मुंबई:- सूर्यकांत व्यायाम शाळा, दुर्गामाता स्पोर्टस्, विजय नवनाथ यांनी बळीराम क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या “५१व्या कबड्डी महोत्सवात” प्रथम श्रेणी गटात विजयी सलामी दिली. काळाचौकी आंबेवाडी येथील बळीराम मंडळाच्या पटांगणावर आयोजित केलेल्या उदघाटनिय सामन्यात सूर्यकांत व्यायाम शाळेने डॉ. आंबेडकर स्पोर्टस् चा ३०-२० असा पराभव केला.
पहिल्या डावात सावधपणे खेळाला गेलेल्या या सामन्यात ९-७ अशी आघाडी सूर्यकांत संघाकडे होती. दुसऱ्या डावात मात्र झटापटीचे क्षण पहावयास मिळाले. मंदार ठोंबरे सूर्यकांत कडून, तर ऋतिक कांबळे आंबेडकर स्पोर्टस् कडून उत्कृष्ट खेळले. दुसऱ्या सामन्यात दुर्गामाता स्पोर्टस् ने रुपेश माहुरेच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर हौशी बालमित्र संघाचा ४३-२३ असा सहज पाडाव केला. हौशी बालमित्रचा हर्ष परब बरा खेळला.
विजय नवनाथने पूर्वार्धातील १५-२२ अशा पिछाडीवरून प्रभादेवीच्या विकास मंडळाचा प्रतिकार ३५-३० असा मोडून काढत दुसरी फेरी गाठली. पूर्वार्धात मंदार गायकवाड यांच्या झंझावाती खेळाने विकास मंडळाने ०७ गुणांची आघाडी घेण्यात यश मिळविले होते. उत्तरार्धात मात्र सुर सापडलेल्या प्रो-कबड्डी स्टार हर्ष लाडने बाजी पलटवित सामना विजय विजय नावनाथच्या बाजूने झुकवला. शेवटच्या सामन्यात यश मंडळाने साई क्रीडा मंडळाचा ३७-१५ असा सहज पाडाव करीत दुसरी फेरी गाठली. या स्पर्धेचे उद्घाटन ओ.एन.जी.सी.चे व एस.जी.एस.चे राष्ट्रीय खेळाडू सचिन कासारे यांच्या उपस्थितीत पार पडला. तदप्रसंगी स्पर्धा निरीक्षक अनिल केशव, मंडळाचे अध्यक्ष अनिल धामापुरकर, सचिव सुनील पाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.