आयपीएलचे आयोजन यावेळी युएईत होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान ही स्पर्धा होत आहे. याची जेव्हा घोषणा झाली त्यानंतर चाहत्यांच्या आनंदासमोर आभाळही ठेंगणे झाले. आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. ५३ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघ १४- १४ सामने खेळणार आहे. अशाप्रकारे एकूण ६० सामने खेळण्यात येणार आहेत.
परंतु बऱ्याच चाहत्यांना आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूबद्दल माहीत नाही. चला तर मग जाणून घेऊया आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल…
आयपीएल इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे ५ खेळाडू- Highest Individual Score In IPL History
१. ख्रिस गेल
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर आहे वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle). गेलने २०१३ साली बेंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना पुणे वॉरिअर्सविरुद्ध अवघ्या ६६ चेंडूत १३ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने तब्बल १७५ धावांची नाबाद खेळी केली होती. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा २६५.१५ होता. गेलचा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम आतापर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही.
२. ब्रेंडन मॅक्यूलम
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum). २००८ साली आयपीएलच्या पहिल्याच मोसमातील पहिल्याच सामन्यात मॅक्यूलमने हा कारनामा केला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध त्याने केवळ ७३ चेंडूत १५८ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यात १० चौकार आणि १३ षटकारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त केकेआर संघाने १४० धावांनी विजय मिळविला होता, तर मॅक्यूलमला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
३. एबी डिविलियर्स
‘मिस्टर ३६०’ या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी कर्णधार एबी डिविलियर्स (AB De Villiers) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ५९ चेंडूत १३३ धावांची नाबाद वैयक्तिक खेळी केली होती. यामध्ये १९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तो सामना आरसीबीने ३९ धावांनी जिंकला होता.
४. एबी डिविलियर्स
या यादीत चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा एबी डिविलियर्स आहे. त्याने २०१६ मध्ये विराट कोहलीसोबत (Virat Kohli) भागीदारी करत आपल्या मागील भागीदारीचा विक्रम मोडला. या दोघांनीही गुजरात लायन्स संघाविरुद्ध आयपीएल इतिहासातील २२९ धावांची सर्वोच्च भागीदारी रचली. यादरम्यान डिविलियर्सने केवळ ५२ चेंडूत १० चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने १२९ नाबाद धावा केल्या. याव्यतिरिक्त विराटनेही १०९ धावांची खेळी केली होती.
५. ख्रिस गेल
टी२० क्रिकेट प्रकारामधील विस्फोटक फलंदाज म्हणून ख्रिस गेलला ओळखले जाते. यामागील कारण म्हणजे त्याची फलंदाजी. एकाच जागेवर उभे राहून चेंडू बाऊंड्रीलाईनच्या पलीकडे पाठविण्यात तो चांगलाच माहीर आहे. आयपीएल इतिहासात सर्वोधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये गेलने आणखी एक मोठी खेळी केली आहे. २०१२ साली दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध खेळताना त्याने ६२ चेंडूंच्या मदतीने तब्बल १२८ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यात ७ चौकार आणि १३ षटकारांचा समावेश आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा २०६.४५ होता.
विशेष म्हणजे या खेळाडूंनी आयपीएल इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक खेळी या नाबाद राहून केल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख-
-एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’….
-भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…