भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचमुळे त्याला ‘कॅप्टनकूल’ म्हणूनही ओळखले जाते. धोनीला मैदानात खूप कमीवेळा त्याच्या भावना व्यक्त करताना चाहत्यांनी पाहिले आहे. पण धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्याआधी काही असे क्रिकेट होते, जे धोनीप्रमाणे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जात होते. अशा खेळाडूंमध्ये या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
धोनीच्या आधी शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे क्रिकेटपटू –
१. राहुल द्रविड –
‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड धोनीप्रमाणेच त्यांच्या संयमी आणि शांत स्वभावासाठी ओळखला गेला. त्याने भारतीय संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर कसोटीत खेळताना अनेकदा मोठ्या खेळी केल्या आहेत.
द्रविड भारताकडून १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या १७ वर्षांत त्याला चिडलेले क्विचित पहायला मिळाले असेल. तो बऱ्याचदा फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शांत रहायचा.
द्रविडने काही वर्षे भारतीय क्रिकेटचे नेतृत्वही केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९७१ नंतर पहिल्यांदा वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकली. २००६ ला जोहान्सबर्गला कसोटी सामना जिंकून भारताचा दक्षिण आफ्रिकेतील पहिला विजयही द्रविडच्याच नेतृत्वाखाली आला. इंग्लंडमध्ये २१ वर्षांनंतर २००७ला भारताला कसोटी मालिका जिंकण्यात द्रविडच्याच नेतृत्वाखाली यश मिळाले.
एवढेच नाही त्याच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे त्याने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षणपद सांभाळतानाही त्याने युवा खेळाडूंच्या मनात आदर मिळवला. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या १९ वर्षांखालील संघाने २०१८ ला विश्वचषकही जिंकला.
२. मार्क वॉ –
ऑस्ट्रेलियासारख्या आक्रमक संघात असूनही मार्क वॉने शांत खेळाडू म्हणून नाव मिळवले. त्याच्या या स्वभावामुळे त्याला प्रतिस्पर्धी संघाकडूनही खूप सन्मान मिळवला. द्रविड प्रमाणे तोही लक्ष केंद्रित करण्यासाठी शांत रहायचा. खूप क्विचित वॉला स्लेजिंग करतानाही चाहत्यांनी पाहिले आहे. मार्क वॉने ऑस्ट्रेलियाकडून ११ वर्षे क्रिकेट खेळले.
याबरोबरच मार्क वॉ त्यांच्या शानदार क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला गेला. त्याने अनेक चांगले झेल घेतले आहेत आणि धावबाद केले आहेत. त्यांनी १२८ कसोटी आणि २४४ वनडे सामने खेळले आहेत. यात त्यांनी १६ हजारांहूनही अधिक धावा केल्या आहेत. तसेच १४० पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या निवड समीतीतही काम केले.
३. डॅनिएल विट्टोरी –
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू डॅनिएल विट्टोरी हा देखील त्याच्या शांत स्वभावामुळे सर्वांच्या लक्षात राहिला. रिचर्ड हॅडली नंतरचा तो न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी अष्टपैलू क्रिकेटपटू आहे.
त्याने नेहमीच खालच्या फळीत फलंदाजी करताना चांगले योगदान दिले. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९६ विकेट्सही घेतल्या. तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. विट्टोरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो प्रशिक्षण क्षेत्राकडे वळला आहे.
४. स्टिफन फ्लेमिंग –
न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू स्टिफन फ्लेमिंग हा न्यूझीलंडचा ‘कॅप्टनकूल’ होता. त्याने न्यूझीलंड संघाचे ३०३ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. याशिवाय न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीतही फ्लेमिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच न्यूझीलंडकडून ७००० कसोटी धावा करणारा आणि १०० कसोटी खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू होता. फ्लेमिंग देखील धोनी प्रमाणेच मैदानात काही आश्चर्यकारक निर्णय घ्यायचा.
मागील १०-१२ वर्षांपासून स्टिफन फ्लेमिंगने आयपीएलमध्ये धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षणपद सांभाळले आहे. त्यामुळे चेन्नईला शांत स्वभावाचे कर्णधार आणि प्रशिक्षक लाभले असल्याचे अनेकदा बोलले जाते.
५. सर विवियन रिचर्ड्स –
वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स अनेक खेळाडूंचे आदर्श आहेत. ते केवळ त्यांच्या फलंदाजी शैलीमुळेच नाही तर त्यांच्या स्वभावामुळेही. रिचर्ड आक्रमक फलंदाजी करायचे. पण ते फलंदाजी करताना जितके आक्रमक होते, तितकेच स्वभावाने शांत होते.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध स्लेजिंग करतानाही अनेक खेळाडू १० वेळा विचार करायचे. कारण ते नेहमीच त्याचे उत्तर त्यांच्या बॅटने द्यायचे. त्यांनी कधीही प्रतिस्पर्धी खेळाडूचा आपमान केला नाही किंवा एखाद्या खेळाडूला स्लेज केले नाही.
त्यांनी वेस्ट इंडिजकडून १२१ कसोटी सामने खेळताना ८५४० धावा केल्या आहेत. तसेच १८७ वनडेत ६७२१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी १४० विकेट्सही कसोटी आणि वनडेमध्ये मिळून घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
चहल म्हणतो, टीम इंडियाचे हे दोन शिलेदार बरोबर असतील तर महिनाभरही राहु शकतो लाॅकडाऊनमध्ये खुश
रात्री दोन वाजता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसमोर कृणालने केले होते हे काम
जगातील ५ महान गोलंदाज, जे कधीही घेऊ शकले नाहीत वनडेत ५ विकेट्स






