गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (दि. 29 मे) पार पडला. या सामन्यात चेन्नई संघाने गतविजेत्या गुजरातला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. यासह चेन्नई संघ पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीचा मानकरी बनला. ट्रॉफी गमावली असली, तरीही गुजरातच्या गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला. गुजरातचे तीन गोलंदाज हंगामात चमकले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि पर्पल कॅप आपल्या नावावर केली. पर्पल कॅप ही आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला मिळते.
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातील पर्पल कॅपचा मानकरी विजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला मिळाली. या लेखातून आपण आयपीएल 2023 हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 गोलंदाजांविषयी जाणून घेऊयात. (5 players who take most wickets in IPL 2023 see list here)
आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
1. मोहम्मद शमी
चॅम्पियन गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने आयपीएल 2023चा हंगाम गाजवला. शमीने त्याच्या भेदक गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. या हंगामात शमीने 17 सामने खेळताना 17.60च्या सरासरीने आणि 7.95च्या इकॉनॉमी रेटने 28 विकेट्स घेतल्या. या हंगामात त्याची 11 धावा खर्च करत 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
2. मोहित शर्मा
आयपीएल 2023 हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानीही गुजरात टायटन्स संघाचाच खेळाडू आहे. तो खेळाडू म्हणजेच मोहित शर्मा (Mohit Sharma) होय. मोहितने या हंगामात 14 सामने खेळताना 13.37च्या सरासरीने आणि 8.17च्या इकॉनॉमी रेटने 27 विकेट्स घेतल्या आहेत. फक्त 10 धावा खर्च करत 5 विकेट्स ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
3. राशिद खान
गुजरात टायटन्स संघाचाच फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) या यादीत मोहितसोबत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहे. राशिदने आयपीएल 2023 हंगामात आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवले आहे. तो शमीनंतर हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने 18.81च्या सरासरीने आणि 7.93च्या इकॉनॉमी रेटने 27 विकेट्स घेतल्या आहेत. 30 धावा खर्च करत 4 विकेट्स ही राशिदची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
4. पीयुष चावला
मुंबई इंडियन्स संघ जरी दुसऱ्या क्वालिफायरमधून बाहेर पडला असला, तरीही त्यांचा एक गोलंदाज सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी विराजमान झाला. पीयुष चावला (Piyush Chawla) हा हंगामातील सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा खेळाडू असला, तरीही मुंबईचा पहिला खेळाडू आहे. त्याने हंगामात 16 सामने खेळताना 22.50च्या सरासरीने आणि 8.11च्या इकॉनॉमी रेटने 22 विकेट्स घेतल्या आहेत. 22 धावा खर्च करत 3 विकेट्स ही त्याची हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.
5. युझवेंद्र चहल
मागील हंगामात ऑरेंज कॅप (Orange Cap) पटकावणारा राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू आयपीएल 2023 हंगामात पाचव्या स्थानी घसरला. चहल या हंगामात फक्त 21 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. त्याने 14 सामने खेळताना 20.57च्या सरासरीने आणि 8.17च्या इकॉनॉमी रेटने 21 विकेट्स घेतल्या. 17 धावा खर्च करत 4 विकेट्स ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा