आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. पात्रता फेरी प्रथम खेळली जाईल त्यापैकी चार संघ सुपर १२ च्या फेरीत प्रवेश करतील. अशा प्रकारे, १२ संघांमध्ये जेतेपदासाठी लढाई होईल. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
पुढील काही दिवसांत, चाहत्यांना टी -२० विश्वचषकातील अनेक रोमांचक सामने पाहायला मिळतील. या विश्वचषक स्पर्धेबाबत आपण अशा पाच गोष्टी जाणून आहोत, ज्या पहिल्यांदाच टी -२० विश्वचषकात होणार आहेत.
१. विराट कोहली प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करणार
शेवटची आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धा २०१६ मध्ये खेळली गेली होती, तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व एमएस धोनीने केले होते. आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ मध्ये विराट कोहली प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार असे अनुभवी खेळाडू खेळताना दिसतील.
विशेष म्हणजे हा पहिलाच टी२० विश्वचषक असेल, ज्यात भारतीय संघ एमएस धोनी नाही, तर अन्य कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळेल. यापूर्वी झालेल्या सर्व ६ टी२० विश्वचषकात भारतीय संघ धोनीच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला होता.
२. प्रथमच आयसीसीचा साहाय्यक सदस्य देश ही स्पर्धा आयोजित करेल
टी२० विश्वचषक २०२१ चे आयोजन भारत करणार होता. मात्र, देशातील कोरोना विषाणूच्या साथीची परिस्थिती पाहता बीसीसीआयने युएई आणि ओमानमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयसीसी टी२० विश्वचषक इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आयसीसीचा सहाय्यक सदस्य देश ही प्रतिष्ठित स्पर्धा आयोजित करेल. असे असले तरी यजमानपद मात्र भारतीय संघाकडेच असेल.
३. पापुआ न्यू गिनी आणि नामिबियाचा सहभाग
पापुआ न्यू गिनी(पीएनजी) आणि नामिबिया या देशाच्या संघांनी प्रथमच आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ च्या १६ संघांमध्ये सहभाग नोंदवला आहे. इतर १४ देशांनी याआधीही टी -२० विश्वचषक खेळला आहे, परंतु नामिबिया आणि पीएनजी यावर्षी टी२० विश्वचषकात पदार्पण करतील. दोन्ही संघ स्पर्धेच्या पात्रता फेरीत दिसतील. दोन्ही संघ सुपर १२ फेरीत आपले स्थान सुरक्षित करू शकतील का हे पाहणे मनोरंजक असेल.
४. अंतिम सामन्याचे आयोजन करणारा देश विश्वचषक स्पर्धेचा भाग नाही
टी२० विश्वचषक २०२१ चा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हे विशेष आहे की यूएईचा संघ टी२० विश्वचषकाचा भाग नाही. याआधी झालेल्या सर्व ६ टी२० विश्वचषकावेळी ज्या देशात अंतिम सामना झाला तो देश स्पर्धेचा भाग देखील होता.
५. सुपर १२ फेरी
सन २००७ ते २०१२ पर्यंत ८ संघ टी २० विश्वचषकात दुसऱ्या फेरीत दिसले होते, ज्याला सुपर ८ म्हटले गेले. त्यानंतर आयसीसीने संघांची संख्या १० पर्यंत वाढवली आणि त्याला सुपर १० असे नाव दिले. यावर्षी टी -२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच सुपर १२ फेरी होणार आहे. आयसीसीचे लक्ष्य आहे की क्रिकेट हा खेळ नवीन जागांमध्ये घेऊन जाणे आणि त्यासाठी असे सकारात्मक पुढाकार घेणे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी उम्रान मलिक भारतीय ताफ्यात सामील होणार, आयपीएलमध्ये विराटलाही केलेले प्रभावित
दुसऱ्या टी२० मध्ये भारतीय महिलांचा पराभव, ऑस्ट्रेलियाने घेतली मालिकेत आघाडी
Video: सूर्यकुमारच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला!