भारतीय क्रिकेट जगतात वसीम जाफर हे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. भारताकडून त्याला अधिक सामने खेळण्याची संधी मिळू शकली नाही, परंतु देशांतर्गत खेळताना या दिग्गज खेळाडूने आपल्या दमदार खेळाने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले आहे.
त्याने वयाच्या ४२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबतच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. वसीम जाफरचे रणजी करंडक स्पर्धेमध्ये तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्ये मोठे योगदान आहे. दोन दशकांच्या यशस्वी कारकीर्दीत सुमारे २० हजार धावा त्याने केल्या. परंतु त्याला तेवढी नाव व प्रसिद्धी मिळू शकली नाही. पण त्याचे रणजी कारकीर्दीतील ५ विक्रम असे आहेत की ते अजून कोणीही मोडू शकले नाही आणि भविष्यातही हे विक्रम मोडणे सोपे असणार नाही.
१. सर्वाधिक रणजी सामने
वसीम जाफरच्या विक्रमांच्या यादीत सर्वप्रथम विक्रम येतो तो म्हणजे सर्वाधिक रणजी सामने.
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या या दिग्गज खेळाडूने रणजी ट्रॉफीमध्ये एकूण १५६ सामने खेळले आहेत. जो खरोखरच एक मोठा विक्रम आहे. जाफरशिवाय इतर कोणताही खेळाडू आजवर रणजी स्पर्धेत इतके सामने खेळू शकला नाही. खरोखर, आगामी काळातही जाफरचा हा विक्रम मोडणे सोपे असणार नाही.
वसीम जाफरने भारतीय क्रिकेट संघासाठी ३१ कसोटी सामने खेळाले आणि २६० प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये भाग घेतला.
२. रणजीमध्ये सर्वाधिक धावा
वसीम जाफरचा दुसरा मोठा विक्रम म्हणजे त्याने बनवलेल्या सर्वाधिक रणजी धावांचा आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात वसीमने सर्वाधिक धावा केल्या आहेत. मुंबई आणि विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार्या जाफरने १५६ रणजी करंडक सामन्यात एकूण १२,०३८ धावा केल्या आहेत. रणजीच्या इतिहासातील १० हजार, ११ हजार आणि १२ हजार धावांच्या आकड्यांना स्पर्श करणारा तो पहिला दिग्गज खेळाडू देखील आहे.
वसीम जाफरच्या नंतर सर्वाधिक रणजी धावांचा विक्रम मुंबईच्या अमोल मजूमदारच्या (९२०२) नावे आहे. अमोलनंतर मध्य प्रदेशचा अनुभवी खेळाडू देवेंद्र बुंदेला रणजीमध्ये ९२०१ धावा करण्यास यशस्वी झाला, तर माजी भारतीय सलामीवीर यशपाल शर्माने रणजी ट्रॉफीमध्ये ८७०० धावा केल्या आहेत.
३. सर्वाधिक शतक आणि ५०+ धावसंख्या
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकण्याचा ऐतिहासिक विक्रमही वसीम जाफरच्याच नावावर आहे. जाफरने रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक ४० शतके ठोकली आहेत. आजपर्यंत कोणताही खेळाडूने रणजीमध्ये असा कारनामा केलेला नाही.
खरं तर रणजी मध्ये ४० शतक ठोकणे ही सोपी गोष्ट नाही. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशकडून खेळणार्या अजय शर्माने रणजीत ३१ शतके ठोकली. जाफर नंतर रणजीमध्ये सर्वाधिक शतके करण्यामध्ये या फलंदाजाच नाव येतं.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानकडून खेळत असताना ऋषिकेश कानिटकरच्या बॅटने रणजीत २८ शतके झळकावली.
जाफरने रणजीत ४० शतके ठोकली तसेच त्याने सर्वाधिक ८९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत, जो एक विक्रम आहे.
४. सर्वाधिक झेल
वसीम जाफर एक महान फलंदाज होताच, परंतु तो एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षकही होता. त्याचे स्लिपमधील क्षेत्ररक्षण जबरदस्त होते. जाफर बहुधा स्लिप किंवा कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षण करताना दिसायचा.
४२ वर्षीय जाफरच्या नावे रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही आहे. जाफरने १५६ रणजी सामन्यांमध्ये २०० झेल घेतले.
क्षेत्ररक्षक म्हणून २०० झेल पकडणे खरोखर सोपे नाही. जाफरने रणजीमध्ये २००, भारतीय संघासाठी २७ आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण २९९ झेल घेतले. क्षेत्ररक्षणाशी वयाचा काही संबंध येत नाही हे या खेळाडूने दाखवून दिलं आहे.
५. सर्वाधिक विजयी सामने
रणजी करंडकातील सर्व मोठे विक्रम वसीम जाफर याच्या नावावर आहेत. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात जास्त सामने जिंकण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. जाफरने आपल्या रणजी कारकिर्द मुंबई क्रिकेट संघाकडून घडवली आणि तो प्रदीर्घ काळ मुंबई संघाकडून खेळाला. वसीम जाफरने केवळ मुंबईला सामनेच जिंकून न देता, ट्रॉफी जिंकून देण्यासही यशस्वी ठरला.
मुंबई संघाला रणजी इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबईनंतर जाफर विदर्भ संघामध्ये सामील झाला आणि विदर्भ संघ सलग दोनदा रणजी चषक जिंकला.
१५६ रणजी सामन्यांत भाग घेतलेल्या वसीम जाफरने एकूण ७४ सामन्यांमध्ये विजयाची चव चाखली.