इंग्लंड हा जगात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा देश म्हणून ओळखला जातो. इंग्लंडने आजपर्यंत १०२२ कसोटी सामने खेळले आहेत. १ हजारपेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा इंग्लंड जगातील एकमेव देश आहे.
गमतीचा भाग म्हणजे ऑस्ट्रेलियासारख्या देशाने इंग्लंडमध्ये तब्बल १७१ कसोटी सामने खेळले आहेत. भारताने या देशात ६२ सामने खेळण्याचा भीमपराक्रम केला आहे. परंतु यात भारताला ७ कसोटी सामने जिंकता आले असून ३४ पराभव झाले आहेत तर २१ सामने अनिर्णित राहिले आहे.
या ६२ सामन्यात भारताने नेतृत्त्व करण्याची संधी १६ कर्णधारांना मिळाली. १९३२ला सिके नायडू ते २०१८ ला विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारत हे सामने खेळला. परंतु यातील केवळ ६ कर्णधारांना इंग्लंडमध्ये विजय मिळवता आला. यात कपिल देव असे एकमेव कर्णधार राहिले ज्यांनी या देशात दोन कसोटी सामन्यांत विजय मिळवला. 6 Indian Captain to Win Test Match in a England.
६. एमएस धोनी (९ कसोटीत १ विजय)
भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली दोन वेळा इंग्लंडचा दौरा केला. २०११मध्ये भारताने धोनीच्या नेतृत्त्वाखाली ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळली. यात भारताला ४-० असा सपाटून मार खावा लागला. त्यानंतर २०१४मध्ये धोनीच्याच नेतृत्त्वाखाली भारतीय संघ येथे ५ कसोटी सामने खेळला. यात संघाने दुसऱ्या कसोटीत शानदार विजय मिळवला. ३ कसोटीत पराभव तर एक सामना अनिर्णित राहिला. भारत ही मालिका १-३ने पराभूत झाला.
५. अजित वाडेकर (६ कसोटीत १ विजय)
अजित वाडेकरांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने १९७१मध्ये इंग्लंडमध्ये ३ कसोटी सामने खेळले. यातील पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्यावर तिसरा सामना जिंकत भारताने मालिकेत १-० असा शानदार विजय मिळवला. त्यानंतर वाडेकरांच्याच नेतृत्त्वाखाली भारताने १९७४मध्ये पुन्हा ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळली. यातील तीनही सामन्यात भारताचा सपाटून पराभव झाला व भारताने मालिका ०-३ने गमावली.
४. विराट कोहली (५ कसोटीत १ विजय)
२०१८मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामने खेळले. यातील तिसऱ्या कसोटीत भारताला यश मिळाले तर बाकी ४ सामने भारतीय संघ पराभूत झाला. अखेर भारताला ही मालिका १-४ने गमवावी लागली.
३. सौरव गांगुली (४ कसोटीत १ विजय)
२००२ साली सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी गेला होता. यातील पहिला सामना इंग्लंडने जिंकला तर तिसरा सामना भारताने जिंकला. अन्य दोन सामने अनिर्णित राहिले. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
२. राहुल द्रविड (३ कसोटीत १ विजय)
राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली भारताने २००७मध्ये इंग्लंडचा दौरा केला. यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १ सामना भारताने जिंकला तर बाकी दोन सामने अनिर्णित राहिले. यामुळे इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणारा द्रविड तिसरा भारतीय कर्णधार ठरला.
१. कपिल देव (३ कसोटीत २ विजय)
कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने १९८६मध्ये इंग्लंडचा दौरा केला. यात भारताने ३ कसोटी सामने खेळले. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने भारताने जिंकले तर तिसरा सामना अनिर्णित राहिला. यामुळे भारताने ही मालिका २-०ने जिंकली. इंग्लंडमध्ये २ कसोटी सामने जिंकणारे कपिल देव पहिले तर कसोटी मालिका जिंकणारे दुसरे कर्णधार ठरले.
महत्त्वाचे लेख-
–दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकणारे ३ भारतीय कर्णधार