आयपीएल ही जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. २००८ मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत देश-विदेशातील प्रत्येक क्रिकेटपटू खेळण्याची इच्छा बाळगून असतो. आयपीएलमध्ये आतापर्यंत शेकडो खेळाडू खेळले आहेत, ज्यात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या फ्रँचायझीमधून खेळून आपली गुणवत्ता दाखवली आहे. तर बरेचसे असे खेळाडू आहेत जे अनेक वर्षे एकाच फ्रँचायझीसाठी आपला खेळ दाखवत आहेत.
विराट कोहली सलगपणे १२ वर्ष आरसीबीसाठी खेळत आहे. पण एक असा संघ आहे ज्यातील पाच खेळाडूंनी त्याच संघासाठी प्रत्येकी १०० सामने खेळले आहेत. तो संघ म्हणजे चार वेळचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स. आज आपण मुंबई इंडियन्समधील त्या पाच खेळाडूंविषयी जाणून घेऊया ज्यांनी मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये शंभरपेक्षा अधिक सामने खेळले आहेत.
५) अंबाती रायुडू
२०१० मध्ये मुंबई इंडियन्सला असे काही प्रतिभावान भारतीय खेळाडू मिळाले ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्व क्रिकेटरसिकांना खुश केले. सौरभ तिवारी, आदित्य तरे यांच्यासमवेत अंबाती रायुडू २०१० च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला. त्यानंतर, त्याने मुंबईच्या संघात आपली जागा अनेक वर्षासाठी पक्की केली.
२०१०-२०१७ अशी आठ वर्ष तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्याने मुंबईकडून ११४ आयपीएल सामने खेळताना २,४१६ धावा काढल्या होत्या. रायुडूने मुंबईला अनेक सामने एकहाती जिंकून दिले होते. २०१८ आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग संघाने त्याला विकत घेतले.
४) लसिथ मलिंगा
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य असलेला लसिथ मलिंगा मुंबईसाठी ११ आयपीएल हंगाम खेळला आहे. एकाच संघासाठी सर्वाधिक हंगाम खेळणारा तो एकमेव विदेशी खेळाडू आहे.
मलिंगाने मुंबई इंडियन्ससाठी पहिल्या हंगामापासून २०१९ आयपीएल पर्यंत १२२ सामने खेळले आहेत. मलिंगा २०१८ च्या हंगामात कोणत्याही संघात निवडला गेला नव्हता. मात्र, २०१९ आयपीएल लिलावात मुंबईने त्याच्यावर पुन्हा बोली लावली होती. मलिंगाने १२२ आयपीएल सामन्यात १७० बळी घेतले आहेत. आयपीएलच्या इतिहासात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
३) हरभजन सिंग
आयपीएलमधील सर्वात यशस्वी ऑफस्पिनरपैकी एक असलेला भारतीय दिग्गज हरभजन सिंग दोन हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळत आहे. मात्र, हरभजनने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स सोबत केली होती. पहिल्या वर्षी काही काळ तो संघाचा कर्णधार देखील राहिला आहे. २०११ मध्ये चॅम्पियन्स लीग विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा तो कर्णधार होता.
हरभजन २००८ ते २०१७ अशी सलग दहा वर्ष मुंबई इंडियन्ससाठी खेळला. हरभजनने मुंबईकडून खेळताना उत्तम कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये १३६ सामने खेळताना त्याने १२७ बळी आपल्या नावे केले होते.
२) रोहित शर्मा
मुंबईला चार जेतेपद मिळवून देणारा रोहित शर्मा हा मुंबईसाठी आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १४३ सामने खेळला आहे. २०११ मध्ये रोहित मुंबईच्या संघात सामील झाला होता. त्याआधी, तो डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व करत. २००९ आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा तो प्रमुख सदस्य होता.
रोहितने मुंबईसाठी २०११ ते २०१९ या नऊ वर्षाच्या काळात १४३ सामने खेळताना ३,७२८ धावा काढल्या आहेत. मुंबईने विजेतेपद मिळविलेल्या चारही आयपीएल हंगामात रोहित संघाचा कर्णधार होता.
१) कायरन पोलार्ड
२००९ मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स लीगमध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरन पोलार्डने आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. पोलार्डने केलेल्या अफलातून कामगिरीनंतर त्याला २०१० च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने खरेदी केले होते. तेव्हापासून पोलार्ड मुंबई संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.
पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून प्रत्येक हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत आला आहे. मुंबईसाठी त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक १४८ आयपीएल सामने खेळले आहेत. या दहा वर्षाच्या काळात पोलार्डने अष्टपैलू कामगिरी करत फलंदाजीत २,७५५ धावा व गोलंदाजी करताना ५६ बळी मिळवले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये त्याची गणती केली जाते.
ट्रेंडिंग लेख –
४४ वर्षांपूर्वी होल्डींगने असा काही थ्रो केला की दोन्ही बाजूच्या स्टंपवरील उडाल्या होत्या बेल्स
दोन दुर्दैवी फलंदाज जे आयपीएलमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
या खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी, तीन भारतीयांचाही समावेश
महत्त्वाच्या बातम्या –
नुकतेच २६७ धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजाच्या वडिलांविषयी पसरली अफवा, खरं काय ते घ्या जाणून
अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय गोलंदाज म्हणतोय, माझी बायकोसुद्धा आहे या अवॉर्डची दावेदार
अश्विन पाँटिंगसोबत फोनवर नेमकं काय बोलला? यावेळी होणार खुलासा






