.

त्यामुळे हा सामना संपल्यानंतर भारत आणि जपान संघाने या दोघांचाही एकत्र वाढदिवस साजरा केला होता. याचा व्हिडिओ आयसीसीच्या क्रिकेट विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला होता. 

https://twitter.com/cricketworldcup/status/1219620734303121408?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1219620734303121408&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fan-entertaining-birthday-celebration-for-dhruv-jurel-and-kento-ota-dobell%2F

त्याचबरोबर याआधी हा सामना संपल्यानंतर प्रियम गर्ग कर्णधार असणाऱ्या भारतीय संघाने जपानलाही ग्रुप फोटो काढण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे भारतीय संघाने दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीसाठी त्यांचे कौतुक झाले होते.

https://twitter.com/cricketworldcup/status/1219605576814075904

८. २०११ इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामना – एमएस धोनी

२०११ ला भारत विरुद्ध इंग्लंड संघात ट्रेंट ब्रिजला झालेल्या कसोटी सामन्यात धोनीने धावबाद झालेल्या इयान बेलला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले होते.

झाले असे की इंग्लंडच्या दुसऱ्या डावात इयान बेल १३७ धावांवर होता. त्यावेळी ओएन मॉर्गनने ६६ व्या षटकाचा शेवटचा चेंडू डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केला. तिथे प्रविण कुमार क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी मॉर्गन आणि बेल चौकार गेला असे समजून टी ब्रेकसाठी ड्रेसिंग रुमकडे जाण्यास निघाले, पण तो चेंडू चौकार गेला नव्हता.

त्यावेळी अभिनव मुकुंदने चेंडू घेत स्टंपवरील बेल्स उडवल्या आणि बेल धावबाद झाल्याचे अपिल केले. पंचांनी रिप्ले तपासले त्यावेळी चेंडूने बाऊंड्री लाईन पार केली नसल्याचे दिसले आणि त्यामुळे बेल बाद झाला.

त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी धोनीला धावबादचे अपिल मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी धोनीने संघातील खेळाडूंशी चर्चा करुन बेलविरुद्धचे धावबादचे अपिल मागे घेत त्याला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले. त्यावेळी भारतीय संघासाठी सर्वांनी टाळ्या वाजवत त्यांचे पुन्हा मैदानात स्वागत केले. त्यावर्षी धोनीला आयसीसीचा खिलाडूवृत्तीचा पुरस्कारही मिळाला.

 ट्रेंडिंग घडामोडी – 

तीन पिढ्यांना जोडणारा सचिन नावाचा भक्कम पुल

शेवटच्या चेंडूवर कमी लोकप्रिय खेळाडूंनी षटकार मारुन जिंकून दिलेले सामने

सचिन तेंडूलकर आणि क्रिकेटवर्तुळात गाजलेले ५ वाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---