भारतीय संघाने आपला पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये खेळला. अर्थात या वर्षापासून भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा प्रवास सुरू केला. कसोटी क्रिकेटमधील भारताचा इतिहास खूपच चांगला आहे. या काळात एका पेक्षा एक जबरदस्त कसोटी क्रिकेटपटू भारताला मिळाले.
भारताला कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सुनील गावसकर (Sunil Gavaskar), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांसारखे दिग्गज प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत. या खेळाडूंनी भारताचं नेतृत्व करताना कसोटी क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे.
भारताकडून आतापर्यंत २९६ खेळाडू किमान १ तरी कसोटी सामना खेळले आहेत. त्यातील काही खेळाडूंना एकापेक्षा अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली. पण काही खेळाडूंना मात्र केवळ १ सामनाच खेळता आला.
या लेखात आपण त्या ५ भारतीय खेळाडूंचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत फक्त १ सामना खेळला आहे.
भारतीय संघाकडून केवळ १ कसोटी सामना खेळणारे ५ खेळाडू- 5 Players got only 1 test chance for India
५. रॉबिन सिंग
भारतीय क्रिकेट संघाकडे अनेक अष्टपैलू खेळाडू होऊन गेले व आहेत. ९० च्या दशकात भारताच्या या अष्टपैलू खेळाडूंमध्ये रॉबिन सिंग (Robin Singh) होता. रॉबिन यांनी बरीच वर्षे भारताकडून वनडे खेळले आहे.
रॉबिन हे भारतीय क्रिकेट संघातील एक दिग्गज क्षेत्ररक्षक मानले जात होते. पण कसोटी क्रिकेटचा विचार केला, तर भारतासाठी फक्त १ कसोटी सामना खेळू शकला. रॉबिन यांना १९९८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १ कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्यांनी २७ धावा केल्या. पण त्यांना एकही विकेट घेता आली नाही.
४. निखिल चोप्रा
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकी गोलंदाज निखिल चोप्राने (Nikhil Chopra) आपल्या शानदार गोलंदाजीमुळे भारतीय संघात स्थान मिळवले होते. चोप्राला भारताकडून १९९८ ला वनडेत पदार्पणाची संधी मिळाली. त्याने ३९ वनडे सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
पण चोप्राला कसोटीत फारशी संधी मिळू शकली नाही. त्याला त्याच्या कारकिर्दीत २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने फक्त ७ धाव केल्या. पण त्याला गोलंदाजी करताना एकही विकेट मिळवता आली नाही.
३. विनय कुमार
कर्नाटकचा माजी कर्णधार विनय कुमार (Vinay Kumar) हा रणजी क्रिकेट इतिहासातील एक मोठे नाव आहे. विनयने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो अनेक वर्षे कर्नाटक संघाकडून खेळला आहे. त्याच कामगिरीमुळे विनयला भारताकडून खेळण्याची संधीही मिळाली होती.
विनयने भारताकडून काही वनडे सामने खेळले होते. त्यानंतर २०१२ मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे कसोटी सामना खेळण्याची संधीही मिळाली. पण विनय त्याच्या कारकीर्दीत भारताकडून फक्त हा एकच कसोटी सामना खेळू शकला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात विनयला १ विकेट घेता आली आहे.
२. कर्ण शर्मा
भारतीय क्रिकेट संघात असे बरेच खेळाडू आहेत. ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटच्या कामगिरीमुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. पण ते फार काळ टिकू शकले नाहीत. यातील एक खेळाडू फिरकी गोलंदाज कर्ण शर्मा (Karn Sharma) आहे. शर्माने देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमध्येही आपली ओळख निर्माण केली. ज्यामुळे त्याला भारताकडून कसोटीत खेळण्याची संधी मिळाली.
परंतु शर्मा भारतीय संघासाठी केवळ १ कसोटी सामना खेळू शकला. २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर शर्माने एक कसोटी सामना खेळला. जिथे त्याने ४ विकेट्स घेतल्या. पण त्यानंतर तो पुन्हा भारतीय संघात खेळू शकला नाही.
५. योगराज सिंग
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) जवळपास १७ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळण्यात यशस्वी झाला आणि त्याने उत्कृष्ट प्रदर्शनही केले. युवराजने स्वत: च्या वडिलांकडून क्रिकेटचे धडे घेतले होते. युवराजचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) हे भारताकडून खेळले आहेत.
भारताकडून ६ वनडे सामने खेळण्याव्यतिरिक्त योगराज यांनी १ कसोटी सामना खेळला. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध १९८१ ला वेलिंग्टन येथे कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळला. त्या सामन्यात खेळताना त्यांनी केवळ १ विकेट घेतली. तसेच त्यांना केवळ १० धावा करता आल्या. परंतु त्यानंतर ते कधीही भारताकडून कसोटी खेळू शकले नाहीत.
ट्रेंडिंग लेख –
महिला क्रिकेटपटूंनी केलेले ‘ते’ ५ विक्रम, जे पुरुष क्रिकेटपटूंनाही मोडणे केवळ अशक्य
कोण म्हणतं ‘प्रेम’ एकदाच होतं, या क्रिकेटरला झालंय १० वेळा
आयपीएल इतिहासात वन सिजन वंडर ठरलेले ५ खेळाडू