मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आपला दबदबा ठेवला आहेच पण यावेळी टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघातही आपला ठसा उमटवला आहे. मुंबई इंडियन्सच्या एकूण सहा खेळाडूंना विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त यात सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, इशान किशन आणि राहुल चाहर यांचा समावेश आहे. विश्वचषकाचे सामने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यापूर्वी हे खेळाडू १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान आयपील २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात आपली ताकद दाखवतील.
रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. २०२० मध्ये आयपीएलचा संपूर्ण हंगाम यूएईमध्ये खेळला गेला होता. त्यावेळीही मुंबईचा संघच विजेता ठरला होता. अशा परिस्थितीत त्यांचे खेळाडू टी २० विश्वचषकातही भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करू शकतात. विश्वचषकापूर्वीच्या आयपीएल सामन्यांमध्ये खेळाडू इथल्या खेळपट्टीसाठी स्वतःला तयार करू शकतील. रोहित भारतीय संघाला चांगली सुरुवात देऊ शकतो, तर हार्दिक पंड्या शेवटच्या षटकांत मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो.
दरम्यान, २०२० मध्ये आयपीएलचे संपूर्ण सामने यूएईमध्ये झाले. जर आपण आकडेवारी पाहिली तर सूर्यकुमार यादवने १६ सामन्यांमध्ये १४५ च्या स्ट्राईक रेटने ४८० धावा केल्या होत्या. ४ अर्धशतके केली होती. रोहित शर्माने ३३२ तर हार्दिक पंड्याने २८१ धावा केल्या. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १५ सामन्यांमध्ये १५ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर राहुल चाहरने १५ सामन्यात १५ बळी घेतले. इशान किशनने ५०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
भारतीय संघासोबतच कर्णधार विराट कोहलीसाठीही हा टी -२० विश्वचषक महत्त्वाचा आहे. २००७ नंतर भारतीय संघाने टी -२० विश्वचषक जिंकलेला नाही. एवढेच नाही तर संघाने २०१३ पासून आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. दुसरीकडे, विराट कोहलीला त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आतापर्यंत आयसीसी करंडक मिळवता आलेला नाही. अशा स्थितीत त्याच्यावरही नजर ठेवली जाईल.
त्याचबरोबर टी२० विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात (राखीव खेळाडू मिळून) मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारे ४ खेळाडू आहेत. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सचे ३ खेळाडू आहेत. पंजाब किंग्स संघाचे २, तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघातील प्रत्येकी १ खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या एकाही खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.
या टी२० विश्वचषकाचे सामने यापूर्वी भारतातच होणार होते, पण कोरोनामुळे ते यूएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आले आहे. पण, बीसीसीआय अजूनही या स्पर्धेचे यजमान आहे.
टी-२० विश्वचषकाचा हा ७ वा हंगाम आहे. वेस्ट इंडीज संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्यांनी दोन वेळा जेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडचा संघ प्रत्येकी एकदा चॅम्पियन बनला आहे.
असा आहे टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाचा अनुभव नसलेल्या ७ खेळाडूंची टीम इंडियात निवड, पण कामगिरी पाहून विरोधकांना फुटेल घाम
‘ये दुख काहे खत्म नही होता’, धोनी टीम इंडियाचा मेंटॉर होताच गौतम गंभीर आला चाहत्यांच्या निशाण्यावर






